Kiki Challenge : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या किकी चॅलेंजचा पोलिसांना ताप

कीकी चॅलेंज

फोटो स्रोत, Instagram/aarizsaiyed

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. 'आइस बकेट चॅलेंज' असो किंवा मोदींचं 'फिटनेस चॅलेंज' असो... 'ब्लू व्हेल चॅलेंज'सारख्या जीवघेण्या खेळाने जगभरात अनेक बळीही गेले. सध्या किकी चॅलेंज नावाने गाडीतून उतरून डान्स करण्याचा प्रकार सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

सध्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बघाल तिथे 'किकी चॅलेंज' दिसेल. लोक आपल्या जीवाची बाजी लावत, चालत्या गाडीतून उतरून रोडवर डान्स करायला सुरुवात करतायत. हे करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे 'किकी चॅलेंज'.

सुरुवातीला अनेकांनी गाण्याच्या चालीवर चाल धरत हे चॅलेंज स्वीकारलं खरं, पण आता देशातल्याच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पोलिसांनी यावर बंदी घालत, ही नसती चॅलेंज स्वीकारू नयेत असं आवाहन केलं आहे.

तरुण राठोड हा डान्सर असून त्याच्या किकी चॅलेंजचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत तो चालत्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरून तो नाचू लागतो.

'...कारण हे ट्रेंडमध्ये आहे. अनेक डान्सर अशा प्रकारच्या पोस्ट करत आहेत. म्हणून हे माझ्याकडून... थेट ड्रायव्हिंग सीटवरून', अशी कॅप्शन व्हीडिओला दिली आहे.

आरिझ सैयद यांनी चक्क आपल्या आईचा कीकी चॅलेंजचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या मावशींचा उत्साह तर इतका आहे की, त्यांना मागून हॉर्न दिलेल्यांना त्या ओरडताना दिसतात. त्यामुळेच कदाचित आरिझ यांनी आपल्या पोस्टमध्ये 'हा व्हीडिओ जसा माझ्या आईने प्लॅन केला होता, तसा झाला नाहीये. पण तरी...' असं म्हटलं असावं.

तर सिम्मी गोरया यांनी देखील आपला व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

नेटिझन्सचा या चॅलेंजकडे वाढता कल पाहता पोलिसांनी देखील या चॅलेंजबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सोशल कॅम्पेन सुरू केली आहेत.

मुंबई पोलिसांनी या चॅलेंजबद्दल एक ट्वीट केलं आहे. त्याचीही सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की 'हे चॅलेंज म्हणजे फक्त तुमच्या जीवाला धोका आहे, असं नाही तर तुमच्या अशा वागण्यामुळे इतरांच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. लोकांना अशा प्रकारच्या चॅलेंजच्या माध्यमातून त्रास द्यायचं थांबवा. नाहीतर कारवाईसाठी तयार राहा.'

या ट्वीटमध्ये मुंबई पोलिसांनी #DanceYourWayToSafety आणि #InMySafetyFeelingsChallenge हे हॅशटॅग वापरले आहेत.

मुंबई पोलिस कायमच सुरक्षित रस्ते प्रवासाबद्दलचे ट्वीट करताना पाहायला मिळतात.

दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी थेट पालकांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'किकीचं मुलांवर प्रेम आहे की नाही ते माहीत नाही. पण तुम्ही तुमच्या मुलांवर नक्की प्रेम करत असाल. म्हणूनच हे किकी चॅलेंज वगळता तुमच्या मुलांच्या आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानात त्यांच्याबरोबर उभं राहा.'

पोलिसांनी #KiKiHardlyAChallenge हा हॅशटॅग वापरला आहे.

फोटो स्रोत, Instagram

काय आहे हे 'किकी चॅलेंज'?

या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्वीकारणाऱ्याने सगळ्यांत आधी चालत्या गाडीतून खाली उतरायचं. मग हळूहळू चालणाऱ्या गाडीच्या दराजवळ नाचायचं आणि काही सेकंदात पुन्हा त्या चालत्या गाडीत येऊन बसायचं.

बरं हे सगळं शूट कोण करणार? तर जी व्यक्ती गाडी चालवत असते तीच या नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शूट करते.

'किकी चॅलेज' नाव कसं पडलं?

जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर डर्कने गायलेल्या 'इन माय फिलींग्स' गाण्यातील पहिल्या कडव्यातील चालीवर हा डान्स केला जातो. या गाण्यातील पहिल्या कडव्याचे बोल 'किकी डू यू लव्ह मी' असे असल्याने या चॅलेंजला 'किकी चॅलेंज' असं नाव पडलं आहे.

अनेकांनी #KiKiChallenge हा हॅशटॅग वापरून या चॅलेंजचा व्हीडिओ शेअर केला आहे. तसंच हे चॅलेंज काही देशांमध्ये #InMyFeelingsChallenge' या नावाने ही ओळखले जातो.

फोटो स्रोत, Instagram/deepika_pilli

सुरुवात कुठून झाली?

महिन्याभरापूर्वी शॅगी नावाच्या एका कॉमेडियनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'डर्क'च्या 'इन माय फिलींग' या गाण्यावर ठेका धरतानाचा व्हीडीओ पोस्ट केला.

या व्हीडीओमध्ये शॅगीने एका जागी उभं राहून डान्स केला होता. मात्र शॅगीचा मित्र आणि अमेरिकेतील फुटबॉलपटू ओडेल बेकमह ज्युनियर याने याच गाण्यावर गाडीतून उतरून डान्स करत पुन्हा गाडीत येऊन बसल्याचा व्हिडीओ पोस्ट केला, आणि या ट्रेंडला इथूनच सुरुवात झालं अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.

जगभरातल्या पोलिसांचं आवाहन

दरम्यान या चॅलेंजमुळे काही जणांना हे चॅलेंज करताना गंभीर दुखापत झाल्याने स्पेन, अमेरिका, युएई आणि मलेशियातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे.

तर फ्लोरिडामधील पोलिसांनी अशा प्रकारे चालू गाडीतून बाहेर येऊन नाचणाऱ्यांना चक्क एक हजार डॉलरचा दंड आकारला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)