#5मोठ्याबातम्या : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिका कुणाची?

सांगली

फोटो स्रोत, BBC/DeepakKamble

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे.

1. सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेसाठी आज मतदान

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या 153 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या 153 जागांसाठी 754 उमेदवार रिंगणात आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

सकाळी 7.30 वाजल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर शुक्रवारी 3 ऑगस्टला मतमोजणी होईल.

सांगली, मिरज, कुपवाडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एमआयएम, जिल्हा सुधार समिती यांसह स्थानिक आघाड्या रिंगणात आहेत. जळगावमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. इथं शिवसेनेकडून सुरेश जैन तर भाजपकडून गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

"निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 5,792 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे," असं राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितलं आहे.

2. आधार क्रमांक जाहीर करू नका : UIDAI

आधार क्रमांक इंटरनेट अथवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करून नका, असं आवाहन युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)नं केलं आहे. महाराष्ट्र टानं ही बातमी दिली आहे.

दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी त्यांचा आधार क्रमांक ट्विटर प्रसिद्ध करून तो हॅक करून दाखवण्याचे आव्हान दिलं होतं.

यानंतर काही इथिकल हॅकर्सनी त्यांचा नंबर हॅक करून, त्यांचं बँक खातं आणि ईमेलपर्यंत प्रवेश मिळवल्याचा दावा केला होता.

"त्यावर अशाप्रकारचं कृत्य हे अनावश्यक आहे आणि त्यापासून लांब राहायला हवं, हे कृत्य कायद्याला धरून नाही," असं UIDAIनं म्हटलं आहे.

3. इम्रान खान यांच्या शपथविधीचे मोदींना निमंत्रण?

पाकिस्तानचे होऊ घातलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्याचा विचार खान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ हा पक्ष करत आहे. टानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

इम्रान खान 11 ऑगस्टला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

"तहरीक-ए-इन्साफ पक्षाची कोअर कमिटी या निमंत्रणाबात विचार करत आहे. यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे," असं पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे.

"मोदी यांनी सोमवारी फोन करून इम्रान यांचं अभिनंदन केलं होतं. दोन्ही देशांतील संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीनं हे स्वागतार्ह पाऊल आहे," असं फवाद यांनी म्हटलं आहे.

4. आसाम NRC : माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अलींच कुटुंब ठरलं बेकायदा स्थलांरित?

आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये (NRC) जवळपास 40 लाख लोकांची नावं आलेली नाहीत. यामध्ये माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे, अशी बातमी एबीपी माझानं दिली आहे.

फोटो स्रोत, PTI

अहमद यांच्या पुतण्याने आपलं नाव या यादीत नसल्याचा दावा केला आहे. हे कुटुंबीय आसामधल्या कामरूप जिल्ह्यातल्या रंगिया गावात राहतं. फखरुद्दीन अली 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रुवारी 1977 या कालावधीत देशाचे राष्ट्रपती होते.

फखरुद्दीन यांच्या कुटुंबीयांचं नाव यादीत न आल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

"NRCमध्ये पक्षपातीपणा झाला आहे. माजी राष्ट्रपतींच्या कुटुंबीयांचं नाव यादीत नसणं हे चकित करणारं आहे," असं ममता यांनी म्हटलं आहे.

5. रांचीत एकाच कुटुंबात 7 जणांची आत्महत्या?

झारखंडच्या रांची शहरातल्या राहत्या घरात एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यात 2 लहान मुलांचाही समावेश आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

रांचीतल्या कांके भागातील या कुटुंबीयांच्या राहत्या घरात ही घटना घडली.

"प्राथमिक तपासात हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असल्याचं समोर आलं आहे," असं वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनीस गुप्ता यांनी सांगितलं आहे.

आत्महत्या केलेलं कुटुंब मूळचं बिहारमधील भागलपूर येथील आहे. दीपककुमार झा असं या कुटुंबप्रमुखाचं नाव होतं. त्यांच्यावर मोठ्या कर्जाचा बोजा होता. कर्ज फेडण्याच्या चिंतेतून त्यांनी कुटुंबीयांसह आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)