'अडाण्यांचा आत्मविश्वास आणि सिलेक्टिव्ह अभिव्यक्ती स्वातंत्र्य'

अभिव्यक्ती स्वातंत्र्य Image copyright Getty Images/Sean Gallup

कर्नाटकातील भाजप आमदाराने अलीकडेच म्हटलं की बुद्धिजीवींना गोळ्या घाला. लेखक-कलाकार-विचारवंतांच्या मुस्काटदाबीविषयी लिहीत आहेत साहित्यिक जयंत पवार.

सन 2010...केरळ मधील एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवात्तुपुळा गावात एक भयानक घटना घडली. टी. जे. जोसेफ नावाच्या एका प्राध्यापकाचा उजवा हात काही मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांनी मनगटापासून तोडला. ही कुठल्या इस्लामी देशात घडलेली गोष्ट नाही तर भारत नावाच्या मोठ्या लोकशाही देशात दिवसाढवळ्या घडलेली घटना आहे.

जोसेफ यांना घरातून बाहेर काढून सर्वांदेखत त्यांच्यावर हल्ला केला गेला. या प्राध्यापक महाशयांनी S.Y.B.Com.च्या विद्यार्थ्यांचा मल्याळम भाषेचा पेपर सेट करताना भाषांतरासाठी एक संवादाचा तुकडा दिला, ज्यात एक वेडा माणूस देवाशी संवाद साधतो आहे आणि देव त्याला मूर्खात काढतो. हा तुकडा जोसेफ यांनी कुंजू महम्मद या चित्रपट दिग्दर्शकाच्या पटकथा कशी लिहावी याबद्दलच्या पुस्तकातून घेतला होता, म्हणून गमतीने वेड्या इसमाला महम्मद असं नाव दिलं.

त्यानंतर अनेक मुस्लीम संघटनानी तीव्र निदर्शनं केली. खूप गदारोळ उठला. जोसेफ परागंदा झाले. त्यांच्यावर ईश्वरनिंदेचा आरोप ठेवून पोलिसांनी त्यांना शोधून काढून अटक केली आणि तुरुंगात डांबलं. कोठडीत त्यांना मारहाण झालीच, पण जेव्हा ते जामीन मिळून बाहेर आले, तेव्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या धर्मवेड्या संघटनेच्या लोकांनी त्यांचा हात तोडला.

'लेखकाची सामूहिक हत्या'

तेव्हापासून केरळमध्ये कोणालाही धमकावताना तुझा टी.जे. जोसेफ करू, असं म्हटलं जातं. ही धमकी इतकी लोकप्रिय झाली आहे की हिंदू धर्मवेड्यांनीही ती लगेच तत्परतेने उचलून तिचा अवलंब करायला सुरुवात केली आहे.

Image copyright Reuters

हे आठवण्याचं कारण म्हणजे याच केरळातील कोट्टयम जिल्ह्यातील निंदूर शहरातल्या एस. हरीश या लेखकाला त्याचे हात तोडण्याची धमकी हिंदू ऐक्य वेदी या हिंदुत्ववादी संघटनेने काही दिवसांपूर्वी दिली आहे. एस. हरीश हे मल्याळी भाषेतले चालू घडीचे महत्त्वाचे कथाकार मानले जातात. केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

साप्ताहिक मातृभूमी या नियतकालिकात त्यांची मिशा नावाची कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होत होती. त्यातल्या तिसऱ्या भागात, नटूनथटून देवळात जाणाऱ्या मुलींकडे बघून खट्याळ शेरेबाजी करणाऱ्या दोन मित्रांमधल्या संवादाने अनेकांची माथी भडकली. त्यांना तो भक्तांचा अपमान वाटला. सोशल मीडियावर लोक तुटून पडले. हा उन्माद बघता बघता रस्त्यावर आला. हरीशना धमक्या येऊ लागल्या.

त्यांच्या कुटुंबीयांनाही धर्मवेड्यांनी सोडलं नाही. त्यांच्या आईला आणि पत्नीला बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या. हरीशनी आधी फेसबुक अकाउंट बंद केलं. मग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण पोलिसांनी त्यांचं काही ऐकून घेतलं नाही. मातृभूमी प्रकाशनाच्या व्यवस्थापकाने हरीशना माफी मागायला सांगितलं, पण हरीश यांनी ते नाकारलं. संपादक त्यांच्या बाजूने होता, पण ज्यांनी संरक्षण द्यायचं त्यांनीच पाठ फिरवल्यावर हरीश यांनी आपली कादंबरी मागे घेतली.

ते म्हणाले, मी खूप दुबळा माणूस आहे. जे विरोध करतायत त्यांचंच राज्य आहे. त्यांच्याशी मी काय लढणार? सा. मातृभूमीचे संपादक कमल राम संजीव यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया पुरेशी तिखट आणि बोलकी आहे. ते म्हणालेत , 'ही एका लेखकाची सामूहिक हत्या आहे, Mob lynching.'

बोटचेपं सरकार आणि पोलीस

ही काही लेखकाची पहिली हत्या नाही. 2015 साली चेन्नईतल्या नमक्कल जिल्ह्यातील पेरूमल मुरुगन यांनी 'लेखक मेला आहे' अशी घोषणा करून आपली सगळी लेखनसंपदा फाडून टाकली होती, ही घटना कोण विसरेल? त्यानंतर दोन वर्षांनी मद्रास हायकोर्टाने, मुरुगन लिहू शकतात, त्यांची कादंबरी आवडली नाही तर वाचू नका, पण त्यांना लिहिण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असा निर्णय दिला. तरी स्वतः मुरुगन पहिल्या मोकळेपणाने आणि निर्भयपणे पुन्हा लिहू शकतील का, असा प्रश्नही पडू नये इतकी दहशत त्यांच्या पुस्तकावर हल्ला करणारऱ्यांनी निर्माण केली आहे.

Image copyright Getty Images

त्यांच्या प्रच्छन्न निंदानालस्तीबरोबर त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराचं शस्त्र उगारून त्यांना त्यांच्या पत्नीसह शहर सोडायला भाग पाडण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सारी ताकद पणाला लावली होती. त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी आपल्या मथोरुबगान या कादंबरीत एक निपुत्रिक शेतकरी स्त्री अपत्यप्राप्तीसाठी शंकराच्या वार्षिक उत्सवातल्या सामूहिक फलनविधीत भाग घ्यायचा निर्णय पतीच्या मर्जीविरुद्ध घेते, असं दाखवलं. कादंबरी इंग्रजीत छापली जाईपर्यंत गप्प असणारे धर्मवादी नंतर थयथयाट करू लागले आणि भाजयुमोने वातावरण पेटवत नेलं.

याच्या पुढच्याच महिन्यात जवळच्याच करूर जिल्ह्यातील पुलियुर मुरगेसन या लेखकाने ट्रान्ससेक्शुअल तरुणाचं कादंबरीत चित्रण करून आपल्या समाजाची बदनामी केली म्हणून कोन्गूवेल्लालर समाजातल्या लोकांनी मुरगेसनचे हातपाय मोडले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी लेखकांवरच माघार घेण्यासाठी दबाव आणला.

महाराष्ट्रही वेगळा नाही...

हे प्रकार दक्षिणेतच घडतायत असं मानून आपण दुर्लक्ष करायचं कारण नाही. महाराष्ट्रात हिंदू देवदेवताच्या टवाळीचा आरोप ठेवून मराठी नाटकावर झालेले हल्ले फार जुने झालेले नाहीत. त्यावेळी अशा हल्ल्याना रोखून नाटकांना संरक्षण देण्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेस सरकारने आणि त्यांच्या अखत्यारीतल्या पोलीस खात्यानेही प्रत्यक्षात बोटचेपी भूमिका घेतली.

आळंदी साहित्य संमेलनात नियोजित अध्यक्ष आनंद यादव यांच्यावर 'संतसूर्य तुकाराम' कादंबरीच्या निमित्ताने अपमानजनक हल्ला चढवला तो वारकऱ्यातील हिंदुत्ववादी गटाने आणि ज्येष्ठ कवी वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेतून महात्मा गांधींची बदनामी होते म्हणून गुर्जरांवर खटला गुदरला तो पतित पावन संघटनेने. ज्यांनी कायम गांधींचा द्वेष केला, त्यांनीच गांधींच्या कथित बदनामीने कळवळून उठावं हा मोठाच विनोद होता.

Image copyright Getty Images

ही काही एवढीच उदाहरणं नाहीत. गेल्याच आठवड्यात गोव्यातील ख्यातनाम कादंबरीकार आणि अत्यंत ऋजू स्वभावाचे लेखक दामोदर मावजो यांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ गोवा सरकारवर आलीय. कर्नाटकात गौरी लंकेश यांचे जे संशयित मारेकरी सापडले आहेत, त्यांच्याकडे सापडलेल्या हिट लिस्टमध्ये मावजो यांचं नाव असल्याचं उघड झालंय.

देव, देश, धर्म, जात यांच्या रक्षणासाठी हिंसक होणाऱ्या लोकांच्या संख्येत आणि हिंसक घटनांत वाढच होते आहे. हे सर्व लोक कोण आहेत? त्यांना साहित्यातलं कळतं का? वसंत गुर्जर यांच्यावर गांधीबदनामीचा ठपका ठेवणाऱ्या लोकांना कविता कळली होती का? खरं तर हा प्रश्नच फजूल आहे. कादंबरी आवडली नाही तर वाचू नका, असं कोर्ट म्हणतं पण मुळात ती वाचलेलीच नसते नीट, हे कोर्टाच्या ध्यानातच येत नाही. कवितेतला लक्षणार्थ खुद्द कोर्टालाही कळलेला नसतो. तरीही हे लोक साहित्याच्या-कलेच्या प्रांतात लुडबूड करणं हा आपला हक्क समजतात.

अशावेळी सरकार, मग ते कोणाचंही असो, लुडबूड करणाऱ्या, धुडगूस घालणाऱ्या लोकांच्या बाजूने असतं, लेखक-कवी-कलावंतांच्या बाजूने नसतं. पोलीस खातंही सरकारचंच असतं. त्यामुळे तेही पक्षपाती असतं. अन्यथा वसंत गुर्जर यांना, त्यांनी माफी मागितली नाही तर डांबर फासून त्यांची गाढवावरून धिंड काढू, अशी जाहीर धमकी देण्याची हिंमत दाखवणाऱ्यांना पोलिसांनी प्रथम अटक केली असती. पण ते मोकाट आहेत. असे लोक मोकाटच असतात कारण सत्तेचं त्यांना उघड अभय असतं किंवा छुपा पाठिंबा तरी असतो वा सत्ताधाऱ्यांची हतबलता तरी असते.

कारण लेखक निरुपद्रवी असतो आणि जमावाकडे उपद्रव मूल्य असतं. किमान मतमूल्य तर असतंच असतं. ते प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या घटनेची बेमुरव्वतपणे धज्जी उडवतात आणि सरकार घटनेचे गोडवे गात त्यांना पाठीशी घालतं.

अडण्यांचा आत्मविश्वास

जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या हल्ल्याचा प्रश्न येतो, तेव्हा केंद्रीय मंत्र्यांपासून ते अनुपम खेरसारख्या कलावंतांपर्यंत सगळे तो धुडकावून लावत प्रतिप्रश्न करतात, 'देशाच्या पंतप्रधानांवर तुम्ही टीका करू शकता, तुम्हाला आणखी कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे?' जणू देशाच्या पंतप्रधानांवर टीका करता येणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परमावधी. ही मंडळी यातून एकप्रकारे लेखन आणि मतस्वातंत्र्याची आपली व्याख्या स्पष्ट करतात आणि मर्यादाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या मनातल्या गोष्टी, आपले विचार निःसंकोचपणे लिहिण्याची, उच्चारण्याची मुभा असणं आणि हा अधिकार इतरांनी त्याचा आदर राखून मान्य करणं. इतरांच्या मनच्या गोष्टी दडपून आपलीच 'मन की बात' दामटत राहणं नव्हे.

आणि होय, एका अर्थाने देशातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधितच आहे, असंच म्हणायला हवं. अन्यथा, मी गृहमंत्री असतो तर बुद्धिजीवींना गोळ्या घालण्याचे आदेश दिले असते, असं बेछूट विधान कर्नाटकचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनी केलं नसतं आणि, मुस्लिमांची संख्या वाढल्यानेच देशातील खून, बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली आहे, असं उत्तर प्रदेशचे खासदार हरी ओम पांडे बोलले नसते.

Image copyright Getty Images

ही अगदी ताजी उदाहरणं आहेत. एरवी देशातले अनेक महाभाग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेली काही वर्षं मनसोक्त उपभोगतच आहेत. त्यांना कोणीही अडवत नाही. अगदी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री सुद्धा. मात्र हे स्वातंत्र्य सिलेक्टिव्ह आहे. इतरांना ते नाही. त्यांनी ते उपभोगू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे, प्रसंगी त्यांचा बंदोबस्त करण्याचे अधिकार अशा अनेकांना दिले आहेत ज्यांना कविता कळत नाही, ज्यांचा साहित्याशी संबंध नाही, ज्यांना चित्रं पाहता येत नाहीत, संगीत कळत नाही, ज्यांना विज्ञानाचा गंध नाही, ज्यांना ज्ञानाचा तिटकारा आहे, ज्यांना विचार करता येत नाहीत, दुसऱ्याचे विचार ऐकणं मान्य होत नाही.

या असंख्याचं सामान्यपण, अडाणीपण उदार अंतःकरणांने समजावून घेत त्यांच्या जगण्यातला अभावच भरून काढलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निवडक उपभोक्त्यांनी. या असंख्यांपुढे एस. हरीश, मुरुगन, जोसेफ, मुरगेसन, गुर्जर या आणि अशा अनेकांचे आक्रोश किरकोळ आहेत. अशा वेळी संजय कुंदन या हिंदी कवीची काव्यपंक्ती पुनःपुन्हा आठवत राहते. कवी म्हणतो, बहुत भयावह लगता है अज्ञानियोंका आत्मविश्वास...

(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)