मुंबईच्या खड्ड्यांमुळे मुलगा गेला, वहिनीही पडली : 2 वर्षं खड्डे बुजवणाऱ्या 'दादां'ची कथा?

मुंबई खड्डे Image copyright Getty Images

दादाराव बिल्होरे मुंबईत खड्डेवाले दादा म्हणून ओळखले जातात. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या खड्ड्यांमुळे मुलगा गमावल्यानंतर त्यांनी खड्डे बुजवायला सुरुवात केली. आता पुन्हा एकदा बिल्होरे कुटुंबावर मोठा आघात झालाय... तोही खड्ड्यामुळेच.

मुंबईत खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात २८ जुलै २०१५ रोजी दादाराव बिल्होरे यांनी प्रकाश हा आपला सोळा वर्षांचा एकुलता एक मुलगा गमावला. त्यानंतर दादाराव स्वत: मुंबईतील खड्डे भरायला लागले.

यावर्षी या घटनेला तीन वर्षं पूर्ण होत नाहीत, तोच १२ जुलै २०१८ रोजी पुन्हा एकदा दादारावांची वहिनी खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात जखमी झाली. आणि त्यांच्या खड्डे भरण्याच्या त्यांच्या मोहिमेला पुन्हा एकदा वेग आला.

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात प्रकाश गेल्याच्या घटनेला तीन वर्षं पूर्ण व्हायच्या दोन आठवडे आधीच पुन्हा एकदा बिल्होरे कुटुंबावर मोठा आघात झाला.

दादारावांची वहिनी राधा कृष्णा बिल्होरे गोरेगावच्या आरे कॉलनीतल्या रस्त्यावरून बाईकवर मागे बसून प्रवास करत होत्या. त्या आपला मुलगा रामच्या मागे बसून घरी जात असताना बाईकचं मागचं चाक खड्ड्यात अडकलं. त्यांच्या मुलाने अडकलेलं चाक खड्डयातून बाहेर काढण्यासाठी अॅक्सलरेटर वाढवला आणि त्यात बाईकला हिसका बसून राधाताई मागच्या मागे पडल्या. या अपघातात त्यांच्या डोळ्याला जबर इजा झाली आहे.

नशीब बलवत्तर म्हणून कपाळावरील चार टाक्यांवर निभावलं. बोटभर खाली लागलं असतं तर डावा डोळा कायमचा गमावण्याची वेळ राधा यांच्यावर आली असती.

Image copyright Dadarao Bilhore
प्रतिमा मथळा दादारावांची वहिनी राधा कृष्णा बिल्होरे यांचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यांना चार टाके पडले.

आरे रोडवरील इतर खड्ड्यांप्रमाणे हा खड्डा देखील खरंतर काही दिवसांपूर्वीच दादाराव यांनी स्वत: बुजवला होता. पण वाहनांच्या रहदारीमुळे आणि पावसामुळे त्याजागी पुन्हा खड्डा तयार झाला. आणि नेमका तोच खड्डा दादाराव यांच्या वहिनीच्या अपघाताला कारणीभूत ठरला.

या अपघाताच्या प्रसारमाध्यमातून बातम्या झळकल्यानंतर महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी तो खड्डा पेव्हर ब्लॉक टाकून बुजवला.

खड्डे भरण्याची मोहीम

तीन वर्षांपूर्वी दादारांवांच्या मुलाला खड्ड्यापायी जीव गमवावा लागल्यानंतर दादारावांनी मुंबईतील खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली होती. आता पुन्हा एकदा खड्ड्यामुळेच वहिनीचा अपघात झाल्यामुळे दादाराव बिल्होरे यांच्या खड्डे भरणं मोहिमेला वेग आलेला आहे.

दादाराव यांनी मागच्याच रविवारी काही स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने जेव्हीएलआरवरील तब्बल शंभर खड्डे बुजवले.

खड्डेवाले दादा

मुलगा गेल्यानंतर खड्डयांमुळेच अंबरनाथ आणि वांद्रे येथे आणखी दोन लोकांना प्राण गमवावे लागल्याचं दादाराव यांनी टीव्हीवर पाहिलं. त्यामुळे आणखीन असे जीव हकनाक जाऊ नयेत यासाठी फावडं आणि घमेलं हातात घेऊन स्वत:च खड्डे बुजवायचा निर्णय दादाराव यांनी घेतला.

दादाराव सांगतात, "सर्वप्रथम मी मरोळ येथील माझ्या भाजीच्या दुकानसमोरील खड्डे बुजवले. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे वेळ मिळेल तसं बुजवायला लागलो.

सुरुवातीला अनेक गाड्या माझ्या अंगावर येत. लोक गाडीने जाताना चिखल उडवायचे. मला बाजूला व्हायला सांगायचे. काहींना वाटायचं की, मी महानगरपालिकेचा नाहीतर कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आहे म्हणून ते हिणवायचेही! पण हळूहळू लोकं मदतीलाही धावून यायला लागले."

Image copyright Dadarao Bilhore
प्रतिमा मथळा दादाराव बिल्होरे

खड्डे भरण्याच्या या कामात होणारा त्रास आणि माझे कपडे खराब होतात म्हणून पूर्वी बायकोदेखील ओरडायची, दादाराव सांगतात. "तुमची काही पत आहे की नाही, असं बायको विचारायची. मग मी तिला म्हणायचो, माझी पत माझ्या मुलासोबत गेली. आता प्रत्येक बाईकवाला जिवंत राहिला तर माझा मुलगा जिवंत आहे, असं मला वाटेल. आणि माझी गेलेली पत परत येईल." आता बायकोदेखील समजून घेते, असं दादाराव म्हणतात.

दादारावांनी गेल्या 3 महिन्यात मालाड, गोरेगाव, अंधेरी, सांताक्रूझ, मानखुर्द, घाटकोपर या परिसरातील जवळपास साडेपाचशेहून अधिक खड्डे भरले आहेत.

"आता लोकं कामाचं कौतुक करतात तेव्हा मनाला बरं वाटतं. अनेक जण आता मला 'खड्डेवाले दादा' म्हणून ओळखतात. तेव्हा मनात समाधानाची भावना जागृत होते", असं दादाराव अभिमानाने सांगतात.

खड्डे बुजवण्याची अनोखी शक्कल

'तुम्ही खड्डे कसे बुजवता?', असं विचारलं असता दादाराव सांगतात, "सुरुवातीला मी रस्त्याच्या कडेला पडलेले जुने पेव्हर ब्लॉक वापरायचो. पण मागच्या वर्षी न्यायालयाने पेव्हर ब्लॉक वापरावर बंदी आणली. तेव्हापासून मी प्लास्टरने भरलेल्या मातीच्या गोण्या वापरायला सुरूवात केली आहे.

Image copyright Dadarao Bilhore

शहरात अनेक ठिकाणी बांधकामं सुरू असतात. त्याठिकाणी जुनं प्लास्टर किंवा रेती, सिमेंटच्या गोण्या भरून ठेवलेल्या असतात. या गोण्या शहराबाहेर नेऊन टाकायला कॉन्ट्रक्टरला पदरचे पैसे खर्च करावे लागतात.

अशा ठिकाणी जाऊन त्या गोण्या मला देण्याची मी विनंती करतो. टाकाऊ गोष्टींसाठी खर्च करावे लागणारे पैसे वाचत असल्याने ते हसतमुखाने परवानगी देतात.

माती-सिमेंटच्या या गोण्या मी खड्डयांमध्ये जशाच्या तशा टाकतो. मग त्या गोण्या स्वत:हूनच खड्डयाचा जो आकार आहे तो धारण करतात. आतली माती दबून जाते आणि वर गोणी असल्याने माती वाहून जाण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मी आता खड्ड्यांसोबतच मातीच्या गोण्यांच्याही शोधात फिरत असतो."

खड्डा बुजला पण मुलगा गमावावा लागला

28 जुलै 2015 हा दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी भरपूर पाऊस पडत होता. पण अकरावीच्या अॅडमिशनचा दिवस असल्याने प्रकाश आपला मोठा चुलत भाऊ रामसोबत बाईकवरून भांडूपच्या नवजीवन एज्युकेशन सोसायटी या कॉलेजमध्ये गेला होता.

परतताना दोघेही जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून (जेव्हीएलआर) घरी येत होते. त्याच रस्त्यावरील पाच फूट रूंद आणि १८ फूट लांब खड्डा आमच्या प्रकाशच्या मृत्यूला कारणीभूत ठरला, हा प्रसंग कथन करताना दादाराव बिल्होरे यांचे डोळे पाणावले होते.

'मरोळ एज्युकेशन अकॅडमी' शाळेतून दहावीला ७९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला प्रकाश आपल्या विनोदी स्वभावामुळे घरात आणि मित्रांमध्ये सर्वांचा लाडका होता. फुटबॉल आणि क्रिकेटची त्याला भरपूर आवड होती.

कधीही कुणावरही न रागावणारा प्रकाश आमच्या संपूर्ण कुटुंबात इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेला पहिला मुलगा होता. प्रकाशची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्याच्या शाळेतील शेकडो मुलं, हितचिंतक आणि नातेवाईक त्यात सामील झाले होते. प्रकाशच्या आठवणी बीबीसी मराठीला सांगताना दादाराव यांचा कंठ दाटून आला.

दादाराव सांगतात, "जुलै २०१५पूर्वी मी प्रसारमाध्यमातून मुंबईच्या खड्डयांविषयीच्या बातम्या वाचायचो पण त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. किंवा एकही खड्डा भरलेला नव्हता. पण स्वत:चा मुलगा गमावल्यानंतर रस्त्यावरील प्रत्येक खड्डा माझ्या नजरेत भरू लागला. प्रकाशच्या अपघातानंतर प्रशासनातर्फे अपघातास कारणीभूत ठरलेला खड्डा ताबडतोब दुसऱ्या दिवशी बुजवून टाकण्यात आला. पण त्यासाठी मला माझा मुलगा गमवावा लागला."

मानवनिर्मित खड्डा मृत्यूला कारणीभूत

अपघातानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात असं लक्षात आलं की, जळालेली केबल दुरुस्त करण्यासाठी टाटा कंपनीने हा खड्डा खणलेला होता. २९ ते ३१ मे २०१५ ही कामाची तारीख होती.

पण काम झाल्यानंतरही ५ फूट रूंद आणि १८ फूट लांबीचा हा खड्डा तब्बल दोन महिने दुरुस्तच करण्यात आला नव्हता. महानगरपालिकेनेही त्याची दखल न घेतल्यामुळे पावसाचं पाणी त्यात साचलेलं.

Image copyright Dadarao Bilhore
प्रतिमा मथळा प्रकाश बिल्होरेच्या पुण्यतिथी निमित्त खड्डे भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

बाईक चालवत असताना राम हा प्रकाशला कॉलेजला येण्या-जाण्यासाठी बसस्टॉप दाखवत होता. आणि ते दाखवत असतानाच त्यांची बाईक खड्ड्यात अडकली. प्रकाश दहा फुटावर फेकला गेला आणि राम पाच फुटावर पडला.

प्रकाश थेट डोक्यावर आपटला पण त्याचं डोकं फुटलं नव्हतं. त्याच्या नाका-तोंडातून आणि कानातून रक्त वाहत होतं. अतिरक्तस्त्राव झाल्याने तो गेला. तर रामला डोक्याला सहा आणि हनुवटीला तीन असे एकूण नऊ टाके पडले. सुदैवाने राम या अपघातातून वाचला, असं दादाराव सांगतात.

कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार

"प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे माझ्या निष्पाप मुलाचा जीव गेला. त्यामुळे संबंधित लोकांवर आम्ही कलम ३०४ (अ) अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मात्र तीन वर्षानंतरही न्यायालयात आमची लढाई सुरू आहे. मला माझ्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे. माझ्या घरावर कोसळलेली आपत्ती कुणावरही येऊ नये", असं दादाराव यांना वाटतं.

पण न्यायालयात धाव घेतल्यानंतरही महानगरपालिकेने संबंधित कागदपत्र न्यायालयात जमा केली नव्हती. प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी प्रशासनाने हालचाल सुरू केल्याचं दादाराव यांनी सांगितलं.

सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग दादाराव बिल्होरेच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या असून प्रशासनाच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याची त्यांची तयारी सुरू आहे.

Image copyright Dadarao Bilhore
प्रतिमा मथळा प्रकाश बिल्होरेचा अपघात झाला ती जागा अपघातापुर्वी आणि अपघातानंतर

"दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी किती निधी मंजूर केला जातो, त्यापैकी किती वापरला जातो याची तपशीलवार माहिती सध्या माहितीच्या अधिकाराच्या आधाराद्वारे जमा केली जात आहे", असं आभा सिंग बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.

खड्ड्यांच्या बाबतीत कायम कनिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांना दोषी धरलं जातं. पंरतु यंत्रणेचे प्रमुख या नात्याने महापालिकांचे आयुक्त किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनादेखील दोषी धरलं जावं, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या जनहित याचिकेमध्ये करणार असल्याचंही, आभा सिंग यांनी सांगितलं.

"महापालिका खड्ड्यांची खोटी आकडेवारी सादर करते, कारण त्यांनाच या आकड्यांची लाज वाटू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील एखाद्या चांगल्या खासगी संस्थेला खड्ड्यांबाबतचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी द्यावी. जेणेकरून सत्य परिस्थिती लोकांसमोर येईल", असं आभा सिंग यांचं म्हणणं आहे.

मुंबई, महाराष्ट्र आणि भारत खड्डामुक्त करायचाय

"सामान्य जनतेला जे कळतं ते महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांना का कळत नाही?" दादाराव विचारतात. अलीकडे राज्याचे एक मंत्री म्हणाले, 'पाच मृत्यू झाले म्हणून रस्ता दोषी कसा?' अशा प्रकारची विधानं वाचल्यावर लोकप्रतिनिधींचा राग येत असल्याचं ते सांगतात.

उपनगरापेक्षा दक्षिण मुंबईत खड्ड्यांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. पण खड्ड्यांची समस्या केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही.

Image copyright Dadarao Bilhore
प्रतिमा मथळा प्रकाश बिल्होरे

राज्यातील इतर भागात आणि देशातील अनेक शहरांमध्ये खड्ड्यांमुळे अनेक जीव जातायत किंवा लोकं जखमी होतायत. त्यामुळे अनेक लोकं आपापल्या परिने खड्ड्यांच्या विरोधात लढा देत आहेत. आम्ही सर्वजण मिळून मुंबई, महाराष्ट्र आणि भारत खड्डामुक्त करू, असा विश्वास दादाराव व्यक्त करतात.

"मी करत असलेल्या कामाला फारसा खर्च येत नाही. थोडी मेहनत आणि वेळ द्यावा लागतो एवढंच. पण माझं काम पाहून अनेकजण माझ्याशी संपर्क साधतात. माझ्या कुवतीनुसार मी त्यांना मार्गदर्शन करतो आणि प्रेरणा देतो", असं दादाराव प्रांजळपणे कबूल करतात.

हेही वाचलंत का?