#5मोठ्या बातम्या: बीफ खाणं थांबवलं तर लिन्चिंग थांबेल- इंद्रेश कुमार

गायींचा कळप Image copyright Getty Images

पाहू या आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्वाच्या बातम्या.

1. बीफ खाणं थांबवलं तर लिन्चिंगच्या घटना थांबतील - इंद्रेश कुमार

लोकांनी बीफ खाणं थांबवलं तर लिन्चिंगच्या घटना थांबतील, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केलं आहे. लिन्चिंगसारखे प्रश्न सोडवण्यासाठी संस्कारांची आवश्यकता आहे, असंही त्यांनी सांगितलं. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबत बातमी दिली आहे.

"ख्रिश्चन धर्मात गाईंना मारण्यास परवानगी नाही, कारण जीझसचा जन्म गोठ्यात झाला होता. इस्लाममध्येही गाईंना मारण्याची अनुमती नाही.

गाईचं बीफ खाण्याची प्रथा थांबली तर लिन्चिंगसारखे गुन्हे कमी होऊ शकतील. जगातला कुठलाही धर्म गाईंना मारण्याचं समर्थन करत नाही", असं ते म्हणाले. हिंदू जागरण मंचाच्या रांची येथील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलते होते.

2. मुंबई हल्ल्यातील आरोपी हेडलीची मृत्यूशी झुंज

मुंबईत 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यातील आरोपी असलेला पाकिस्तानी अमेरिकी नागरिक डेव्हिड हेडली याच्यावर शिकागो येथील महानगर तुरुंगात दोन कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला असून तो आता मृत्यूशी झुंज देत आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा डेव्हिड हेडली मुंबई हल्ल्यातील आरोपी आहे.

हेडली याच्यावर 8 जुलै रोजी हल्ला झाला. तो पाकिस्तान आणि इस्लामी दहशतवादी यांचा दुहेरी हस्तक होता. काही वर्षांपूर्वी पोलिसांवर हल्ला करण्याच्या आरोपात अटक केलेल्या दोघा कैद्यांनी हेडलीवर प्राणघातक हल्ला केला. फेब्रुवारी 2016 मध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हेडलीने मुंबईतील न्यायालयासमोर साक्ष दिली होती.

3. देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का?- न्यायालयाचा सवाल

गेल्या महिन्यात बेलॉर्ड इस्टेटच्या डेट रिकव्हरी ट्रिब्युनल (DRT) कार्यालयाच्या आवारात आग लागल्याने ते बंद करण्यात आलं. मात्र अद्याप ते कार्यान्वित करण्यात न आल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का? असा संतप्त सवाल न्यायालयाने यावेळी केला. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी समजली जाते. तरीही 2 जून रोजी डीआरटी कार्यालयाला आग लागल्याने, लवादाचं कामकाज बंद करण्यात आले आहे. बँक, वित्तीय संस्था आणि त्यांच्या ग्राहकांच्या कर्जवसुली संदर्भातील केसेस या लवादासमोर चालतात. डीआरटीसाठी दक्षिण मुंबईत अन्य ठिकाणी जागा देण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका डीआरटी बार असोसिएशनने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने हा सवाल केला.

आमच्यापुढे हा विषय येण्याऐवजी केंद्र सरकारने स्वत:हूनच याबाबत पुढाकार घ्यायला हवा होता. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. डीआरटीचं कामकाज ठप्प आहे. देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का? असं न्या. ओक यांनी म्हटले आहे.

या कार्यालयाला लागलेल्या आगीत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी संदर्भातील फायलीही असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आयकर विभागाने त्या खोट्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

4. बलात्काऱ्यांच्या मुसक्या आवळणारे विधेयक लोकसभेत

बारा वर्षांखालील मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी फाशीच्या शिक्षेची कठोर तरतूद असणारे संशोधन विधेयक मंगळवारी लोकसभेत गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सभापटलावर मांडले. 'सामना'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

सामान्य बलात्कारप्रकरणी दोषी आढळल्यास किमान दहा वर्ष तुरुंगवास किंवा जन्मठेप अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. 16 वर्षांखालील मुलीवर लैंगिक अत्याचाराबाबत दोषी आढळल्यास आरोपीला किमान 20 वर्षं शिक्षा किंवा जन्मठेप तसेच 12 वर्षांखालील बालिकेबाबत असे दुष्कृत्य करणाऱ्यास जन्मठेप तसेच दंड न भरल्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतदू या विधेयकात करण्यात आली आहे.

5. मालवाहतूकदार संपाने 20 हजार कोटींचा फटका

Image copyright Hindustan Times

देशातील मालवाहतूकदार संप चिघळला असून सोमवारी चौथ्या दिवशीही संप सुरूच राहिल्याने दैनंदिन तोट्यात कमालीची वाढ झाली आहे. संपकरी मालवाहतूकदारांनीही मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही स्थितीत संप मागे न घेण्याचा निर्धार केल्याने तिढा कायम आहे. संपाच्या चौथ्या दिवशी वाहतूकदार क्षेत्राचा तोटा सुमारे 20 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारच्या मालवाहतूकदारांनी देशव्यापी संप पुकारला असून, त्यामुळे उद्योग क्षेत्रालाही प्रचंड झळ पोहोचली आहे. या संपामुळे बंदरांच्या बरोबरीने रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स, पोलाद, कोळसा, सिमेंट, ग्रॅनॉइट अशा विविध उद्योगांना फटका बसला आहे.

नवी मुंबईत संपाला लागलेल्या हिंसक वळणाचा निषेध करण्यात आला. संपाला वेगळे लागण्याच्या खोट्या बातम्या, अफवा, व्हीडिओ पसरवले जात असल्याचे संघटनेतर्फे बाल मल्कित सिंह यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)