सशस्त्र क्रांतीला मदत करणारा मराठवाड्यातला अनोखा गांधीवादी - गोविंदभाई श्रॉफ

गोविंदभाई श्रॉफ
प्रतिमा मथळा स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा औरंगाबाद येथे असलेला पुतळा

"लोकांचा आक्रोश केवळ सोशल मीडियावरच व्यक्त होताना दिसतो, ते प्रश्न रस्त्यावर येताना दिसत नाहीत. अशा वेळी गोविंदभाई नसल्याची जाणीव अधिक तीव्र होते," अशी खंत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे बीबीसी मराठीसोबत बोलताना व्यक्त करतात.

मराठवाड्याच्या जडण-घडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे नेते अशी ओळख असलेल्या गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म 24 जुलै 1911 रोजी झाला आणि मृत्यू 21 नोव्हेंबर 2002 रोजी झाला. आज त्यांचा जन्मदिन. ते जाऊन आज 16 वर्षांनंतर मराठवाड्यात त्यांचं नाव क्वचितच ऐकायला किंवा पाहायला मिळतं, अशी खंत त्यांचे सहकारी आणि अनुयायी व्यक्त करतात.

"गोविंदभाई गेल्यानंतर मराठवाड्यातल्या आंदोलनातला आवेश कमी झाला आहे. ते पाहून मला असा प्रश्न पडतो की गोविंदभाईंना मराठवाडा विसरला आहे का?" संजीव उन्हाळे प्रश्न विचारतात.

"गोविंदभाई श्रॉफ फक्त मराठवाड्याचेच नेते नव्हते तर ते महाराष्ट्राचेही महत्त्वपूर्ण नेते होते. त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मराठवाड्याची अस्मिता जोपासली. पण त्यांनी कधीही मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं, अशी मागणी केली नाही," उन्हाळे सांगतात.

"पूर्वी कोणताही मुख्यमंत्री अथवा केंद्राचा मंत्री असो, चिकलठाणा विमानतळावर ते उतरले तर आधी ते गोविंदभाईंच्या घरी जात असत. त्यांच्या मागण्या काय आहेत. त्यांच्या काय काय सूचना आहेत याची ते आधी दखल घेत असत. मगच पुढच्या कार्यक्रमाकडे ते राजकीय नेते वळत असत," उन्हाळी जुन्या आठवणी सांगतात.

भूमिगत राहून लढा दिला

भारतात जेव्हा ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून चळवळ सुरू होती, तेव्हा मराठवाड्यात हैद्राबादच्या निझामाविरोधात समांतर आंदोलन सुरू होतं.

"गोविंदभाई श्रॉफ यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यानंतर ते औरंगाबादमध्ये सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. 1920ला लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्य लढ्याची सूत्रं गांधींजींकडं आली. स्वामी रामानंद तीर्थ हे त्यावेळचं एक मोठं व्यक्तिमत्त्व. 1937मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील परतूर येथे एक बैठक झाली. त्या बैठकीत मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक संघटना असावी असा प्रस्ताव समोर आला. त्याच वेळी गोविंदभाई श्रॉफ यांनी आपली नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला," अशी माहिती परभणीत राहणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड. अनंत उमरीकर यांनी दिली.

"मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याच्या दोन बाजू होत्या. एक म्हणजे चळवळी सत्याग्रह-आंदोलन आणि दुसरी बाजू म्हणजे भूमिगत चळवळ. सत्याग्रहाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं होतं तर भूमिगत चळवळीचं नेतृत्व गोविंदभाईंनी केलं होतं.

"15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, पण मराठवाडा निझामाच्या ताब्यात होता. भारतावर दबाव टाकण्यासाठी निझामाने रझाकार या संघटनेची स्थापना केली. रझाकारांविरोधात लढण्यासाठी केवळ शांततेच्या मार्गाने लढता येणार नाही, असं ओळखून स्टेट काँग्रेस कमिटीनं एका अॅक्शन कमिटीची स्थापना केली आणि शस्त्रास्त्रं मिळवली. रझाकारांचा प्रतिकार करण्यासाठी ही शस्त्रास्त्रं वापरा असं कमिटीनं लोकांना सांगितलं. या सर्व गोष्टींमध्ये गोविंदभाईंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली," असं उमरीकर सांगतात.

"पत्रकं वाटणं, चळवळीसाठी वातावरण तयार करणं, क्रांतिकारकांना संरक्षण मिळण्याची व्यवस्था करणं या सर्व गोष्टी गोविंदभाईंनी पाहिल्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं भारदस्त होतं की त्यांच्याकडे पाहिलं की तरुण भारावून जात आणि लढ्यात उतरत. भारत स्वतंत्र झाल्यावर जबाबदारीपूर्वक त्यांनी ती शस्त्रास्त्रे लोकांकडून परत घेतली आणि सरकारकडे जमा केली," असं उमरीकर सांगतात.

मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास

"मराठवाड्याच्या एकूण सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर इतका प्रभाव दुसऱ्या कोणत्याच नेत्याचा नसेल," अंबडमधल्या प्राध्यापिका शिल्पा गऊळकर सांगतात.

Image copyright Twitter

"मराठवाड्यात शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून ते झटले. सरस्वती भुवन शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1958ला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर ते अनेक वर्षं बोर्ड मेंबर होते. गावोगाव फिरून त्यांनी साक्षरता आणि प्रौढ शिक्षणाचं महत्त्व लोकांना समजावून दिलं. त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सरस्वती भुवन शाळेत येऊन स्वतः सर्व कामकाज पाहत असत," प्रा. गऊळकर पुढे सांगतात.

"मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न लावून धरण्यासाठी त्यांनी जनता विकास परिषद या संघटनेची स्थापना केली होती. त्या माध्यमातून ते जनतेचे प्रश्न लावून धरत. त्यांच्याच प्रयत्नामुळे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना देखील झाली. त्यांच्या इतकं पोटतिडकीनं प्रश्न मांडणारा आता कुणी राहिला नाही. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरणं अशक्य आहे," असं उमरीकर सांगतात.

विसर पडला आहे का?

"प्रश्न कोणताही असो, त्या प्रश्नाच्या मूळाशी जाऊन तो समजून घेणं, त्यानंतर शासनासोबत पत्रव्यवहार करणं, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून तो प्रश्न मांडणं आणि मग आंदोलनाला सुरुवात करणं असे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे टप्पे होते," असं उन्हाळे सांगतात.

"त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन ते प्रश्न शासनासमोर मांडत असत आणि चिकाटीने त्या प्रश्नाला तड लावत असत. त्यांच्या जाण्यानंतर इतकं निस्वार्थी व्यक्तिमत्त्व न राहिल्यामुळे मराठवाड्यातील आंदोलनतलं चैतन्य हरपलेलं दिसतं.

"80-90च्या दशकातील ही गोष्ट असेल. जेव्हा गोविंदभाईंनी मराठवाड्याच्या रेल्वे रुंदीकरणाचा प्रश्न उचलून धरला. त्या आंदोलनात त्यांच्यासोबत मीही तुरुंगात गेलो होतो. त्यांच्याबद्दल अधिकारी आणि पोलिसांना प्रचंड आदर होता. त्यांच्या निस्वार्थी वृत्तीमुळेच ते त्यांचा आदर ठेवत असत. ते आपल्या विचारसरणीपासून किंचितही ढळले नाही. त्यामुळेच ते पूर्ण मराठवाड्यासाठी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे होते.

"काळाचा झपाटा आणि गतीशीलता इतकी वाढली आहे की एखाद्या नेत्याचं विस्मरण चटकन होताना दिसतं. इंटरनेट आणि टीव्ही सारख्या माध्यमांनी लोकांना ग्लानी आली आहे असं वाटतं. लोकांचा आक्रोश फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित राहतो तो कधी रस्त्यावर व्यक्त होताना दिसत नाही, अशा वेळी ते नसल्याची जाणीव अधिक तीव्र होते," उन्हाळे खंत व्यक्त करतात.

"गोविंदभाई श्रॉफ यांना विसरण्याचा प्रश्न येत नाही. पण कधीकधी संदर्भ विसरले जातात त्यामुळे आपल्याला तसं वाटू शकतं. गोविंदभाईंनी केलेलं कार्य हे अजरामर आहे," असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिंवसरा यांनी व्यक्त केलं.

खिंवसरा यांनी गोविंदभाई श्रॉफ यांच्याबरोबरीनं चळवळीत सहभाग घेतला होता. "तसं पाहायला गेलं तर गोविंदभाई गांधीवादी होते. पण त्यांचा प्रचंड धाक होता. नैतिकता आणि त्यांच्या वागणुकीमुळेच लोक त्यांचा आदर करत. त्यातूनच हा दरारा निर्माण झाला होता. त्यांचं कार्य विविध माध्यमातून तरुण पिढीसमोर येणं आवश्यक आहे, त्यांच्या कार्याची ओळख झाल्यावर तरुण पिढी त्यांना कधी विसरणार नाही, याबाबत माझ्या मनात शंका नाही," असा आशावाद त्या व्यक्त करतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)