#5मोठ्याबातम्या : दोन दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय - राणे

प्रशांत

फोटो स्रोत, BBC/PrashantNanavare

पाहू या आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. दोन दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय - राणे

मराठा आंदोलनाच्या चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. मराठा आंदोलन आणि आरक्षणाच्या मुद्यावरून दोघांमध्ये चर्चा झाली.

पुढच्या दोन दिवसात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर सरकारकडून योग्य हालचाली होतील, असं राणेंनी सांगितलं. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

नारायण राणे

आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात असंतोष आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा. मराठा समाजाला आरक्षणापासून फार काळ दूर ठेवता येणार नाही. मागण्यांसाठी मराठी समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे असंही राणे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री बदलाची चर्चा

भारतीय जनता पक्षातच मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. मात्र मुख्यमंत्री बदलण्याचे काही कारणच नाही, असं महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

"मुख्यमंत्री बदलण्याचे काही कारणच नाही. गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री कुणाशीच दुजाभावाने वागले नाहीत", असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. "मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माझी जेवढी तडफड आहे, त्यापेक्षा जास्त तडफड मुख्यमंत्र्यांची आहे", असं ते पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपमध्ये नाही, इथे सामूहिक निर्णय होतात असं अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले.

सध्या राज्यात परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलंय. त्यामुळे राज्यातील नेतृत्व बदलाचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी घ्यावा असा सल्ला राऊत यांनी दिला. एवढंच नाही तर शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य असल्याची पुष्टीही राऊतांनी दिली. त्यामुळे राज्यात होणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

2. श्रेय घ्या पण महाराष्ट्राची आग शांत करा - सामना

'एरवी प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सरकार पुढे असते. तसे त्यांनी कालच्या बंदचे, दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यावे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास आम्ही आरक्षण दिले होते असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा', असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

'छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले हे मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेते आहेत व त्यांनीही राज्यसभेत आरक्षणाचा मुद्दा मांडला. शिवसेनेच्या 'मराठा' गड्यांनी लोकसभेत सभात्याग केला. श्री. शरद पवार यांनी प्रदीर्घ निवेदन प्रसिद्ध करून भडकलेल्या आंदोलनाचे खापर चंद्रकांतदादा पाटलांवर फोडले आहे. (शिवसेनाप्रमुख तरी दुसरे काय सांगत होते?) हे सर्व त्यांनी स्वतः सत्तेत असताना करून घेतले असते तर आज मराठा समाजातील तरुणांवर ही वेळ आली नसती.

' सध्याच्या मुख्यमंत्र्यांनीही न्यायालयात भिजत पडलेले आरक्षणाचे घोंगडे लवकरात लवकर तेथून काढून मराठा समाजाला त्याच्या हक्काचा न्याय द्यायला हवा. राज्य सरकारचे हे कर्तव्य आणि जबाबदारीही आहे.

फोटो कॅप्शन,

मराठा आंदोलनात पोलीस जीपचं झालेलं नुकसान

अनुल्लेखाने विषय दडपण्याच्या बेदरकार सरकारी वृत्तीची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली. आता उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे, तर ही चर्चा 'गुंतवणारी' आणि 'गुंडाळणारी' ठरू नये. ही चर्चा सफळ कशी होईल आणि राज्याच्या कानाकोपर्‍यात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना आश्वस्त करणारी कशी ठरेल, याची काळजी सरकारने घ्यायला हवी', असं या लेखात म्हटलं आहे.

3. मंगळाच्या भूगर्भात पाण्याचे सरोवर

मंगळावर प्रथमच भूमिगत पाण्याचं सरोवर सापडलं असून, यामुळे तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे, असं आंतरराष्ट्रीय खगोल वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. 'BBC'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन,

मंगळावर भूगर्भात पाण्याचं सरोवर सापडलं आहे.

मंगळावरील बर्फाच्या थराखाली 20 किमी व्यासाचं तळं असल्याचं इटलीच्या संशोधकांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या संशोधनात म्हटलं आहे. सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

मंगळावर सापडलेला हा पाण्याचा सर्वांत मोठा साठा असून मंगळावर पाणी केवळ ठिबकत असून ते भरपूर प्रमाणात असावे असं ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अलन डफी यांनी सांगितलं.

मंगळ आता थंड आहे. तो उजाड आणि कोरडा असून पूर्वी तो उबदार आणि ओलसर होता. तेथे मोठ्या प्रमाणात पाणी होते. 3.6 अब्ज वर्षांपूर्वी तेथे पाण्याची सरोवरं होती. युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीने या सरोवराचा शोध लागला आहे.

4. विराटला एका इन्स्टा पोस्टसाठी मिळतात 82 लाख

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल 82 लाख रुपये मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 'लोकमत'ने याबाबत बातमी दिली आहे. इन्स्टाग्राम वरील फोटोंचे ऑटोमॅटिक वेळापत्रक करणाऱ्या होपर एचक्यू या यंत्रणेतून 2018 मधील आघाडीची यादी समोर आली आहे.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

विराट कोहली

प्रत्येक पोस्टमधून तुम्हाला किती कमाई होते आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कोणकोण आघाडीवर आहेत हे यादीमध्ये स्पष्ट झालं आहे. एखाद्या युझरचे फॉलोअर, प्रत्येक पोस्टला मिळणारा प्रतिसाद आणि पोस्टची वारंवारता यांचा एकत्रित विचार करण्यात येतो. या यादीत अमेरिकेतील मॉडेल आणि उद्योजक कायली जेन्नर असून तिला प्रत्येक पोस्टसाठी 10 लाख डॉलर एवढी रक्कम मिळत आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

5. उत्तर प्रदेशात बुलेट ट्रेन!

मुंबई-अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असते. मात्र भारतीय रेल्वेच्या नोंदीवरून कॅग अर्थात कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाला उत्तर प्रदेशात बुलेट ट्रेनपेक्षा वेगाने धावणाऱ्या ट्रेन्सचा शोध लागला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत बातमी दिली आहे.

अलाहाबाद आणि फतेपूर या स्टेशनदरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसने 116 किलोमीटरचा टप्पा ताशी 409 किलोमीटर वेगाने अवघ्या 17 मिनिटांत गाठला असल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी नोंद रेल्वेनेच केली आहे. कॅगने रेल्वेच्या नोंदी तपासताना हा मुद्दा काढला आहे.

प्रयागराज एक्स्प्रेस, जयपूर अलाहाबाद एक्स्प्रेस आणि नवी दिल्ली-अलाहाबाद दुरंतो एक्स्प्रेसच्या नोंदीमध्ये ही बाब आढळली आहे. इंटिग्रेटेड कोचिंग मॅनेजमेंट सिस्टम द्वारे ट्रेन्सच्या वाहतुकीची रिअल टाइम माहिती नोंदवली जाते. नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम मध्ये हे उल्लेख आढळतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)