प्राचीन भारतातील हिंदू सहिष्णू होते का?

प्रातिनिधिक फोटो Image copyright Getty Images

प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा गाढा अभ्यास असणारे नामवंत इतिहासतज्ज्ञ द्विजेंद्र नारायण तथा डी. एन. झा यांनी 'मिथ ऑफ द होली काऊ' हे पुस्तक लिहिलं आहे. प्राचीन भारतात गोमांस खाल्लं जात होतं हे सिद्ध करणार हे पुस्तक लिहिलं असल्याने अशा विषयांवर वाद होणं साहजिक होतं.

त्यांच्या 'अगेंस्ट द ग्रेन - नोट्स ऑन आयडेंटिटी, इनटॉलरन्स अँड हिस्ट्री' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांनी प्राचीन भारतातील असहिष्णुता आणि भारत आज करत असलेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा प्रकाश टाकला आहे.

बीबीसीच्या भारतीय भाषांच्या संपादक रूपा झा यांनी हे पुस्तक आणि देशातील सद्यस्थितीच्या अनुषंगाने त्यांची मुलाखत घेतली.

या प्रश्नांची उत्तर डी. एन. झा यांनी इमेलवर पाठवली.

1. हिंदुत्ववादी विचारधारा मानणारे प्राचीन भारताला सामाजिक सद्भाव असणारे सुवर्णयुग मानतात. तर मध्ययुगाला मुस्लिमांनी हिंदूवर केलेल्या अत्याचारांचा, आक्रमणाचा आणि दहशतीचा कालखंड ठरवतात. पण, नेमके ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?

डी. एन. झा - ऐतिहासिक पुराव्यांवरून हे दिसून येतं की भारतीय इतिहासात असा कोणताही सुवर्णकाळ नव्हता. प्राचीन भारताकडे कधीही सामाजिक समतेचा आणि भरभराटीचा काळ म्हणून पाहिलं जाऊ शकत नाही.

प्राचीन काळात जातव्यवस्था प्रबळ होती हे दाखवणारे सबळ पुरावे आहेत. ब्राह्मणेतरांवर त्यांना अपंग करणारी कायदेशीर, आर्थिक आणि सामाजिक अशी बंधनं लादण्यात आली होती. विशेष करून शूद्र आणि अस्पृश्य हे याचे बळी ठरत होते. त्यामुळे प्राचीन भारताच्या समाजव्यवस्थेत मोठा तणाव होता.

आजच्या काळातील अंबानी आणि अदानी यांच्या सारखं त्या काळातील वरच्या जातीतील लोक, जमिनदार आणि सरंजाम आनंदी आणि सुखासीन जीवन जगत होते. परंतु आपण हे पाहात आलो आहोत की अशा लोकांसाठी कोणताही काळ हा सुवर्णयुगच असतो.

प्राचीन भारतात सुवर्णयुग होतं ही संकल्पना 19व्या शतकाच्या अखेरीला आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला जोर धरू लागली. गुप्त राजवटीचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ असल्याचं आणि गुप्त घराण्याने राष्ट्रवादाला जिवंत केल्याचं इतिहासतज्ज्ञ सांगू लागले.

पण डी. डी. कोसंबी यांच्यानुसार, गुप्त राजवटीमुळे राष्ट्रवाद वाढला नाही तर राष्ट्रवादाच्या प्रेरणेतून गुप्त राजवटीचा उदय झाला. खरं पाहिलं तर सामाजिक समता आणि भरभराट असलेल्या सुवर्णयुग या कल्पनेचा भारत आणि जगभरातील इतिहासकारांनी गैरवापरच केला आहे.

Image copyright Getty Images

मध्ययुगीन भारताचा इतिहास, मुस्लिमांच्या राजवटीला दहशत आणि अत्याचारांची राजवट दाखवण्याबद्दल बोलताना मुस्लिमांचं राक्षसीकरण करण्याचा काळ 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला. काही समाजसुधारक आणि इतर प्रमुख लोकांनी मुस्लिमांची प्रतिमा बिघडवून दाखवणं हे स्वतःच वैशिष्ट्य बनवलं.

उदाहरणच सांगायचं झालं तर दयानंद सरस्वती (1824-83) यांच्या 'सत्यार्थप्रकाश' या ग्रंथातील दोन धडे केवळ इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांना मलीन करण्यासाठी समर्पित आहेत.

तर विवेकानंद (1863-1902) यांनी म्हटलं होतं की, "पॅसिफिकपासून अटलांटिकपर्यंत जवळपास 500 वर्ष संपूर्ण जगभर रक्ताचे पाट वाहिले. हाच आहे इस्लाम."

मुस्लीम शासकांना वाईट आणि जुल्मी दाखवून त्यांची प्रतिमा बिघडवणं त्यावेळी सुरू झालं, ते आजही सुरू आहे. हिंदुत्ववादी विचारवंत आणि अनुयायांनी मुस्लीम शासकांचं चित्र षडयंत्र रचणारे, हिंदूंच धर्मांतर करणारे, हिंदूंची मंदिरं पाडणारे आणि महिलांवर बलात्कार करणारे असं रंगवलं.

पण मध्ययुगीन भारत आणि मुस्लिमांचं असं चित्रण करणाऱ्या संकल्पनांना ताराचंद, मोहंमद हबीब, इरफान हबीब, शिरीन मुस्वी, हरबन्स मुखिया, ऑड्रे ट्रश्की आणि इतर इतिहासकारांनी वारंवार आव्हान दिलं.

या इतिहासतज्ज्ञांनी संशोधनातून दाखवलं की मुस्लीम शासकांचे अत्याचार फार वाढवून चढवून दाखवण्यात आले आहेत. या इतिहासकारकांनी हेही दाखवलं ही मुस्लीम शासकांचे हे अत्याचार त्या काळातील त्यांची राजकीय गरज म्हणून होते.

वसाहतपूर्व काळात मुस्लीम आणि हिंदू यांच्यातील संघर्षाचे जास्त पुरावे नाहीत. या उलट मुघलांच्या काळात सांस्कृतिक भरभराट झाली होती.

2. हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म असल्याचे बरेच दाखले दिले जातात. तुम्ही हिंदू धर्माला सहिष्णू धर्म मानता का?

डी. एन. झा - माझ्या मते सगळेच धर्म एकप्रकारे फूट पाडणारे आहेत. हिंदू धर्मही त्यात मागे नाही. ब्राह्मणवादी विरुद्ध श्रमण परंपरा मानणारे बौद्ध, जैन यांसारख्या धर्मांमध्ये प्राचीन काळपासून ते मध्ययुगात मोठे वाद झाल्याचे पुरावे आहेत. त्यांच्यातला विरोध पुरातन कागदपत्रांमध्ये दिसून येतो. यासाठी एक उदाहरण देतो.

Image copyright Getty Images

पतंजली (इसवी सन पूर्व 150) यांनी त्यांच्या 'महाभाष्य' या ग्रंथात ब्राह्मण आणि बौद्ध, जैन यांच्यात साप आणि मुंगसासारखं वैर असल्याचं म्हटलं आहे. बौद्ध आणि ब्राह्मणांमधील या वादाची झलक त्यांच्या त्यांच्या धर्मग्रथांत दिसून येते.

अनेक पुरातत्वीय पुरावेही ब्राह्मण आणि बौद्ध यांच्यातील संघर्षाकडे बोट दाखवतात. कशा पद्धतीने बौद्ध वास्तू पाडण्यात आल्या किंवा त्यांच्यावर कब्जा करण्यात आला हे यातून दिसतं.

देशातून बौद्ध धर्म हद्दपार होण्यामागे ब्राह्मणवाद्यांची त्यांच्या विरोधातली आक्रमकता एक कारण आहे. ब्राह्मण धर्माने कधी बौद्ध धर्माची सत्यता स्वीकारली नाही. त्यामुळे हिंदू धर्म हा सहिष्णू म्हणण्याला विशेष आधार नाही.

3. 'भारत' या कल्पनेचा उदय नेमका केव्हा आणि कधी झाला?

डी. एन. झा - हिंदुत्ववादी विचारधारेचा पुरस्कार करणारे भारत या संकल्पनेला कालातीत आणि पुरातन मानत आले आहेत. पण, या भौगोलिक भारताचा संदर्भ वैदिक ग्रंथामध्ये आढळत नाही. या भारतातील सर्वांत जुन्या साहित्यकृती आहेत. पण वेदांमध्ये अनेक ठिकाणी भारत या जमातीचा उल्लेख आढळतो.

इसनी सन पूर्व पहिल्या शतकात राजा खारवेलच्या काळातील एका शिलालेखात भारतवर्षचा पहिला संदर्भ सापडतो. आपण असं म्हणू शकतो की या भारतवर्षचा अर्थ आताचा उत्तर भारत असू शकतो. पण यात मगधचा समावेश नव्हता.

महाभारतात भारताचा उल्लेख खूप मोठ्या प्रदेशाच्या अर्थानं घेतला गेला असला तरी दख्खन आणि सध्याच्या दक्षिण भारताशी त्याचा काहीही संबंध नव्हता. पुराणात भारतवर्षचा उल्लेख वारंवार असला तरी त्याच्या सीमा वेगवेगळ्या सांगितल्या आहेत. काही ठिकाणी भारतवर्षचा उल्लेख त्रिकोणी तर काही ठिकाणी चंद्राच्या आकाराचा म्हटलं आहे. काही पुराणांत याचं वर्णन चौकोनी, धनुष्याच्या आकाराचा असाही आहे.

परंतु भारताचा माता म्हणून उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात नाही.

भारत या प्रतिमेला स्त्री म्हणून भारतमाता हे दिलेलं प्रतीक द्विजेंद्र रॉय (1863-1913) यांच्या गीतात आढळतं. त्यानंतर बंकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठात असा उल्लेख आलेला आहे. भारतमाता या संकल्पनेला मानवी स्वरूप 1905 साली अवनिंद्रनाथ टागोर यांनी काढलेल्या चित्रातून येतं. या चित्रात भारत मातेला वैष्णव संन्यासी महिला दाखवण्यात आलं आहे.

भारत मातेचा पहिला नकाशा 1936ला वाराणसीमध्ये बांधलेल्या भारत मातेच्या मंदिरात दिसतो.

4) तुमच्या 'अगेंस्ट द ग्रेन' या नव्या पुस्तकात ब्राह्मणवाद्यांनी कधी बौद्ध धर्माला मान्य केलं नाही, असं म्हटलं आहे. याचा अर्थ काय? तसंच सध्याच्या दलितांना आक्रमकेतला तोंड द्यावं लागत आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहाता?

डी. एन. झा - हिंदुत्ववादी असहिष्णुतेवर मी पूर्वीही बोललो आहे. त्या प्रकाशात जर हे पाहिलं तर अगदी स्पष्ट आहे की ब्राह्मणवादी नेहमी बौद्ध धर्माच्या अनुयायांचे कडवे विरोधक राहिले आहेत.

सध्या दलितांवर त्याताही बौद्धांवर जे अन्याय होत आहेत त्याची मुळं ही जाती व्यवस्थेत आहेत.

Image copyright Getty Images

वर्गात विभागलेल्या हिंदू धर्मात दलितांचं स्थान सर्वांत खालच्या पायरीवर आहे. याचं कारण हेही आहे ते गोमांस खातात जे उच्च हिंदूंच्या मान्यतांच्या विरोधात आहे. गाईगुरांची वाहतूक करणाऱ्या तसंच बीफ खाणाऱ्यांची हत्या करण्याच्या (मॉब लिंचिंग) जितक्या घटना घडलेल्या आहेत त्यात हिंदुत्ववाद्यांचा हात असणं यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही.

5) सध्याच्या काळात हिंदू म्हणून ओळख याकडे तुम्ही कसं पाहता?

डी. एन. झा - हिंदुत्व दीर्घकाळापासून चालत आलेल्या प्रथा, परंपरा, कर्मकांड आणि मान्यता यांचा मिलाप आहे.

पण नव्या काळात हिंदुत्ववादी याला एकाच मान्यतांचा, आस्थांचा आणि प्रथांच्या लोकांचा धर्म बनवण्यावर अडून बसले आहेत.

या धर्मातील विविधता नकारून एकाच प्रकारच्या लोकांचा कट्टर धर्म म्हणून दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Image copyright Getty Images

नव्या हिंदुत्वात गाईला आदराचं स्थान देणं, इतर देवी-देवतांपेक्षा रामाला आणि इतर धार्मिक ग्रंथापेक्षा रामायणाला अधिक महत्त्व देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मी ऐकलं होतं की काही हिंदुत्ववादी मनुस्मृतीमध्ये काळानुरूप बदल करून ती पुन्हा लिहिणार होते.

हे सर्व एकाच गोष्टीचं द्योतक आहे, ते म्हणजे हिंदुत्वाची पूर्वी नसणारी खोटी ओळख ठसवली जात आहे. परिणामस्वरूप भारताला अशा अंधकार युगात ढकललं जात आहे, जिथं धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिचर्चा विषारी झाल्या आहेत.

6) गाय ही भावनाप्रधान संस्कृतीचं प्रतीक म्हणून केव्हा उदयास आली. आताच्या काळात गायीचा वापर या कारणासाठी होत असताना तुम्हाला काय वाटतं?

डी. एन. झा - गोहत्येला बंदी असावी अशा प्रकारचा विचार प्राचीन काळाच्या शेवटी आणि मध्ययुगाच्या सुरुवातीला पुढे येऊ लागला होता. त्यानंतर इस्लामच्या प्रवेशामुळे या विचाराला बळकटी मिळाली.

विरोधाभास असा की वैदिक काळात ब्राह्मण गोमांस खात होते पण त्यांनीच मुस्लिमांची हेटाळणी गोमांस खाणारे म्हणून करण्यास याच काळात सुरुवात केली.

Image copyright Getty Images

गाय एक भावनिक सांस्कृतिक प्रतीक म्हणून पुढं आली ती मध्ययुगात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयानंतर ही गोष्ट अधिक ठळकपणे दिसू लागली. शिवाजी महाराजांना ईश्वराचा अवतार म्हटलं जातं असे. ब्राह्मण आणि गायींचे रक्षण करणारे (गोब्राह्मण प्रतिपालक) असं त्यांच्याकडं पाहिलं जात होतं.

पण 1870मध्ये शीख कुका आंदोलनावेळी लोकांना एकत्र करण्यासाठी पहिल्यांदा गाईचा वापर झाला. 1882मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी गोरक्षणी सभेची स्थापना केली होती. गोरक्षणाची चळवळ तीव्र होत गेली तसं गोमाता हा शब्दप्रयोगही रूढ होऊ लागला. याच काळात भारताला भारतमाता बनवलं जात होतं. वर्तमानात एक नवीन शब्द कानावर पडत आहे, तो म्हणजे राष्ट्रमाता.

ही उपाधी मलिक मोहंमद जयसी यांची निर्मिती असलेल्या पद्मावतमधील व्यक्तिरेखेला म्हणजेच राणी पद्मावती यांना देण्यात आली आहे. पण यामुळे भारताच्या एकात्मतेला धक्का बसत आहे.

7) 2019च्या निवडणुकांआधी राम मंदिराचं राजकारण पुन्हा तापत आहे. तुम्ही लिहिलं होतं 17 आणि 18 व्या शतकाआधी उत्तर भारतात राम मंदिर नव्हतं, त्याबद्दल काय सांगाल?

डी. एन. झा - हिंदुत्ववादी ब्रिगेड काहीही म्हणू द्या पण 17व्या आणि 18व्या शतकाआधी उत्तर भारतात राम मंदिर होतं याला कोणताही पुरावा नाही. मात्र मध्य प्रदेशात 12व्या शतकातील एकदोन राम मंदिर नक्की आहेत. खरं सांगायचं तर आयोध्या जैन आणि बौद्ध धर्माचं मोठं केंद्र होतं. 1528ला मीर बाकी यांनं जेव्हा तिथं मशीद बांधली तेव्हा तिथं कोणतही राम मंदिर नव्हतं.

Image copyright Getty Images

8) देशाला सर्वसमावेशक बनवण्यासाठी इतिहास काय योगदान देऊ शकतं?

डी. एन. झा - भारताला सर्वसमावेशक बनवण्यासाठी इतिहासकार मोठं योगदान देऊ शकतात. आतापर्यंत इतिहासकारांनी फक्त अनाकलनीय आणि तांत्रिक शब्द वापरून आपलं साहित्य लिहिलं आहे. ते सामान्य माणसापर्यंत पोहोचलं नाही.

Image copyright AFP

जर त्यांनी सामान्य माणसांसाठी लिहिलं तर सामान्य माणसांची विचारप्रक्रिया अधिक तर्कशुद्ध होईल आणि ते इतिहासाकडे अधिक सजगतेने पाहतील.

इतिहासकारांनी फक्त इंग्रजीत लिहू नये तर त्यांनी प्रादेशिक भाषांमध्येही लिहावं. धर्माच्या तर्कशुद्ध विचारसरणीमुळे सर्वसमावेशकतेला चालना मिळेल तर तर्कहीन दृष्टिकोनामुळे परस्परद्वेष वाढीस लागेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)