अण्णा भाऊ साठे स्मृतिदिन: 'मी फकिराच्या लुटीच्या पैशातून गुटी प्यालेला कलावंत'

  • शीतल साठे
  • शाहीर
अण्णा भाऊ साठे प्रतिमा

फोटो स्रोत, Raju Sanadi, Karad

फोटो कॅप्शन,

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मदिनी कराडमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्यावरील हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

"कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाही. त्याबाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे. मी जे जगलो, जे अनुभवलं, ते मी लिहितो."

अण्णा भाऊ साठे स्वतःची ओळख अशी करून देत असत. अण्णा भाऊ हे एक प्रतिभावान व्यक्ती होते म्हणून अण्णाभाऊंची ओळख करून देताना त्यांना एकाच पैलूने बघणं फार अवघड आहे. एखाद्या हिऱ्याला अनेक पैलू तसंच अण्णा भाऊंचंही आहे.

एकाच वेळेला विपुल लेखन करणारे अण्णा भाऊ दुसऱ्या बाजूला स्टेज गाजवणारे शाहीरही आहेत. तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करणारे प्रतिभावंत आहेत. तसंच साहित्यिक, कुशल संघटक, नकलाकार, दांडपट्टा फिरवणारे उत्तम खेळाडू, अभिनेता, निष्ठावंत कार्यकर्ता असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्तवात दिसतात. हे सगळे पैलू मिळून तयार होणारं रसायन म्हणजे अण्णा भाऊ साठे आहेत.

अण्णा भाऊंचं खरं नाव तुकाराम. खरं म्हणण्यापेक्षा बालपणीचं नाव. त्यांच्या वडिलांचं नाव भाऊ साठे . कालांतराने अण्णांचे लहान भाऊबहीण त्यांना अण्णा म्हणू लागले. त्यामुळे अण्णांचे साथीदारही त्यांना अण्णा भाऊ म्हणू लागले. लहानपणापासूनच अवलिया असणाऱ्या अण्णांनी दीड दिवसाच्या वर शाळेचं तोंडही पाहिलं नाही. पण याचा अर्थ असाही नाही की अण्णांचं शिक्षण थांबलं.

मुंबईत आल्यावर अण्णा रात्रशाळेत राहिले. शिक्षणाची अथांग प्रेरणा असणाऱ्या अण्णा भाऊंनी दुकानाच्या पाट्या वाचायला सुरुवात केली. कम्युनिस्ट चळवळीतील साथीदारांनी अण्णांना शिकवलं. फेरीवाल्यांची कामं करता करता ते गुजराती मूक चित्रपट पाहात. या चित्रपटांच्या कॅप्शन पाहात वाचण्याच्या धडपडीतून ते साक्षर झाले. शाळेतलं एका चौकटीतलं शिक्षण जरी त्यांनी घेतलं नसलं, तरी जीवनाच्या पाठशाळेत अण्णा भाऊंनी अक्षरं गिरवली. अनुभवांनी सक्षम होता होताच ते साक्षर झाले.

लुटीच्या पैशातून घुटी पिलेला कलावंत

अतिशय खडतर आयुष्य, कमालीचं दारिद्र्य या संघर्षाच्या भट्टीत स्वत:ला तावून सुलाखून काढणारे अण्णा भाऊ स्वत:ची ओळख करून देताना म्हणतात, "मी असा-तसा कलावंत नाही. फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला मी कलावंत आहे."

फोटो स्रोत, Government of India

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

स्वत:ला फकिराच्या स्वातंत्र्यलढ्याशी जोडून घेणारे अण्णा भाऊ ओघाने स्वातंत्र्यानंतर चाललेला खऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईत स्वत:ला झोकून देतात.

खरंतर अण्णा भाऊ ज्या मातीत वाढले, ती माती क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वाळव्याची क्रांतिकारी माती. प्रतिसरकारची चळवळ त्यावेळेला शिगेला पोहोचली होती.

जरी अण्णा भाऊ जास्त काळ वाटेगावला राहिले नसले, तरी फकिराच्या बंडाचा व नाना पाटलांच्या प्रतिसरकारचा त्यांच्यावर प्रभाव दिसतो.

अण्णा भाऊंच्या विचारधारा समजून घेताना हे ठामपणे सांगावं लागतं की अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या साम्यवादी विचारसरणीच्या पक्षाचे ते कार्ड होल्डर म्हणजेच सभासद होते. अण्णा भाऊंनी पार्टीसाठी भरपूर कार्यक्रम केले. कामगारांच्या लढ्यात संपात सभा गाजवल्या. पार्टी कार्यातून निष्क्रिय झाल्यावर त्यांनी कलापथकही स्थापन केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकर आणि अण्णा भाऊ या त्रिमूर्तींनी महाराष्ट्र पिंजून काढला. याच काळात लिहिलेली 'माझी मैना गावाकडे राहिली, माझिया जीवाची होते काहिली' या छक्कडीने महाराष्ट्रावर आजही भुरळ घातली आहे. पार्टीपत्रिका, युगांतरमधून त्यांनी स्तंभलेखनही केलं.

फोटो स्रोत, Sushil Lad

फोटो कॅप्शन,

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मदिनी वाटेगाव इथं सलाम लोकशाहिराला हा कार्यक्रम झाला.

लढ्यातली, संपातीतल कामगारांच्या जीवनाची गाणी लिहिता लिहिता अण्णाभाऊंनी 'फकिरा', 'चिता', 'वैजयंता', 'वारणेचा वाघ' अशा अनेक कथा कादंबऱ्यांचं लेखन केलं. त्यातील काही कथांच्या आधारे चित्रपटही निर्माण केले. फकिरा आणि वारणेचा वाघ हे त्या काळातले गाजलेले चित्रपट होय.

साहित्याचा गंध दूरवर

अण्णा भाऊंनी एकंदर 30 कादंबऱ्या, 22 कथा, 1 प्रवासवर्णन, 1 नाटक, 10 शाहिरी गीते, 15 वगनाट्य तमाशे, 1 छक्क्ड आणि 100पेक्षा अधिक गीते एवढं विपुल लेखन अण्णा भाऊंनी केलं. परंतु ब्राह्मणी साहित्यविश्वाने मुख्य प्रवाहाचा डांगोरा पिटत अण्णा भाऊंना नेहमीच परिघाबाहेर ठेवलं. हातच्या काकणाला आरसा कशाला या उक्तीप्रमाणे अण्णा भाऊ मनात दरवळत राहिले. त्यांच्या साहित्यपुष्पाचा सुगंध जात, पात, धर्म, देश ओलांडून सात समुद्रापल्याड गेला व ब्राह्मणी छावणीने अनुल्लेख केलेला शाहीर जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरित झाला.

जागतिक पातळीवर एवढी कीर्ती पावलेला हा शाहीर बहुधा भारतातला एकमेव असावा. रशियाचे मॅक्सिम गॉर्की हे अण्णा भाऊंचे लेखनविश्वाचे आदर्श. त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर बसूनच अण्णा भाऊ लिखाण करत असत. या अर्थाने अण्णा भाऊ जागतिक कीर्तीचे कलावंत, लेखक, साहित्यिक होते.

परंतु सद्य परिस्थितीत त्यांना एका जातीचा नेता, आदर्श महामानव या स्वरूपात पाहायला मिळतंय. अण्णा भाऊ ज्या जातीत जन्मले ती जात भारतीय जातवास्तवात शूद्रातिशूद्र समजली जाणारी मांग गुन्हेगारी जमात. या जातीला अण्णा भाऊ फार उशिरा कळले. जातीला अण्णा भाऊ कळले हे फार बरं झालं. परंतु त्यामुळे या जातीनेच त्यांच्यावर अधिकार गाजवावा, हे जातीत बंदिस्त करणारं वर्तन आहे.

तसं पाहता 1978 साली अण्णा भाऊंची पहिली जयंती अर्जुन डांगळे आणि रावसाहेब कसबे या आंबेडकरी चळवळीतील विचारवंत कार्यकर्त्यांनी सुरू केली. पण आज या जयंतीला जातीय स्वरूप आलेलं दिसतंय. मला प्रामाणिकपणे असं वाटतंय की जरी अण्णा भाऊ मातंग जातीत जन्माला आले असले, तरी जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या, देशाच्याही मर्यादा ओलांडून ते जागतिक झाले. समस्त शोषितांचे, वंचिताचे झाले.

अशा एका जागतिक दर्जाच्या शाहीर कलावंताला भारतातलं जात वास्तव मात्र जातीत बंदिस्त करू पाहत आहेत, ही एक शोकांतिका आहे. तसंही लेखक म्हणून अभ्यासक्रमात, साहित्यविश्वात आणि समाजजजीवनातही त्यांना योग्य स्थान मिळालं नाही. हा अण्णा भाऊंचा लेखणीवर, त्यांच्या प्रतिमेवर आणि त्यांच्या साहित्यातून झळकणाऱ्या वेदनेच्या हुंकारावर झालेला अन्यायच आहे.

जातीअंताचं भान

हेच अण्णा भाऊ जर उच्चजातीच्या वर्गात जन्माला आले असते तर वाट्याला ही उपेक्षा आली नसती. आपल्याकडे गुणवत्ता ही जातीच्या लेबलवर अवलंबून असते. परंतु अण्णा भाऊंनी हे गुणवत्तेचे सर्व मापदंड धुडकावून स्वत:ला सिद्ध केलं, यात तिळमात्र शंका नाही. त्यांचं लिखाण अर्थातच शृंगारिक वर्णनं आणि आध्यात्मिक कैचीत अडकणारं नव्हतं. मराठी वाङ्मयाचे सामर्थ्य आणि सौंदर्य वाढवणारा अण्णा भाऊ हा थोर प्रतिभावंत आहे. एका बाजूला स्तालिनग्रॅडचा पोवाडा लिहिणारे अण्णा भाऊ बुद्धाची शपथ ही कथासुद्धा लिहितात.

फोटो स्रोत, Sushil Lad

फोटो कॅप्शन,

लोकशाहिराला शाहिरांचा सलाम या वाटेगाव इथं झालेल्या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकांची दिंडी काढण्यात आली.

वर्गीय विश्लेषणाबरोबरच जातीअंताचं भान त्यांच्या साहित्याचं खरं चित्र आहे. बाबासाहेबांच्या जातीअंताच्या चळवळीशी जोडून घेताना 'जग बदल घालुनी घाव सांगूनी गेले भीमराव' हे आत्मभान अण्णा भाऊ जगताना दिसतात. भारतीय समाज केवळ वर्गीय नाही. इथे रशियाची नक्कल करता येत नाही, हे भान कम्युनिस्ट चळवळीत असूनसुद्धा अण्णाभाऊंना आहे. मुळात जातीव्यवस्थेमध्ये असणाऱ्या खालच्या पायरीवरून आलेले अण्णा भाऊ मूलत: जातीअंताची प्रेरणा घेवून जगताना दिसतात.

तसेच जातीअंताची चळवळ व वर्गअंताची चळवळ हातात हात घालून चालवण्याची प्रेरणाही त्यांच्या लेखनात दिसते. पोथीवादी कम्युनिस्ट न राहता उघड्या डोळ्यांनी भौतिक परिस्थितीचं आकलन करणं हे अण्णा भाऊंचं वेगळेपण आहे. आजच्या घडीला केवळ साहित्यरत्न अण्णा भाऊ व केवळ कॉम्रेड अण्णा भाऊ आपल्यासमोर मांडणारे असे दोन गट आहेत. हे दोन्ही टोकाची मांडणी करणारे गट खरंतर अण्णा भाऊ दृष्टिआड करण्याच्या प्रक्रियेत आहे.

फोटो स्रोत, Sushil Lad

फोटो कॅप्शन,

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने वाटेगाव इथं आयोजित लोकशाहिराला शाहिरांचा सलाम या कार्यक्रमावेळी अण्णा भाऊ यांच्या साहित्यांची दिंडी काढण्यात आली.

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णमध्य

आंबेडकरी चळवळीचा व मार्क्सवादी चळवळीचा एक सुवर्णमध्य म्हणजे अण्णा भाऊ. आज या सुवर्णमध्याची भारतीय शोषितांच्या चळवळीला आत्यांतिक गरज आहे. अशा काळात अण्णा भाऊ जय भीम आणि लाल सलामच्या एकत्रीकरणाचं एक प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. मार्क्स आणि आंबेडकरांचा सुगम संयोग अण्णा भाऊ घडवताना दिसतात. भारताच्या सामाजिक क्रांतीचा एक टप्पा असणाऱ्या जातीमंतक सांस्कृतिक क्रांतीचा एक महत्त्वाचा शिलेदार म्हणून अण्णा भाऊंना पाहावं लागेल.

अण्णा भाऊंच्या विचारांची दलित शोषितांना आज खूप गरज आहे. म्हणून ते केवळ एक गौरवशाली इतिहास होता कामा नयेत, तर भविष्याला दिशा देणारा एक ज्वलंत वर्तमान बनले पाहिजेत.

(लेखातील विचार लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)