नरेंद्र मोदी करण थापरांवर 'सूड' उगवत आहेत का?

नरेंद्र मोदी Image copyright Getty Images

ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी 2007 साली नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत बरीच गाजली कारण मोदी त्या मुलाखतीतून अर्ध्यातच उठून गेले होते.

बीबीसी प्रतिनिधी रेहान फजल यांनी करण थापर यांच्याशी खास बातचीत केली आणि त्या दिवशी नक्की काय झालं होतं हे जाणून घेतलं.

थापर यांनी सांगितलं की त्यावेळेस नरेंद्र मोदी त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नानं वैतागले आणि मुलाखत अर्धवट सोडून निघून गेले. त्यांनी मग मंत्री आणि पक्षनेत्यांनाही मुलाखत द्यायची नाही, असं फर्मान काढलं.

अर्थात ते हेही सांगतात की मोदींनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आक्रस्ताळेपणा न करता संयमाने दिली.

"तीन मिनिटांची मुलाखत झाली आणि मग मोदी उठून निघून गेले."

मोदींना नीरो म्हटलं

थापर पुढे सांगतात, "मला आठवतं की माझा पहिला प्रश्न होता की निवडणूकीला सहा आठवडे बाकी आहेत. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा उभे आहात. इंडिया टुडे आणि राजीव गांधी फाऊंडेशननं तुम्हाला सगळ्यांत चांगला मुख्यमंत्री म्हटलं आहे, तर दुसरीकडे हजारो मुसलमान तुमच्याकडे खूनी म्हणून बघतात. तुमच्यासमोर इमेजचा प्रश्न उभा आहे का?"

याचं उत्तर देताना मोदी म्हणाले की, फार कमी लोकांना त्यांच्याबद्दल असं वाटतं. बहुतांश लोक त्याच्याबद्दल असा विचार करत नाहीत.

यावर प्रत्युत्तर देताना थापर म्हणाले की हो, पण असं मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

दुसऱ्यांदा मुलाखतीला मोदींचा नकार

थापर म्हणाले, "सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायमूर्ती तुम्हाला आधुनिक काळातले नीरो म्हणाले. तो नीरो ज्याने निष्पाप मुलं आणि स्त्रियांची हत्या होत असताना तोंड फिरवलं होतं."

एकूण 4500 केसेसपैकी जवळपास 2600 केसेस गुजरातच्या बाहेर पाठवल्या याकडेही थापर यांनी नरेंद्र मोदींचं लक्ष वेधलं.

"सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारची अनेक मतं व्यक्त केली आहेत. या गोष्टी हेच दाखवून देतात की तुम्हाला गुन्हेगार मानणारे कमी नाही तर बरेच लोकं आहेत."

तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले की जे लोकं असं म्हणतात ते खुश राहोत. यानंतर त्यांनी पाणी मागितलं.

"पण पाणी तर त्यांच्या शेजारीच ठेवलेलं होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की पाणी तर एक बहाणा आहे. त्यांना मुलाखत संपवायची होती. त्यांनी माईक काढून टाकला आणि मुलाखत संपली."

मुलाखत पुन्हा सुरू करण्यासाठी थापर यांनी नरेंद्र मोदींची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मुलाखत पुन्हा सुरू करायला नकार दिला.

थापर सांगतात, "मोदींचं आदरातिथ्य खूप छान होतं. त्यांनी मला चहा, मिठाई आणि ढोकळे यांचा आग्रह केला. पण मुलाखतीला साफ नकार दिला."

एका तासाच्या प्रयत्नानंतर थापर तिथून निघून गेले.

तीस वेळा दाखवला एक व्हीडिओ

मुत्सदी, लेखक आणि आता राजकीय नेता यांच्या हवाल्याने थापर सांगतात की, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पवन वर्मांना सांगितलं की 2014 निवडणुकांची तयारी करताना ही मुलाखत नरेंद्र मोदींना कमीत कमी 30 वेळा दाखवण्यात आली.

पवन वर्मा यांनी मात्र असं काही घडल्याचा इन्कार केला.

पवन वर्मांनीच ही गोष्ट त्यांना सांगितली यावर करण थापर ठाम होते.

"मला आठवतंय, जेव्हा पवन वर्मांची नजर त्या फोटोवर पडली ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री माईक काढून मुलाखत अर्धवट सोडून परत जात आहेत. त्यांनी विचारलं की हा तोच क्षण ना जेव्हा ते मध्येच उठून निघून गेले? मी म्हटलं हो."

Image copyright BBC/MANISH SAANDILYA
प्रतिमा मथळा प्रशांत किशोर

"यानंतर मला पवन म्हणाले की प्रशांत किशोर यांनी सांगितलं की त्यांनी तीन मिनिटांची ही क्लीप नरेंद्र मोदींना 20-30 वेळा दाखवली आहे. अवघड, विचित्र प्रश्नांचा सामना कसा करावा हे शिकवण्यासाठी ही क्लीप इतक्या वेळा दाखवण्यात आली.

मोदींनी या प्रसंगातून धडा घेतला. पण प्रशांत किशोरना सांगितलं की ते हा प्रसंग कधी विसरणार नाहीत. ते याचा बदला नक्की घेतील."

2016 नंतर भाजपचा कोणताही नेता करण थापरांशी बोललेला नाही. हा त्यांचाच बदला तर नाही ना?

करण थापर म्हणतात त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात 2016च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झाली.

"जानेवारी 2017मध्ये मी भाजप नेते राम माधव यांची मुलाखत केली होती. कोणत्याही भाजप नेत्याची मी घेतलेली ही शेवटची मुलाखत होती. भाजपच्या अनेक प्रवक्त्यांनी, नेत्यांनी मला सांगितलं की त्यांना आदेश दिला होता की मला कोणत्याही प्रकारची मुलाखत द्यायची नाही."

"अमित शाह, नृपेंद्र मिश्र, अजित डोवाल यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांशी माझी भेट झाली. पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की मी पुर्वग्रह दुषित आहे आणि माझ्याशी बोलून काही उपयोग नाही.

पुर्वग्रह दुषित?

मी पुर्वग्रह दुषित नाही असं थापर यांचं म्हणणं आहे. पंतप्रधानांनी कोणत्याही पत्रकारावर बहिष्कार करणं हे योग्य नाही, असं ते म्हणतात. त्यांचं पुस्तक 'डेव्हिल्स अॅडव्होकेट : द अनटोल्ड स्टोरी' नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)