#5मोठ्याबातम्या : अॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत होणार, केंद्राकडून प्रस्ताव मंजूर

Image copyright iStock

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अटकच होणार

अॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"दलित आणि अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक होऊ नये आणि अटकेपूर्वी आरोपीची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी," असा निकाल 20 मार्चला सर्वोच्च न्यायालयानं दिला होता.

त्यानंतर देशभरातल्या दलित आणि आदिवासी समाजामध्ये रोष निर्माण झाला होता. मोदी सरकारनं 9 ऑगस्टपूर्वी अॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत करावा अन्यथा दलित संघटनांच्या देशव्यापी आंदोलनात आपण सहभागी होऊ, असा इशारा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीनं दिला होता.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा कायदा पूर्वपदावर आणण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार आहे.

2. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली.

पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षांमध्ये कोणतीही शर्यत नाही, भाजपला सत्तेवरून खाली खेचणं हाच सर्व विरोधीपक्षांचा मुख्य उद्देश आहे, असं ममता यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

Image copyright DESHAKALYAN CHOWDHURY/AFP/GETTY IMAGES

2019च्या निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र येऊन पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवतील, असंही ममता म्हणाल्या.

दिल्ली भेटीत ममता यांनी AIADMK चे नेते तम्बीदुराई, JD(S) चे नेते एच. डी. देवेगौडा तसंच लालकृष्ण अडवाणी आणि संजय राऊत आदी नेत्यांची भेट घेतली.

3. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी आमीरखान, गावस्कर, कपीलदेव यांना निमंत्रण

इम्रान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत.

या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी अभिनेता आमिर खान, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कपिल देव आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना निमंत्रण दिलं आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

Image copyright TWITTER

"माध्यमांकडून अनेक भाकितं वर्तवली जात आहेत. त्यामध्ये शपथविधी सोहळ्याला सार्क देशांच्या नेत्यांना बोलावणार असंही म्हटलं जात आहे. पण माध्यमांचा हा तर्क खोटा आहे. या संदर्भातील निर्णय परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करूनच घेतला जाईल," असं ट्वीट पीटीआय पक्षाचे प्रवक्ते फवाद हुसैन यांनी केलं आहे.

4. व्यभिचाराच्या केसमध्ये महिला दोषी नसणार - सर्वोच्च न्यायालय

लग्नानंतर परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिला कायद्याच्या दृष्टीनं गुन्हेगार नसतील, म्हणजेच व्यभिचाराच्या केसमध्ये विवाहितेशी संबंध ठेवणारा पुरुषच अपराधी असेल, असा निकाल सर्वोच्च न्यायलयानं दिला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं बुधवारी यासंदर्भात सुनावणी केली. तसंच व्यभिचार गुन्हा आहे की नाही, याबाबतही विचार करू, असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

केरळमधील जोसेफ यांनी सर्वोच्च नायायलयात जनहित याचिका दाखल केली होती. कलम 497च्या वैधतेवर पुनर्विचार करावा, असं याचिकेत म्हटलं होतं.

पण लग्नसंस्था आणि भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयाला सांगितलं होतं.

5. सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनं सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा सुधारित अंदाज वर्तवला आहे. सरासरीच्या 92 टक्के पाऊसमानाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

Image copyright EUROPEAN PHOTOPRESS AGENCY

स्कायमेटच्या अहवालानुसार, आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा 6 टक्के कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात मान्सूनचा प्रभाव कमी असणार आहे.

पावसाचा जोर कमी झाल्यानं ऑगस्ट महिन्यात 88 टक्के पावसाचा अंदाज आहे, यापूर्वी ऑगस्ट महिन्यात 96 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)