सोशल : 'पंढरपूरला जाणं टाळून मुख्यमंत्री मराठा आंदोलनाविषयी किती गंभीर हे कळालं'

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यातच विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली.

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं आक्रमक होऊ लागली आहेत. मराठा संघटनांच्या इशाऱ्यानंतर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला जाणं टाळलं.

पंढरपुरात सध्या 10 लाख वारकरी आहेत. काही संघटना आज अनुचित प्रकार करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा पाहता मी पंढरपूरात शासकीय महापूजेला जाणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आणि मुंबईत वर्षा बंगल्यावरच त्यांनी सपत्नीक पूजा केली.

त्यांच्या या निर्णयावर आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना मतं विचारली होती.

बीबीसी मराठीच्या वाचकांनी व्यक्त केलेल्या मतांपैकी काही निवडक आणि संपादित मतं इथं देत आहोत.

नितीन साबळे म्हणतात, "विठ्ठलालाच त्यांचे दर्शन नको असेल. कारण चार वर्षं झाली सारखी खोटी आश्वासनं देत आहेत. तोही कंटाळून गेला आहे."

निमीशकुमार पंड्या म्हणतात, "वारकरी भाविक यांच्या सुरेक्षिततेच्या दृष्टीनं योग्य निर्णय आहे. पण त्याचबरोबर घटनेत शासन हे सेक्युलर(धर्मनिरपेक्ष) असावं, असं म्हटलेलं आहे. तसंच मुख्यमंत्री म्हणजे राजा नव्हे की त्यांच्याहस्ते अग्रपूजा व्हावी. ही लोकशाही आहे. पूजा करायची असेल तर मंदिराच्या प्रमुख विश्वस्तांनी करावी, मंत्र्याची लुडबूड त्यात कशाला?"

अमेय बडदारे म्हणतात, "मुख्यमंत्र्यांना पंढरपूरची आषाढी पूजा नाकारली यात नवीन नाही. पण विशेष असं की, या निमित्तानं लोकांच्या आंदोलनाविषयी मुख्यमंत्री किती गंभीर आहेत, हे या निमित्तानं समजून आलं. आंदोलन ताणेपर्यंत थांबायचं आणि ते शांत करण्याऐवजी मोडून कसं काढायचं, यावरच जास्त लक्ष देतात. आजपर्यंतच्या या मुख्यमंत्र्याच्या काळात झालेल्या एकही आंदोलनाबाबतीत म्हणावा असा ठोस निर्णय घेतला गेलेला नाही."

गौरी मालपाठक म्हणतात, "हा चांगला निर्णय असून सुशिक्षित लोक हेच करतील. मला अभिमान आहे."

"कौस्तुभ जंगम हा योग्य निर्णय असल्याचं म्हणतात. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजेची प्रथाच बंद झाली पाहिजे. विठ्ठलापुढे सगळेच सारखे. तेव्हा यानिमिताने का होईना, पण ही प्रथा बंद झाल्यास फार उत्तम," असं मनोगत ते व्यक्त करतात.

महेश लंकेश्वर म्हणतात, "निर्णय योग्य असला तरी मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाविषयी गंभीर नाहीत, हे पण दिसून आलं."

"मुळात आरक्षण आणि विठ्ठलपूजा याचा संबंध जोडणं चुकीचं" असल्याचं रेखा लोळगे यांना वाटतं.

बाबू डिसूजा म्हणतात, "विरोधकांनी वारीच्या काळात त्यात्या वेळी मंत्री, मुख्यमंत्री यांना पूजेपासून रोखलं आहे. यंदा मराठा आंदोलनात मुख्यमंत्री यांच्या निव्वळ आश्वासनं देण्याच्या वृत्तीमुळे जनक्षोभ होता. मुळात अशी पूजा वारकरी नसलेल्यांनी करूच नये."

मुकुल निकाळजे म्हणतात, "मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत, तेच जर असं कुणाच्या धमक्यांना घाबरत असतील तर राज्याची कायदा आणि सुव्यस्था "विठ्ठल" भरोसे आहे, असंच म्हणावं लागेल."

विशाल फाके म्हणतात, "वारकरीच हे खरे महापूजेचे मानकरी असून बाकीच्यांच्या गेल्या न गेल्यानं काहीच फरक पडत नाही."

स्वाती कांबळे यांच्या मते, "सरकार कोणाचं आहे, ते महत्त्वाचं नाही. त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आणि सामंजस्याची आहे."

सुरेंद्र सुचिता सुरेश म्हणतात, "राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि कायमच त्या वेगळ्या राहायलाच हव्यात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)