मराठा क्रांती मोर्चा : काकासाहेब शिंदेंच्या मृत्यूनंतर आज महाराष्ट्र बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचं 'दुसरं पर्व' सुरू झाल्याची घोषणा तुळजापुरात केली. Image copyright Hindustan Times / Getty Images
प्रतिमा मथळा मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचं 'दुसरं पर्व' सुरू झाल्याची घोषणा तुळजापुरात केली.

औरंगाबाद जिल्ह्यातले मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जीव दिल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

काकासाहेब शिंदे यांनी गोदावरीत उडी मारून जलसमाधी घ्यायचा प्रयत्न केला. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत बीबीसी मराठीसाठी औरंगाबादहून काम करणाऱ्या अमेय पाठक यांनी दिेलेल्या माहितीनुसार, काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येनंतर मराठा क्रांती मोर्चाचे गेल्या 8 तासांपासून गंगापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. ते जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं.

दरम्यान सध्या राज्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे. औरंगाबाद, परळी, बीड, सोलापूर आणि अनेक ठिकाणी सध्या आंदोलनं सुरू आहेत.

गंगापूर पोलीस ठाण्यातलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. शिंदे यांच्या शवविच्छेदनानंतर त्यांचा अंत्यविधी होणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या लेखी आश्वासनानंतर शिंदे यांचं शव स्वीकारण्यात आलं.

कुटुंबीयांना 25 लाखांची मदत

जिल्हाधिकारी चौधरी यांनी 25 लाख रुपये आर्थिक मदतही त्यांच्या कुटुंबीयांना जाहीर केली आहे. तसंच, हुतात्मा शहीद दर्जासाठी सरकारकडे प्रस्तावही जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर दोषी तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरिक्षक सुनील बिर्ला यांना सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

हे ठिय्या आंदोलन सुरू करताना मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "काकासाहेब शिंदे यांचा मृतदेह आम्ही अद्याप ताब्यात घेतलेला नाही. प्रशासनाशी आमची चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी सुरू असलेल्या चर्चेत या मागण्या आम्ही सरकारसमोर ठेवल्या आहेत."

"आम्ही मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, पण हा महाराष्ट्र बंद शांतेतत केला जावा, असं आमचं मराठा संघटनांना आवाहन आहे. सरकारकडून आमच्या मागण्या मान्य होतील, असा विश्वास आम्हाला अजूनही आहे. त्यामुळे उद्याचा बंद शांततेत पार पाडावा, असं आवाहन आम्ही केलं आहे," असे ते म्हणाले.

Image copyright Ameya Pathak
प्रतिमा मथळा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद पाटील

महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारताना त्यांनी तीन मुख्य मागण्या ठेवल्या आहेत.

प्रमुख मागण्या

  1. मराठा आरक्षण तत्काळ जाहीर करा, तोपर्यंत मेगाभरती रद्द करा
  2. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत जाहीर करा
  3. काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारी नोकरी द्या आणि काकासाहेब यांना हुतात्माचा दर्जा द्या

दरम्यान, यातल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत आणि भावाला नोकरी या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

याआधीही आंदोलकांनी मराठा आरक्षण मिळालं नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरची आषाढी एकादशीची विठ्ठल महापूजा करू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या आपल्या वर्षा बंगल्यावर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)