मराठा मोर्चा : '५८ मूक मोर्चानं कमावले ते दगडफेकीत घालवू नका'

चाकणमध्ये झालेली जाळपोळ

फोटो स्रोत, AVINASH DUDHVADE

फोटो कॅप्शन,

चाकणमध्ये झालेली जाळपोळ

मराठा आंदोलनात काही समाजविघातक शक्ती शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत आणि सरकारचं मौनसुद्धा तरुणांना भडकावण्याचं काम करत आहे, असं काही वाचकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. ५८ मूक मोर्चांनी कमावलं ते दगडफेकीत घालवू नका, असं आवाहनही काहींनी केलं आहे.

मराठा आंदोलनादरम्यान राज्यात काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलनादरम्यान होत असलेल्या हिंसाचारावर बीबीसी मराठीनं वाचकांची मतं मागितली होती.

फोटो कॅप्शन,

आजचा प्रश्न

तुषार राऊत म्हणतात, "आपला समाज म्हणजे झुंडशाही नाही. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करायला तयार होतात, हे त्याचंच उदाहरण मला वाटतं. मराठा समाजाच्या मागण्यांशी सहमत किंवा असहमत असणाऱ्या सर्वांनी शांतता मोर्चाचं स्वागत केल होतं. मागण्या मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण त्यासाठी लोकांना वेठीस धरू नये."

मराठा तरुणांनो जरा समजून घ्य, असं आवाहन राजरत्न अंभोरे करतात. ते लिहितात, "मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर आला आहे. हे रस्त्यावर येणं आता हिंसक होऊ लागलं आहे. पोलिसांवरही हल्ले होत आहेत. सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात लटकला आहे. हा मुद्दा लगेच सुटण्यासारखा नाही. कोणताही पक्ष किंवा संघटना यांनी कितीही दावा केला असला तरी न्यायालयातच या प्रश्नावर मार्ग निघणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर हिंसाचार करून काहीही उपयोग होणार नाही. हातात दगड घ्यायची घाई करू नका. जे ५८ मूक मोर्चांनी कमावलं ते दगडफेकीत घालवू नका."

कांतीलाल ओसवाल म्हणतात, "नदीत उडी टाकण्यापूर्वी, विष खाण्यापूर्वी घरी असणाऱ्या मायबापाची परवानगी घ्या. तुम्हाला प्रवृत्त करणारे गल्लीबोळातले नेते तुमच्या बलिदानावर आमदार होणार आहेत. आईबापाला म्हातारपणी हलाखीत सोडून मिळालेल्या आरक्षणाचा काहीही उपयोग असणार नाही. आपल्या जीवाचं मोल आपण जाणलं पाहिजे. आंदोलनांनी केवळ सरकारं बदलतात. न्यायव्यवस्थेला काहीही फरक पडत नाही."

अमेय बडदारे म्हणतात, "मराठा मोर्चाच्या आंदोलन संहितेमध्ये हिंसाचार करू नये, असे स्पष्ट लिहिलं गेलं आहे. आतापर्यंतच्या सर्व आंदोलनांचा विचार केला तर सर्व आंदोलन सुरुवातीला शांततेत सुरू होते. पण नंतर या आंदोलनाच्या उत्तरार्धात हिंसाचार सुरू झाला. आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून काही समाजविघातक शक्ती आंदोलनात येऊन शांतता बिघडवण्याचं काम करतायेत. आणि सरकारचे मौन हे सुद्धा तरुणांना भडकवण्याचं काम करतेय."

सचिन कटारे म्हणतात, "समाजाला न्याय मिळावा यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनं, निदर्शनं करणं योग्य आहे. पण यासाठी जनतेला वेठीस धरणे चुकीचं आहे. आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे पण सनदशीर मार्गाने."

दीपक पवार म्हणतात, "जेव्हा चिडलेला समाज रस्त्यावर उतरतो तेव्हा तो काय करतो हेच सर्वांना दिसत आहे, पण ती चीड कोणी व का निर्माण केली याचं कारण कोणीही समजून घ्यायला तयार नाही."

ओम शिंदे म्हणतात, "कोणताही मराठा नेता किंवा मराठा समाज हिंसेला प्रोत्साहन देत नाही. असं असतानाही हिंसेच्या घटना घडत आहेत. याची कारणं शोधली तर 58 मोर्चांनंतर शासनाची उदासीनताच याला कारणीभूत आहे असं नाईलाजानं म्हणावं लागेल."

राजेंद्र उतेकर म्हणतात, "शांततेत निघालेल्या 58 मोर्चाची योग्यवेळी दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती."

सुयोग पवार म्हणतात, "शांततेत मोर्चे चालू होते तेव्हा सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हवं होतं. त्याकडे सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केले असा संदेश गेल्याने परिस्तिथी बिघडली. सरकार गांभीर्याने घेत नाही, त्यामुळेच मराठा तरुण नाराज झाला. यातून असले प्रकार सुरू झालेत."

श्री चौधरी म्हणतात, "गुजरात, राजस्थान आणि कर्नाटकात पटेल, जाट आणि लिंगायत आरक्षणावरून आंदोलन सुरू झालं. निवडणुकांनंतर आता कोणीच तिथं आरक्षणाचं नाव घेत नाही. महाराष्ट्रातही तेच चालू आहे. कोण कोणाचा वापर करुन घेतं हे जनतेलाच समजायला हवं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)