ग्राउंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळालं, पण कर्जमाफी नाहीच

मनकर्णाबाई तपासे आणि कैलास तपासे Image copyright BBC/SHRIKANT BANGALE
प्रतिमा मथळा मनकर्णाबाई तपासे आणि कैलास तपासे

18 ऑक्टोबर 2017ला हिंगोली जिल्ह्यातल्या साटंबा गावातल्या 13 शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रं देण्यात आली होती. वर्ष होत आलं तरी यातले काही शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. हिंगोलीपासून 12 किलोमीटर अंतरावरच्या साटंबा गावात जाऊन बीबीसी मराठीनं केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.

18 ऑक्टोबर 2017. सकाळी 10च्या सुमारास गावातल्या पारावर लाऊड स्पीकरवरून घोषणा होते...

'कैलास तपासे, धनाजी घ्यार, हरी घ्यार, सोपान तपासे, जयराम तपासे, श्रीराम घ्यार, ज्ञानोबा घ्यार आणि वैजनाथ घ्यार,... आदी शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आहे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पत्नीसहित पाराजवळ हजर राहावं.'

तिथून 2 जीप गाड्या गावातल्या या 13 शेतकरी जोडप्यांना घेऊन हिंगोलीला जातात.

"आम्हाला कलेक्टर हाफिसला घेऊन गेले. तिथं आमदार, कलेक्टर आणि पालकमंत्र्यायनी आमचा सत्कार केला. माणसायला रुमाल, टोपी, शर्ट आणि पँटचा कपडा तर बायायला साडी-चोळी दिली. त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र दिलं," या 13 शेतकरी जोडप्यांपैकी एक असलेल्या मनकर्णाबाई कैलास तपासे सांगतात.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : 'मुख्यमंत्र्यांच्या सहीचं प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ झालं नाही'

हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे असून ते सामाजिक न्याय राज्यमंत्रीसुद्धा आहेत.

'नुसते सत्कारच झाले, कर्ज माफ झालं नाही'

"तुमचं कर्ज माफ झालं असं सांगून आम्हाला प्रमाणपत्र दिलं. पण आता दिवाळीला या गोष्टीला 1 वर्ष होईल, तरी आमचं कर्ज माफ झालेलं नाही," मनकर्णाबाई पुढे सांगतात.

Image copyright BBC/Shrikant Bangale
प्रतिमा मथळा धनाजी घ्यार आणि लक्ष्मीबाई घ्यार यांचा कपडेलत्ते देऊन सत्कार करण्यात आला होता.

साटंबा या गावाला हिंगोलीच्या बँक ऑफ बडोदा शाखेनं दत्तक घेतलं आहे. मनकर्णाबाई यांचे पती कैलास यांचं याच बँकेत खातं आहे. 2 एकर शेती असलेल्या मनकर्णाबाई यांच्या पतीनं या बँकेतून 50,000 रुपये पीक कर्ज घेतलं होतं.

"आमचे मालक दर आठवड्याला बँकेत चकरा मारतात. पण तिथले साहेब लोक म्हणतात, तुमचं कर्ज माफ झालं नाही, तुम्ही आमच्याकडे येऊ नका," बँकेतील अनुभवाबद्दल मनकर्णाबाई सांगतात.

"कर्ज माफ झालं नाही त्यामुळे आम्ही सावकाराचं कर्ज उचलून पेरण्या केल्या. यंदा डबल पेरणी झाली. दोन पेरण्या झाल्यावर काय येणार शेतात? डबलच्या पेरणीला जास्त काही येत नाही," मनकर्णाबाई त्यांची चिंता व्यक्त करतात.

Image copyright BBC/SHRIKANT BANGALE
प्रतिमा मथळा कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळालं पण कर्ज माफ झालं नाही, असं साटंबा गावातल्या या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

"बाकीच्यांचं कर्ज माफ होत आहे. पण आमचं काहीच नाही अजून. नुसते सत्कारच झाले आमचे. कर्ज माफ झालं तर आम्हाला पुन्हा कर्ज मिळेल, सावकाराकडे जायची पाळी येणार नाही," मनकर्णाबाई पुढे सांगतात.

मनकर्णाबाई यांच्याशी बोलून झाल्यानंतर धनाजी घ्यार आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले.

'मुख्यमंत्र्यांनाच जाऊन भेटा'

"माझ्यावर बँकेचं 60,000 रुपये कर्ज आहे. कर्ज माफ झालं म्हणून माझा आणि माझ्या बायकोचा दिवाळीच्या टाईमाला सत्कार करण्यात आला. आम्हाला कर्जमाफीची प्रमाणपत्रं दिली. पण आता 9 महीने उलटले तरी आमचं कर्ज माफ झालं नाही," 60 वर्षीय धनाजी यांनी सांगायला सुरुवात केली.

धनाजी यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे.

Image copyright NILESH GARWARE
प्रतिमा मथळा ऑक्टोबर महिन्यात दिलीप कांबळे यांच्या हस्ते साटंब्यातील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला होता.

"बँकेत मी लय खेपा मारल्या. पण बँकेवाले म्हणतात, तुम्ही कलेक्टरकडे जा की कुठेही जा, आमच्याकडे तुमचे पैसे जमा झालेले नाहीत. मुख्यमंत्र्यांची सही आहे असं म्हटलं तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा, असं बँकवाले म्हणतात," धनाजी पुढे सांगतात.

"काही दिवसांपूर्वी कर्जमाफीची एक यादी लागली. त्यातही आमचं नाव आलं नाही. कर्ज माफ नसल्यामुळे आम्हाला दुसरी बँकही कर्ज देत नाही. तुम्हाला बडोदा बँकेनं दत्तक घेतलं आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही, असं दुसऱ्या बँकेवाले म्हणतात," धनाजी त्यांची व्यथा मांडतात.

"सरकारनं पीकाला चांगला भाव द्यायला पाहिजे. पीकाला भाव द्या म्हणून आम्ही लय खेपा मोर्चे काढले पण सरकार त्यालाही तयार नाही," शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्जमाफी हाच उपाय आहे का, असं विचारल्यावर धनाजी सांगतात.

'बँक म्हणते...कर्जमाफीसाठी पात्र नाही'

साटंब्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठपर्यंत आली, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हिंगोलीच्या बँक ऑफ बडोदा शाखेशी संपर्क केला.

"साटंबा गावातल्या 13 जणांपैकी 4 जणांचं कर्ज अगोदरच माफ झालं आहे. गेल्या 7 जुलैला इतर 3 जणांचं कर्ज माफ झालं. बाकी 6 जणांची प्रकरणं अजून निकाली लागायची आहेत," असं बँक ऑफ बडोदाच्या हिंगोली शाखेचे व्यवस्थापक दुर्गादास कोडगीरकर यांनी सांगितलं.

Image copyright BBC/SHRIKANT BANGALE
प्रतिमा मथळा 'स्वच्छ आणि सुंदर गाव साटंबा' अशाप्रकारे पाहुण्यांचं स्वागत करतं.

मनकर्णाबाई कैलास तपासे यांच्या कर्जमाफीबद्दल विचारल्यावर ते सांगतात, "31 मार्च 2016 पूर्वी ज्यांनी कर्ज घेतलं आहे तेच कर्जमाफीच्या योजनेसाठी पात्र ठरतात. कैलास तपासे यांनी त्यानंतर म्हणजेच 22 जून 2016ला बँकेकडून 50,000 रुपये कर्ज घेतलं आहे. त्यामुळे ते कर्जमाफीसाठी पात्र नाहीत."

धनाजी घ्यार यांच्याबद्दल विचारल्यावर ते सांगतात, "धनाजी घ्यार यांनीही 31 मार्च 2016 नंतर म्हणजेच 27 मे 2016ला बँकेकडून 60,000 रुपये कर्ज घेतलं होतं, त्यामुळे तेसुद्धा कर्जमाफीसाठी पात्र नाहीत."

बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा सल्ला देतात ही शेतकऱ्यांची तक्रार सांगितल्यावर, 'शेतकऱ्यांचा आरोप चुकीचा आहे', असं कोडगीरकर म्हणतात.

स्थानिक प्रशासन काय म्हणतं?

यानंतर आम्ही हिंगोलीचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी संपर्क केला. साटंबा येथील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाबाबत बोलताना ते सांगतात, "सगळं काही ऑनलाईन आहे. जेव्हा पुढची ग्रीन लिस्ट लागेल तेव्हा पात्र शेतकऱ्यांची नावं यादीत येतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल."

मनकर्णाबाई कैलास तपासे आणि धनाजी घ्यार हे कर्जमाफीसाठी पात्र ठरत नाहीत असं बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रं कशी देण्यात आली याबाबत जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले, "या प्रकरणांची वस्तुस्थिती काय आहे ते फाईल बघूनच सांगता येईल. पण सत्कार करण्यात आलेल्या नावांची यादी निबंधक कार्यालयाकडून आली होती. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला."

Image copyright BBC/SHRIKANT BANGALE
प्रतिमा मथळा मनकर्णाबाई तपासे आणि कैलास तपासे यांचं घर.

यानंतर आम्ही हिंगोलीचे जिल्हा उपनिंबधक सुधीर मेत्रेवार यांच्याशी संपर्क केला.

"आम्हाला महाऑनलाईननं 100 लोकांच्या नावांची यादी पाठवली होती. त्यातल्या 20 ते 25 जणांचा सत्कार करा, असं आम्हाला सांगितलं होतं. मग आम्ही हिंगोलीतल्या 21 शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला."

"या 21 पैकी 13 लोकांची नावं ग्रीन लिस्ट मध्ये आली आहेत. बाकी 8 पैकी कोणाचंही नाव ग्रीन लिस्टमध्ये नाही. या राहिलेल्या 8 शेतकऱ्यांची सरकारनं पुन्हा माहिती मागितली आहे. त्यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे," साटंबा आणि इतर गावातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मेत्रेवार सांगतात.

Image copyright BBC/SHRIKANT BANGALE
प्रतिमा मथळा तुमचा सात बारा आज कोरा होतोय, असं मुख्यमंत्र्यांची सही असलेलं प्रमाणपत्र मनकर्णाबाई कैलास तपासे यांना निमंत्रण पत्रिकेसोबत मिळालं आहे.

साटंब्यातील मनकर्णाबाई कैलास तपासे आणि धनाजी घ्यार हे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र नाही, असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, असं असेल तर कर्जमाफीचं प्रमाणपत्र त्यांना कसं काय देण्यात आलं, असं विचारल्यावर मेत्रेवार सांगतात, "कर्जमाफीसाठी एखाद्याला पात्र करणं अथवा न करणं हे आमच्या हातात नाही. ते महाऑनलाईन करत असतं. कुणीही मॅन्युअली हे काम करत नाही. आम्हाला महाऑनलाईनकडून यादी आली आणि आम्ही शेतकऱ्यांचा सत्कार केला."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)