ग्राऊंड रिपोर्ट : 'रकबरला सांगितलं होतं की अल्वरला जाऊ नको'

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : 'रकबरला सांगितलं होतं की अल्वरला जाऊ नको'

'काही लोक गायीच्या तस्करीसाठी राजस्थानहून हरियाण्याच्या दिशेने पायी पायी जात आहेत.' रकबरच्या हत्या प्रकरणात अल्वर जिल्ह्यातील रामगढ पोलीस ठाण्याला मिळालेली ही प्राथमिक माहिती होती.

FIR नुसार घटनेची माहिती रात्री 12 वाजून 41 मिनिटांनी मिळाली. ही बातमी नवल किशोर शर्मा नावाच्या व्यक्तीनं दिली होती.

रकबर यांना काही लोकांनी इतकी बेदम मारहाण केली की सरकारी रुग्णालयात नेतानाच त्यांनी प्राण सोडले असं पोलिसांचं मत आहे.

ही घटना लालवंडीच्या जंगलाच्या जवळची आहे. तिथून दोन हल्लेखोरांना घटनास्थळावरून अटक करण्यात केली.

रकबर यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात अज्ञात लोकांनी हल्ला केल्याचं सांगितलं.

या जबाबाचा FIRमध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुचना देणारे नवल किशोर शर्मा विश्व हिंदू परिषदेशी निगडीत आहे असल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनास्थळावरून अटक केलेल्या अन्य लोकांचा संबंध दुसऱ्या हिंदू संघटनांशी असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याला राजकीय रंग चढू लागला आहे.

दुसऱ्या बाजूला या प्रकरणात राज्याचे भाजपचे आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी आपल्या वक्तव्याने पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

पत्रकारांशी बोलताना अहुजा म्हणाले की, "त्यांच्या कार्यकर्त्यांनी रकबर यांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं होतं. ज्या वेळी कार्यकर्त्यांनी रकबर यांना पकडून दिलं तेव्हा त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच ते जखमी झाले."

अहुजा यांचा आरोप आहे की रकबर यांना पोलिसांच्या हवाली केलं होतं. त्याचवेळी या प्रकरणात दुसरं महत्त्वाचं वळण आलं जेव्हा नवल किशोर यांनी एका मोठ्या हिंदी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की ते पोलिसांबरोबर घटनास्थळी गेले होते.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजता रात्रीच्या आसपास पोलिसांनी रकबर यांना अटक केली होती अशी बातमी या वृत्तपत्राने छापली.

पण त्यांचा आरोप आहे की जेव्हा रकबर यांना अल्वर जिल्ह्यातल्या रामगढ येथील सरकारी रुग्णालयात नेलं तेव्हा सकाळचे चार वाजले होते. पण घटनास्थळावरून रुग्णालय चार ते पाच किलोमीटर होतं.

काही प्रसारमाध्यमांच्या अहवालात हेही म्हटलं आहे की गायींना आधी गोशाळेत नेलं आणि त्यानंतर रकबर यांना इस्पितळात नेलं.

प्रतिमा मथळा रकबर यांचं वय 28 होतं

पोलिसांनी FIR मध्ये घटनास्थळावरून अटक केलेल्या लोकांची नावं सार्वजनिक केली आहेत. रविवारी पोलिसांनी दावा केला आहे की रकबर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा अटक केली आहे.

आता भाजपचे कार्यकर्ते संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहेत.

कोणी, कसं मारलं, आम्हाला माहित नाही

रकबर यांच्याबरोबर दुभती गाय घेऊन जाणाऱ्या अस्लम यांनी कसंतरी स्वत:ला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवण्यात यश मिळवलं आणि रात्रीच्या अंधारात शेतांमधून आणि जंगलांमधून स्वत:ला वाचवण्यात यश मिळवलं.

गावात परतल्यावर त्यांना रकबर यांच्या मृत्यूची बातमी मिळाली असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

त्याचवेळी मेवातचे पोलीस अधीक्षक नाजनीन भसीन यांनी अल्वरच्या पोलीस अधीक्षकांशी वैयक्तिक चर्चा केली आणि सांगितलं की अस्लम यांचं रामगढला जाणं शक्य नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो.

म्हणून मेवातच्या पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून राजस्थानचे पोलीस मेवातच्या फिरोजपूर झिरका ठाण्यात गेले. तिथे अस्लम यांची साक्ष नोंदवण्यात आली.

प्रतिमा मथळा रकबर यांची पत्नी

रकबर आणि अस्लम यांनी तस्करी केली होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही असं अल्वरचे पोलीस अधीक्षक अनिल बेनीवाल यांचं म्हणणं आहे. सध्या दोन्ही गायींना एका गोशाळेत ठेवण्यात आलं आहे.

त्याचवेळी पोलिसांनी रकबर यांच्याविरुद्ध 2014मध्ये नोंद केलेल्या गायीच्या तस्करीसंदर्भात केलेल्या एका तक्रारीचाही संदर्भ देण्यात आला आहे.

रकबर आणि अस्लम नूहच्या फिरोजपूर झिरका येथे असलेल्या कोलगावचे राहणारे आहे. रकबर यांचे भाऊ इरशाद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की त्यांनाही मृत्यूच्या कारणांची कल्पना नाही.

ते म्हणाले, "काय झालं आम्हाला काहीही माहिती नाही. आम्हाला फक्त मृत्यूची बातमी मिळाली. कोणी मारलं, कसं मारलं, ते आम्हाला अद्याप कळलेलं नाही."

प्रतिमा मथळा रकबर यांचे वडील सुलेमान

शवविच्छेदन अहवालात रकबर यांना गंभीर जखमा झाल्याचा उल्लेख आहे. त्यात त्यांच्या हाडांना गंभीर दुखापत झाली आहे. फुप्फुसांनादेखील गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय संपूर्ण शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत.

रकबर यांची पत्नी गरोदर

कोलगावमध्ये या आधी कधीच इतकं दु:खद वातावरण नव्हतं. 500 घरं असलेल्या या गावात खचितच एखाद्या घरी रविवारी स्वयंपाक झाला असेल.

मुसळधार पाऊस असूनसुद्धा रकबर यांच्या घरी लोकांचा राबता होता. रकबर यांचं वय 28 होतं असं सांगण्यात येत आहे.

प्रतिमा मथळा रकबर यांचे भाऊ इरशाद

रकबर यांची पत्नी अस्मीना गरोदर आहे. त्या वारंवार रडून-रडून बेशुद्ध होत आहेत. अस्मीना यांची आई त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत असली तरी त्यांची अवस्था वाईट आहे. रकबर यांच्या वडिलांचा दूध विकण्याचा मूळ व्यवसाय आहे.

अल्वरला जायला मनाई केली होती

रकबर यांच्याकडे तीन गायी आहेत. आपल्या कामाचा आवाका वाढवण्यासाठी दोन आणखी गाय विकत घेण्यासाठी ते अल्वरला गेले होते.

सुलेमान सांगतात, "आम्ही त्याला खूप विरोध केला होता. त्याला सांगत होतो की परिस्थिती चांगली नाही. अल्वरला जाऊ नको. पण तो म्हणत होता की काही होणार नाही. माझं म्हणणं त्यानी ऐकायला हवं होतं."

त्याचवेळी अस्लम यांनी सांगितलं होतं की, त्यांना गाडीनं गायींना आणायचं होतं. पण या गाडीत गाय दचकून पळण्याचा प्रयत्न करत होती. म्हणून रस्त्यातूनच ते आपल्या गावात परतत होते.

त्यांचं रामगढ गाव फार दूर नाही. त्यामुळे ते आश्वस्त होते की सगळे त्यांना ओळखतात आणि त्यांच्यावर कोणीही हल्ला करणार नाही.

नूह गावातले आमदार झाकिर हुसैन सांगतात की, "मेवातचा परिसर जमिनीपेक्षा खालच्या स्तरावर आहे. गोरक्षण आणि दूधाचा व्यवसाय हेच वर्षानुवर्षं त्यांच्या उपजिविकेचं साधन आहे."

ते सांगतात की, "हिंदूंपेक्षा मेवातमध्ये मुस्लीम गोपालनचा व्यवसाय करतात आणि गोधनाचं रक्षणही करतात. हरियाणाच्या विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आझाद मोहम्मदसुद्धा रामलीला समिती आणि गोशाला समितीचे आजन्म सभासद आहेत."

ते पुढे सांगतात की, "मेवातमध्ये हिंदू आणि मुस्लीमांमध्ये गोपालनाच्या मुद्द्यावरून कधीही वाद झाला नाही. गोरक्षणाच्या नावावर होत असलेल्या हिंसक घटनांचं केंद्र राजस्थान जास्त प्रमाणात आहे."

कोलगाव या भागात माझी भेट कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव सुरेंद्र सिंह सांगतात की, "जे राजस्थान आणि हरियाणात गोरक्षेच्या नावावर जे होतं आहे ते अघटित नाही. त्यांच्या मते हे संघटित पद्धतीने होणारं काम आहे."

ते सांगतात, "मेवात मध्ये लोकांना आपल्या देशभक्तीचं सर्टिफिकेट द्यायला लागतं. या लोकांच्या पूर्वजांनी इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात मोठ्या प्रमाणात प्राणांची बाजी लावली आहे. ते कधी बाबरशी लढले तर कधी अकबरशी. आज त्यांना संशयाच्या नजरेनं बघितलं जात आहे आणि हे दुर्दैवी आहे."

अल्वरच्या बहरोरमध्ये सगळ्यात आधी पहलू खान यांची हत्या करण्यात आली. ही घटना 13 एप्रिल 2017 ची आहे.

त्यानंतर अल्वरच्या मरकपूरमध्ये उमर खान यांची हत्या 9 नोव्हेंबर 2017 ला झाली होती. तर, 21 जुलैला रकबर यांची हत्या झाली.

जमावाकडून हत्या

सरकारी आकडेवारीनुसार, पहलु खान ते रकबर यांच्यापर्यंत जमावाने वेगवेगळ्या प्रांतात एकूण 44 लोकांची हत्या केली आहे.

झारखंडमध्ये जमावाने 13 लोकांना मारून टाकलं आहे तर महाराष्ट्रात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडू आणि त्रिपुरा मध्ये पाच लोक मारले गेले आहेत. तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आमि आसामसुद्धा यातून सुटलेले नाहीत.

प्रतिमा मथळा असलम यांनी कसाबसा आपला जीव वाचवला

अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा गोरक्षेच्या नावावर हत्या करणाऱ्या आरोपींची तुरुंगातून सुटका झाल्यावर हार घालून आणि मिठाई खाऊ घालून स्वागत केलं होतं.

परंतू अल्वरमध्ये शुक्रवारी रात्री घडलेली घटना थोडी वेगळी आहे. या घटनेच्या निंदेबरोबर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी अधिकाऱ्यांना आरोपींच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचवेळी भाजपचे आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी ज्या पद्धतीने स्थानिक पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते पाहता मुख्यमंत्र्यांनी जयपूर विभागाच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी दिली आहे.

हेही वाचलंत का

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)