मराठा आरक्षण : चाकणमध्ये जाळपोळ; जमावबंदी लागू

आंदोलनादरम्यान वाहनं जाळण्यात आली. Image copyright Avinash Dudhvade
प्रतिमा मथळा आंदोलनादरम्यान वाहनं जाळण्यात आली.

मराठा आरक्षणावरून एकीकडे राजकीय पक्षांच्या बैठका सुरू असताना दुसरीकडे पुण्याजवळ चाकण इथं मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलं, तर औरंगाबादेत एकाने आत्महत्या केली.

पुण्याजवळ चाकणमध्ये अचानक हिंसक झालेल्या जमावानं रस्त्यावरील वाहने पेटवण्यास सुरुवात केली. दीडशे ते दोनशे वाहनं फोडण्यात आली, असं तिथल्या स्थानिक पत्रकार आणि प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

चाकण इथले पत्रकार अविनाश दुधवडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना नेमकं काय घडलं? याविषयीची माहिती दिली.

दुधवडे म्हणाले, "सकाळी 11च्या सुमारास स्थानिक सर्वपक्षीय आंदोलन होतं. मोर्चा शांततेत झाला. त्यानंतर तळेगांव-चाकण रस्त्यावर 2 ते 3 हजारांचा जमाव जमलेला होता. तो बाहेरचाच होता. त्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. कोणाला समजलंच नाही काय होतंय."

ते पुढे म्हणाले, "नंतर तो जमाव नाशिकच्या दिशेच्या रस्त्याकडे गेला. तिकडे ज्या गाड्या होत्या त्या पेटवायलाच त्यांनी सुरुवात केली. दुपारी 2 पर्यंत हे असंच सुरू होतं. पोलीस आले तर त्यांच्यावर आणि गाड्यांवर दगड मारायला सुरुवात केली. इथले पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारीही जखमी झाले आहेत."

Image copyright Avinash Dudhvade
प्रतिमा मथळा संतप्त जमावानं वाहनांची तोडफोड केली.

स्वतः अविनाश दुधवडे यांनादेखील दगडफेकीत थोडा मार लागला आहे.

"आम्ही पत्रकारही तिथं होतो. कोणालाही मोबाईल वा कॅमेरा बाहेर काढू दिला जात नव्हता. अंदाजे 150 ते 200 गाड्या जमावानं फोडल्या. 50पेक्षा जास्त वाहनं जाळली असावीत. स्थानिक नेते, पोलीस सगळं वातावरण शांत करायचा प्रयत्न करताहेत. पण परिस्थिती गंभीर आहे", असं दुधवडे म्हणाले.

Image copyright Avinash Dudhvade

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माहिती दिली की, "काही कार्यकर्त्यांनी आज खेड तालुका बंदचं आवाहन केलं होतं. सकाळी शांततेत बंदला सुरुवात झाली. पण दुपारनंतर चाकणमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी प्रक्षोभक भाषण करून लोकांना चिथवलं आणि त्यामुळे ही दंगल आटोक्याच्या बाहेर गेली. पोलीस स्टेशनची तोडफोड झाली. पोलिसांच्या गाड्या जाळल्या. 100 वाहनं जाळली. दुकानांची तोडफोड झाली. मी सर्वांना शांततेचं आवाहन करतो आहे."

औरंगाबादेत एका तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून औरंगाबादेतील मुकुंदवाडी भागात प्रमोद होरे पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

Image copyright Facebook/Pramod Patil
प्रतिमा मथळा प्रमोद पाटील

बीबीसी मराठीसाठी औरंगाबादहून काम करणाऱ्या अमेय पाठक यांनी माहिती दिली की, मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी दुपारी अडीच वाजता त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. 'चला आज एक मराठा जातोय. पण काही तरी करा. मराठा आरक्षणासाठी करा. जय जिजाऊ. आपला प्रमोद पाटील.' असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

घरच्यांनी आणि मित्रांनी त्यांची शोधाशोध केली. पण अखेर मध्यरात्री मुकुंदवाडी भागात रेल्वेखाली उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांना समजलं.

Image copyright Social media grab
प्रतिमा मथळा सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट फिरते आहे.

औरंगाबादेत आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. या बैठकीनंतर राज्य समन्वयक विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सर्व तरुणांना शांततेचं आवाहन केलं. शासकीय मालमत्तेचं नुकसान करू नये तसंच शांततेत ठिय्या आंदोलन सुरू ठेवावं असंही ते म्हणाले.

आतापर्यंत चार लोकांनी आत्महत्या केली. यापुढे कुणीही असं कृत्य करू नये. तरुणांनी शांतता बाळगावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

राजकीय पक्षांच्या बैठका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईत आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

Image copyright Getty Images

मागासवर्गीय आयोगाच्या निर्णयाची वाट न पाहता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर तातडीने विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असंही ते म्हणाले.

मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी राज्यपाल आणि मागासवर्ग आयोगाची भेट घेण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)