कोपर्डीच्या आईचं मराठा तरुणांना भावनिक आवाहन - ‘नाही करायच्या आत्महत्या’

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे, निर्मिती - जान्हवी मुळे

कोपर्डीचा रस्ता आता सगळ्यांना पाठ झाला आहे. गेल्या दोन वर्षांत न जाणे किती गाड्या या रस्त्यानं पाहिल्या आहेत. ती वर्दळ अजून कमी होत नाही.

रस्त्याकडच्या वस्त्यांमधून जसंजसं कोपर्डीकडे आपण जातो, तेव्हा घरांवर उभारलेले भगवे झेंडे लक्ष वेधून घेतात. कोपर्डीच्या चौकात सुद्धा बरेच झेंडे असतात. कारण ज्या गावातून पहिल्या मराठा आदोंलनाला सुरुवात झाली, ते गाव आजही दुसऱ्या टप्प्यातल्या आंदोलनाच्याही केंद्रस्थानी आहे.

मुख्य चौकातून थोडं पुढं गेल्यावर, थोडी वस्ती आणि काही शेतं ओलांडल्यावर सुद्रिकांचं वावर आहे. शेताच्या समोर घर आहे आणि शेतामध्ये आता मराठा आदोंलनाची प्रेरणा झालेल्या कोपर्डीच्या छकुलीचं स्मारक आहे.

या स्मारकाचं दर्शन घ्यायला आजही रोज गर्दी होते. अख्ख्या महाराष्ट्रातून तरुण येतात. अनेक जण इथं येऊन आंदोलनात सहभागी होतात.

कोपर्डीच्या घटनेनंतर लाखो महिला-पुरुषांचे मराठा मूक मोर्चे महाराष्ट्रभर निघाले. कोपर्डी महाराष्ट्रातल्या नव्या सामाजिक आंदोलनाचं केंद्र बनलं.

आज त्या घटनेला दोन वर्षं होऊन गेल्यानंतर, सत्र न्यायालयानं तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर, मराठा आरक्षणाच्या मागणीनं अनेक कायदेशीर मार्गानं प्रवास केल्यानंतर आणि आता या शांत स्वरूपाच्या आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केल्यानंतर, कोपर्डी या सगळ्या मधल्या काळाकडे कसं पाहतं, हा प्रश्न महत्त्वाचा होतो.

Image copyright BBC/Sharad Badhe
प्रतिमा मथळा रेखा सुद्रिक

कोपर्डीच्या पीडितेचे वडील बबन सुद्रिक आता पूर्ण वेळ मराठा आंदोलनात असतात. आम्ही जातो तेव्हा ते नुकतेच जवळपास पंधरा दिवसांनी घरी परतलेत. तुळजापूर, परळी अशा सगळ्या दुसऱ्या टप्प्यातल्या ठोक आंदोलनांना ते गेले होते.

घरात आता फक्त तिघे असतात. वडील, आई आणि आज्जी. एक मुलगी आणि मुलगा बाहेर शिकायला असतात. दोन वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात वस्तीला असलेले पोलीसही सामील झालेत. त्यांचेही तंबू बाहेरच्या अंगणात अजूनही आहेत.

बाजूच्या शेतालगतच्या शेडमध्ये भैय्यूजी महाराजांच्या संस्थेनं दिलेल्या दोन छोटेखानी स्कूल बसेस उभ्या आहेत. रोज पन्नास-शंभर लोक येतात, समोर स्मारकापाशी जातात, नंतर घरी भेटायला येतात. सुद्रिक कुटुंबीयांपैकी कुणी घरी असेल तर तेही येणाऱ्यांशी आवर्जून थोडंफार बोलतात.

Image copyright BBC/Sharad Badhe
प्रतिमा मथळा यापुढचं आयुष्य समाजासाठीच आहे बबन सुद्रिक म्हणतात.

"त्या वेळेस ती घटना झाल्यावर आम्ही काही जास्त मूक मोर्चांना गेलो नाही. गेलो की कायम डोळ्यांना पाणी यायचं. पण आता मी जातो," असं बबन मुद्रिक सांगतात.

"आम्ही काही कार्यकर्ते मागच्या महिन्यात मराठा क्रांती मोर्चात भेटलो आणि वाटलं की जनता आता विसरल्यासारखी झाली. क्रांती मोर्चाचं दुसरं पर्व सुरू करावं जेणेकरून शासनाला जाग येईल. तुळजापुरात आई जगदंबेचे आशीर्वाद घेऊन पहिला मोर्चा काढला. मग दुसऱ्या आंदोलनाची जागा परळी ठरवली. आम्ही ठोक मोर्चा शांततेचं काढायचा ठरवलं, म्हणजे ठोक भूमिका घेऊन. पण काही ठिकाणी वेगळंच वातावरण झालं," ते पुढे सांगतात.

मराठा आंदोलनात ते सक्रिय सहभागी आहेत. दिमतीला सुरक्षेसाठी असलेला पोलीस कॉन्स्टेबल घेऊन गाडी घेऊन एकटे फिरत असतात.

पण आता आक्रमक झालेल्या आंदोलनाबद्दल त्यांना काय वाटतं?

"आम्ही मागणी काय केली होती की आरक्षण द्या, नाहीतर जी महाभरती शासनानं जाहीर केली आहे तिच्यावर स्थगिती आणा. पण तसं काही झालं नाही. स्थगिती आणली असती तर वातावरण चिघळलं नसतं. तिथं शासनाची चूक झाली, नाहक बळी गेले, जाळपोळ झाली, नुकसान झालं," बबन सुद्रिकांना वाटतं.

सुद्रिक कुटुंबीयांचं आयुष्य गेल्या दोन वर्षांत खूप बदललंय. आधी कायम वावरात आणि गावातच असलेले बबन सुद्रिक आता बराच वेळ घराबाहेर असतात, आंदोलनात असतात. अहमदनगर न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर त्यांच्या सतत मुंबईला फेऱ्या व्हायच्या.

छकुलीच्या आईचं आयुष्य मात्र अगदी वेगळं, या गर्दीच्या हजेरीतही मात्र घरातच राहिलं. रेखा सुद्रिक यांचा अख्खा दिवस छोट्याशा घराच्या खिडकीतून आपल्या मुलीच्या स्मारकाकडे पाहत घरातली कामं करत असतात. बातम्या पाहत असतात. आंदोलनात काय चाललंय याकडे लक्ष ठेवून असतात. पण आईचं हृदय अजूनही दोन वर्षांपूर्वी झालेल्या जखमेनं भरून वाहतंय.

Image copyright BBC/Sharad Badhe
प्रतिमा मथळा कोपर्डी पीडितेचं स्मारक

"मी आंदोलनात पण कधी गेले नाही. मला जावंसं वाटत नाही, कारण पोरी बोलतात ना तिच्यावर. मी मोर्च्याला नाही, आंदोलनाला नाही, मी घर सोडून जात नाही. मग मला वाटतं की मी तिला ठेवून आले. ह्यांना मी म्हणते की तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जा, मी नाही येणार," त्या घडघडून बोलतात.

"मला वाटतं समाजानं माझ्यासाठी खूप केलं. पण मला खूप दु:ख होतं समाजात गेल्यावर. माणसांचं तेच तेच ऐकायला मिळतं म्हणून," त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं.

"मी तर सांगते, पहिलंच माझं आयुष्य चांगलं होतं. आता माझं आयुष्य अजिबात चांगलं नाही. आता नुसतं हॉस्पिटल, घर आणि थोडासा काहीतरी स्वयंपाक. रानात सुद्धा जात नाही. माझ्या स्वत:च्या मळ्यातसुद्धा जात नाही मी. जावंसंच वाटत नाही. तिचा मोठा फोटो पाहायचा. दरवाजा लावतांनाही, कधी कधी कुणी घरी नसलं तर, मी तिला बोलते की मी पाच मिनिटं दरवाजा लावते म्हणून. रोज मी तिला बोलते एक टाईम."

"घरात नाहीच ना कुणी. मोठी तिकडं, पोरगं कॉलेजला. आपलं तिलाच बोलायचं आणि चालू द्यायचं. फक्त मन आपलं घट्ट करायचं आणि रहायचं," रेखाताई सांगतात. "लोकं यायचे, भेटायचे. त्यांचं काय ते त्यांना बोलायचे आणि जायचे. माझं त्या बोलण्याकडे पण लक्ष नसायचं. अजून पण नसतं."

रेखाताईंचा जीव अजूनही आपल्या मुलीला मिळणाऱ्या न्यायामध्ये अडकलाय. त्या अत्याचारामुळं त्यावेळेस सगळ्याच, विशेषत: ग्रामीण भागातल्या, महिलांना स्वत:ची, स्वत:च्या मुलींच्या सुरक्षिततेची जाणीव झाली, असं त्यांना वाटतं.

"सगळ्यांना मुली असतात. बिनमुलीचं कुणीच नसतं. म्हणून ग्रामीण भागातल्यासुद्धा लेडीज सगळ्या बाहेर पडल्या. सगळ्या रस्त्यावर उतरल्या. मोर्च्यात सामील झाल्या. कुणी कामं पाहिली नाही, काही नाही. फक्त एवढीच इच्छा होती त्यांची की या नराधमांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे," रेखाताई म्हणतात.

"झालीच नाही शिक्षा त्यांना अजून. त्यांना नगरच्या कोर्टातच फाशी द्यायला पाहिजे होती. अपील करायला चान्सच नव्हता पाहिजे. इतकं वाईट कृत्य करतात म्हणजे त्यांना अपील कशाला पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की सहा महिन्यांच्या आत फाशी होईल. अजून फाईलच ओपन आहे किंवा नाही, हेच आम्हाला माहीत नाही," त्या आपली नाराजी व्यक्त करतात.

Image copyright BBC/Sharad Badhe
प्रतिमा मथळा आरोपी कोणत्याही जातीचा असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असं रेखा सुद्रिकांना वाटतं.

पण आपल्या मुलीच्या न्यायासाठी आर्ततेनं मागणी करणाऱ्या रेखाताईंना अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या प्रत्येकालाच ही शिक्षा व्हावी असं वाटतं. स्त्रियांवरचे अत्याचार जातीच्या रंगातून का पाहावेत, हा त्यांचा सवाल आहे.

"जातीय रंग नाही दिला पाहिजे. कारण आरोपी हा आरोपीच असतो. कारण मराठ्याचा आरोपी, जातीचा आरोपी, मराठ्याची मुलगी, बिगरजातीची मुलगी. ती पण मुलगीच आहे, तो पण आरोपी आहे, हा पण आरोपी आहे. मराठ्यांचा आरोपी जो असं करेल ना, त्याला पण नाही सुट्टी दिली पाहिजे," त्या म्हणतात.

आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात आरक्षणाच्या मुद्द्यानं जोर धरलाय. मराठा समाज रस्त्यावरही आक्रमक झालाय. त्याबद्दल रेखाताईंना काय वाटतं?

"अगोदर पूर्ण शांततेत मोर्चे झाले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिली. मुख्यमंत्र्यांच्यानं होतंच नव्हतं तर आश्वासनं दिली जर नसती तर अशी परिस्थिती परत घडली नसती," त्या सांगतात.

Image copyright BBC/Sharad Badhe
प्रतिमा मथळा दुसऱ्या टप्प्यात मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागलं आहे.

त्यांची दोन मुलं शिकत आहेत. गावातल्या इतर शेतकरी कुटुंबांमधल्या शिकणाऱ्या मुलांकडे त्या पाहात असतात. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीमागे असलेल्या आर्थिक आणि शैक्षणिक मुद्द्यांकडे त्या लक्ष वेधतात.

"कारण मराठ्यांना अहो, किती शिकतात मुलं, किती मार्क पडतात, सगळी तरी घरी येतात. आई बाप असे शेतात कष्ट करून मुलांना शिकवतात की आमचं पोरगं नोकरीला लागल्यावर आमचं काहीतरी बरं होईल."

"पण आपलं आरक्षण नडतं. कितीही मार्क असू द्या, मुलांना सर्व्हिसच लागत नाही. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की आरक्षण मुख्यमंत्री साहेबांच्या जर हातात असेल तर लवकरात लवकर द्यावं, हे असं वेगळं वळण लागण्यापेक्षा," त्या म्हणतात.

पण त्यासाठी होत असणाऱ्या आत्महत्यांबद्दल मात्र त्या दु:खी होतात. ते थांबवा, असं कळकळीनं सांगतात.

"माझं एकच म्हणणं आहे, की कुणी आत्महत्या करू नये आणि जाळपोळ करू नये. कारण ते शेतकऱ्याचंच नुकसान आहे. मुलांनी आत्महत्या करून काय होणार?"

"आता माझी छकुली गेली, मला दिसत ती नाही. त्या मुलांच्या आईबापांना पण असंच होईल ना? का करायची आत्महत्या? नाही करायची," रेखाताई म्हणतात.

एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची किंमत त्यांच्यापेक्षा अधिक कोण जाणू शकतं?

बबन सुद्रिक परत घरी आलेत तरी त्यांना आंदोलनात जायचं असतं. आता कर्जत तहसील कचेरीवर चाललेल्या ठिय्या आंदोलनासाठी निघायच्या तयारीत ते होते.

"यापुढचं आयुष्य समाजासाठीच आहे. लोकांनी आपल्यासाठी एवढं केलं, मग आपलं हे करायला काय जातं? सध्या इतकंच ठरवलं आहे की मराठा समाजासाठी काम करायचं, आपला बळी गेला तरी चालेल," बबन सुद्रिक म्हणतात.

एका पोलिस कॉन्स्टेबलला बरोबर घेऊन त्यांची गाडी कर्जतकडे निघून जाते. रेखाताई आणि आज्जी परत घरकामाकडे वळतात.

हेही वाचलंत का?