प्रियंका आणि निक : वयाने लहान पुरुषांसोबत महिला जास्त खूश?

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास Image copyright Getty Images

जगजीत सिंग यांनी त्यांच्या अजरामर गझलमध्ये म्हटलंय की,

ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन

जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन

प्रेमाला ना जाती-धर्माचं बंधन असतं, ना वयाचं. जगाने घालून दिलेली बंधनं तोडली नाहीत तर ते प्रेम कसलं? सर्वसाधारण प्रेमात आणि विवाहात मुलग्याचं वय जास्त आणि मुलीचं वय कमी असा जगाचा दंडक आहे.

वयाचं हे बंधन तोडणारं उदाहरण अधोरेखित झालं बॉलिवुड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या साखरपुड्याची बातमी आली तेव्हा.

या दोन्ही सेलिब्रिटीजवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. अर्थात निक किंवा प्रियंकाने या बातमीला दुजोरा दिलेला नाही पण अभिनंदन करणाऱ्या संदेशांना नाकारलंही नाही.

पण त्यांच्या कथित साखरपुड्याने एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. निक प्रियंकापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. त्यामुळे कोणत्याही नात्यात वयाला किती महत्त्व आहे आणि मुख्य म्हणजे अशा नात्यात स्त्री पुरुषापेक्षा वयाने मोठी असेल तर काय, असे प्रश्न चर्चेत आले.

स्त्री वयाने मोठी असेल तर?

गेल्या वर्षी इम्यानुअल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यावेळी आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे त्यांच्या पत्नीचं वय.

मॅक्रॉन यांच्या पत्नी आणि फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिजेट मॅक्रॉन त्यांच्यापेक्षा 24 वर्षांनी मोठ्या आहेत. इम्यानुअल शाळेत असताना त्या तिथे शिक्षिका होत्या. त्याच वेळी त्यांचं प्रेम जमल्याचं सांगितलं जातं.

सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की लग्नाच्या वेळी मुलीचं वय मुलापेक्षा कमी असलं पाहिजे. भारतात कायद्याने मुलीच्या लग्नाचं वय 18 आहे तर मुलाच्या लग्नाचं वय 21 आहे.

पण लग्नाच्या वेळी मुलीचं वय मुलापेक्षा जास्त असेल तर ते सामाजिक नियमांच्या विरुद्ध आहे का?

Image copyright Thinkstock

फोर्टिस आणि आईबीएस हॉस्पिटलमध्ये मॅरेज काऊन्सिलर म्हणून काम करणाऱ्या मनोवैज्ञानिक शिवानी मिस्री साढू बीबीसीशी यावर सविस्तरपणे बोलल्या.

त्या म्हणतात, "लहान वयाच्या पुरुषांशी लग्न करायचं की नाही किंवा त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचे की नाही हे महिला पूर्वानुभवावरून ठरवतात. मोठ्या वयाच्या महिलांनी आपल्या आयुष्यात बरंच काही पाहिलेलं असतं. आपल्या अनुभवांवरून त्या बरंच शिकलेल्या असतात."

"वयाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर त्यांना आयुष्यात असा पुरुष हवा असतो जो त्यांच्यावर प्रभृत्व गाजवणार नाही. म्हणूनच लहान वयाच्या पुरुषांबरोबर त्यांचं जास्त जमतं," असं त्या म्हणाल्या

समाज या नात्यांकडे कसं पाहातो?

'दिल चाहता है' या सिनेमात अक्षय खन्नाने वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची भूमिका केली आहे. ही गोष्ट जेव्हा तो त्याच्या अगदी जवळच्या मित्रांना सांगतो तेव्हा त्याला समजून घेण्याऐवजी ते त्याची टर उडवतात, असं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

या सिनेमातला हा सीन वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इम्यानुअल आणि ब्रिजेट मॅक्रॉन

दिल्लीत राहाणाऱ्या मानसी आपल्या पतीपेक्षा पाच वर्षांनी मोठ्या आहेत. त्यांचं लग्न 2012मध्ये झालं होतं. त्यांचं आणि त्यांच्या पतीचं नातं मजबूत असलं तरी त्यांच्या मैत्रिणी त्यांना चिडवतात की त्यांनी लहान मुलाशी लग्न केलं आहे.

मानसी ही गोष्ट हसत हसत सांगतात. पण कधी कधी अशा प्रकारच्या थट्टेचे परिणाम गंभीर असू शकतात.

मॅरेज काऊन्सिलर शिवानी म्हणतात, "माझ्याकडे अशी अनेक जोडपी येतात ज्यांच्यातील तणावाला त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी केलेली थट्टा कारणीभूत असते. वयात जास्त अंतर असेल तर अशा प्रकारचा तणाव वाढू शकतो."

वयात जास्त अंतर असल्याचे परिणाम

दोन लोकांच्या वयात जास्त अंतर असेल तर त्याचे वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतात. जर मुलीचं वय 40पेक्षा जास्त असेल तर नात्यात गरोदरपणाशी संबधित समस्या उद्भवू शकतात. वाढत्या वयाबरोबर मानसिक आजरही वाढतात, असं त्या म्हणाल्या.

दोन व्यक्तींच्या वयात जास्त अंतर असेल तर त्यांना एकमेकांसोबत जुळवून घेण्यात अडचणी येऊ शकतात. बीबीसी वनच्या एका रिपोर्टनुसार लहान वयातल्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत वेगळी असते तर वयाने जास्त असणारे लोक वेगळ्या प्रकारे विचार करतात.

पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा या जुळवून घेण्याच्या सवयीवर परिणाम होतो. शिवानी समजावून सांगतात, "समजा एक जोडपं 20 आणि 30 वर्षांचं आहे. त्यांच्यातले मतभेद दिसून येतील पण एक जोडपं 50 आणि 60 वर्षांचं आहे तर त्यांचं मात्र एकमेकांशी पटेल. खरंतर दोन्ही जोडप्यांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे पण ते ज्या वयाच्या टप्प्यात आहेत, ते वेगळे आहेत."

Image copyright DIL CHAHTA HAI/ YOUUTBE GRAB
प्रतिमा मथळा दिल चाहता है सिनेमातलं एक दृश्य

"जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपल्या आशा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या असतात. त्यावेळेस पाच वर्षांचं अंतरही जास्त वाटू शकतं. पण वय झाल्यावर हे अंतर विशेष वाटत नाही," असं त्या म्हणाल्या.

कमी वयाच्या पुरुषांशी नातं जोडण्यापुर्वी महिला काय विचार करतात?

अजून एक प्रश्न असा आहे की कमी वयाच्या पुरुषाशी नातं प्रस्थापित करण्याआधी महिलेच्या मनात काय सुरू असतं?

याचं उत्तर देताना शिवानी सांगतात, "कोणतंही नातं एकमेकांची सहमती आणि आवडीने सुरू होतं. आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना पसंत करताना मुलींच्या मनात एकच गोष्ट चालू असते ते म्हणजे जुन्या नात्यांना विसरणं. तरुण पुरुषांशी नातं प्रस्थापित केलं तर महिलांना पण तरुण वाटायला लागतं. त्यांना वाटतं की त्या अजूनही तरुण पुरुषांना आकर्षित करू शकतात."

पण या उलट मुलगा जेव्हा आपल्यापेक्षा मोठ्या मुलीशी नातं जुळवतो तेव्हा त्याच्या मनात काय चालू असतं? शिवानी म्हणतात की, "मुलांसाठी अशा नात्यांमध्ये कमी जबाबदाऱ्या असतात. एका अनुभवी व्यक्तीशी नातं जोडून ते बऱ्याचशा जबाबदाऱ्यांमधून मोकळे होतात."

Image copyright Thinkstock

"अशी नाती दोघांसाठी फायदेशीर असतात. नात्यात समंजसपणा असला की मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात. वयाने मोठ्या असलेल्या मुली आत्मनिर्भर असतात. अशा मुलींसोबत असणाऱ्या मुलांना जास्त चिंता करायची गरज पडत नाही," असं त्या म्हणाल्या.

शिवानी पुढे हेही सांगतात की, "20 वर्षांचा मुलगा आणि 30 वर्षांची मुलगी एकमेकांना डेट करत असतील तर आपल्याला मुलं हवी की नको याबाबत त्यांचे विचार स्पष्ट नसतील. पण जर मुलगा 30 वर्षांचा असेल आणि मुलगी 40 वर्षांची असेल तर त्यांचे फॅमिली प्लॅनिंगचे विचार स्पष्ट असतात."

वयाने मोठी महिला आणि लहान पुरुष यांच्यातली नाती अयशस्वी होण्याची अनेक उदाहरण आहेत. सैफ अली खान आणि त्यांची पहिली पत्नी अमृता सिंग यांच्या वयात बरंच अंतर होतं. त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्यांनी आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या करीना कपूरशी लग्न केलं.

पण अशी नाती नेहमीच अयशस्वी होतात असंही नाही. सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली यांच्या वयात अंतर आहे. अंजली सचिनपेक्षा वयाने मोठ्या आहेत तरीही त्यांचं लग्न यशस्वी ठरलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)