#5मोठ्याबातम्या : ठरवलं तर एक मिनिटात मुख्यमंत्री होईन - हेमा मालिनी

भाजप, कोलकाता Image copyright AFP
प्रतिमा मथळा हेमा मालिनी

पाहू या आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. ठरवलं तर एका मिनिटात मुख्यमंत्री होईन - हेमा मालिनी

मी ठरवलं तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते. पण माझी तशी इच्छा नाही, कारण त्यामुळे माझ्यावर बंधनं येतील. माझं स्वातंत्र्य संपेल, असं वक्तव्य भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केलं. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

हेमा मालिनी या उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. तुम्हाला संधी मिळाल्यास मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न त्यांना राजस्थानमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना हेमा मालिनी यांनी हे उत्तर दिलं. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

अभिनय क्षेत्रातील कामामुळेच मला आजही ओळखलं जातं आणि मी खासदार म्हणून निवडून येण्यातही याच प्रसिद्धीचा मोठा वाटा आहे, असं हेमा मालिनी यांनी सांगितलं.

खासदार होण्याआधीही मी पक्षासाठी काम केलं. आता खासदार झाल्यावर मला लोकांसाठी काम करण्याची संधी मिळते. गेल्या चार वर्षांमध्ये रस्त्यांपासून इतर अनेक बाबतीत विकासाची कामं मी केली आहेत, असा दावा त्यांनी केला.

2. शहा-ठाकरे भेटीत मुख्यमंत्री बदलाची चर्चा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील भेटीत मुख्यमंत्री बदलावर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

शिवसेनेने नेतृत्व बदलाची मागणी केली असून, अपयशी मुख्यमंत्री बदलला तरी राज्यात सत्तांतर अटळ असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी चव्हाण सांगलीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा

राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील भेटीनंतर सुरू आहे. या भेटीतच मुख्यमंत्री बदलाची चर्चा झाल्याची आणि काही नावे पुढे आल्याची शक्यता आहे. सरकार चालवण्यासाठी अनुकूल परिस्थिती, एकहाती निर्णय घेण्याचे अधिकार आणि बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात अपयशी मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन अटळ आहे असं चव्हाण यांनी सांगितलं.

3. मराठा आरक्षणासाठी शनिवारी सर्वपक्षीय बैठक

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्यात शनिवारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध नेत्यांशी संवाद साधत आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अनेक नेत्यांशी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली. 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत बातमी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून झालेली कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाचे काम जलदगतीने व्हावे अशी विनंती राज्य सरकार आयोगाकडे करणार आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मराठा आरक्षण

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय उच्च न्यायालय आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडे प्रलंबित आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाईल माझ्याकडं असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिलं असतं, असं राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं.

आरक्षणाच्या प्रश्नावर मी मराठा समाजाच्या सोबत आहे. मी मराठा बांधवांची दूत बनणार आहे. आरक्षण मिळावं यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन असं आश्वासन पंकजा यांनी दिलं.

4. हॉस्पिटलच्या नावात 'धर्मादाय' शब्द हवा

राज्यातील सुमारे 430 धर्मादाय रुग्णालयांनी आपल्या नावात धर्मादाय किंवा चॅरिटेबल हा शब्द समाविष्ट करावा, असे महत्वपूर्ण आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिला आहे. कोणत्या रुग्णालयात विनाशुल्क उपचार होणाऱ्या खाटा आहेत याची माहिती रुग्णांना सहजपणे मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धर्मादाय रुग्णालयांना आपल्याकडील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांकरता आणि 10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखून ठेवणं बंधनकारक आहे. येथे या रुग्णांवर विनामूल्य तसेच कमी दरात उपचार होणं अपेक्षित आहे.

5. मोदींचा ऑटोग्राफ आणि मुलीला लग्नाच्या मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सही मिळणं तुमचं नशीब बदलू शकतं. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून साधारण दोनशे किलोमीटरवर असलेल्या मिदनापूर गावातल्या रिता मुदीला लग्नाच्या मागण्या येऊ लागल्या आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

16 जुलैला रिता आपल्या आई आणि बहिणीसह मिदनापूर येथे पंतप्रधान मोदींच्या भाषणसाठी गेल्या होत्या. त्या तिघी एका तंबूखाली बसल्या होत्या. तो तंबू कोसळला आणि रिता जखमी झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. थोड्या वेळाने पंतप्रधान मोदींनी सर्व जखमींची विचारपूस केली. त्यावेळी ते रितालाही भेटले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी

"तुम्हाला भेटून आनंद झाला असं मी त्यांना सांगितलं. त्यांना स्वाक्षरीसाठी विनंती केली. ते सुरुवातीला तयार नव्हते. पण मी आग्रह केला आणि त्यांनी स्वाक्षरी दिली. रिता, तू लवकर बरी हो अशा संदेशासह त्यांनी स्वाक्षरी दिली" , असं तिने सांगितलं.

या स्वाक्षरीमुळे रिता तिच्या गावात सेलिब्रेटी ठरली. आमच्या घरात पाहुण्यांची रीघ लागली आहे. गंमत म्हणजे रिताला लग्नासाठी मागण्या येऊ लागल्या आहेत. एक झारखंडमधल्या टाटानगरचं आहे तर दुसरं स्थळ बांकुरा गावचं आहे. आमच्या दोन मुलींनी शिकावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्हाला या स्थळांमध्ये स्वारस्य नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)