मुख्यमंत्र्यांकडून पुरस्कार मिळालेला 'चित्रकार' का झाला मजूर?

कांती राठवा याने चित्रकला स्पर्धेत काढलेलं हेच ते चित्र. Image copyright VINOD RATHVA
प्रतिमा मथळा कांती राठवा याने चित्रकला स्पर्धेत काढलेलं हेच ते चित्र.

"जेव्हा मी शेतात मजुरीचं काम करत होतो, तेव्हा मला कळलं माझं बनवलेलं पेंटिंग एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापून आलं आहे." 12वर्षीय कांती राठवा सांगत होता. कांती गुजरातमधल्या छोटा उदयपूरच्या कछेल गावात राहातो. हे गाव अहमदाबादपासून 200 किलोमीटर दूर आहे.

तीन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाशी निगडीत एका चित्रकला स्पर्धेत कांती संपूर्ण राज्यात अव्वल ठरला होता. त्यावेळच्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते कांती राठवाचा सत्कार झाला होता.

मुख्यमंत्र्यांकडून सत्कार झाल्यानंतरही कांतीची परिस्थिती सुधरली नाही. उलट त्याची कौटुंबीक स्थिती ढासळतच गेली. हातात पेंटिंगचा ब्रश येण्याऐवजी त्याच्या हाती कुऱ्हाड आली.

कांतीनं त्या स्पर्धेत काढलेलं चित्र NCERTच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बनलं, पण तो स्वतः मात्र मजूर बनला.

...जेव्हा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार झाला

2015मध्ये कांती तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. त्याच वेळी काढलेल्या या चित्राला मुख्यमंत्र्यांकडून पुरस्कार मिळाला होता.

त्या चित्रकला स्पर्धेत कांतीनं जमीन स्वच्छ करणाऱ्या महात्मा गांधी यांचं चित्र काढलं होतं. या चित्रासाठी कांतीला प्रथम पुरस्कारासह 2000 रुपयेही मिळाले.

स्वच्छ भारत ही केंद्र सरकारची योजना असून, संपूर्ण देशात साफ-सफाईला प्रोत्साहन देणं हा योजनेचा उद्देश आहे.

शाळेतून शेताकडे...

मजुरी हाच मुख्य पेशा असलेल्या कुटुंबातून कांती येतो. त्याचे आई-वडील सध्या अहमदाबादपासून 130 किलोमीटर दूर असलेल्या सुरेंद्रनगर इथे मजुरीचं काम करतात.

Image copyright VINOD RATHVA
प्रतिमा मथळा कांती राठवा आणि त्याचे आई-वडील.

चित्रकला स्पर्धेतला पुरस्कार मिळाल्यानंतर 2 वर्षं कांतीला शाळेत जाणं शक्य झालं. याबद्दल बोलताना कांती सांगतो, "मला दोन छोटे भाऊ आणि दोन छोट्या बहिणी आहेत. ते सुद्धा माझ्या आई-वडीलांसोबत काम करतात. माझी लहान भावंडं काम करतात, तर मग मी इथे बसून अभ्यास कसा काय करू? घराची परिस्थितीच अशी होती की मला शाळाच सोडून आपल्या कुटुंबाच्या मदतीला जावं लागलं."

नुकतीच NCERTनं दोन पुस्तकं छापली. त्यातल्या एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कांतीनं इयत्ता तिसरीमध्ये चित्रकला स्पर्धेत काढलेलं ते चित्र छापण्यात आलं होतं.

पण, जेव्हा हे पुस्तक छापलं गेलं, तेव्हा कांतीची शाळा मात्र सुटली होती. तो सुरेंद्रनगरला आपल्या आई-वडीलांच्या मदतीला मजुरीचं काम करण्यासाठी गेला होता.

कांतीने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मला हे माहीतही नव्हतं की, मी काढलेलं चित्र पुस्तकावर छापलं गेलं आहे. माझी आजी गेली म्हणून मी छोटा उदयपूरला आलो. तेव्हा माझ्या शिक्षकांनी ही बातमी मला दिली."

छोटा उदयपूरच्या कांतीच्या शाळेतले शिक्षक विनोद राठवा सांगतात की, "कांतीच्या काकांनी मला त्याच्याबाबत काय घडलं हे सांगितलं होतं. त्याचं चित्र पुस्तकावर छापलं गेलं आहे आणि याची त्याला माहिती देखील नाही याचं मला आश्चर्य वाटलं. ज्यांनी त्याला पुरस्कार दिला, त्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीची जाणीवही नाही."

मदतीचे हात

जेव्हा कांतीच्या गाववाल्यांना त्याच्या स्थितीबद्दल कळलं तेव्हा त्यांनी त्याची मदत करण्याचा विचार सुरू केला. विनोद राठवा सांगतात, "कांतीने पुन्हा शिकावं यासाठी सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही."

Image copyright KANTI RATHVA
प्रतिमा मथळा कांतीचे आई-वडील आणि त्याचे शिक्षक विनोद राठवा.

पण, आता मदतीसाठी काही लोक पुढे आले आहेत. जेव्हा गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी. सी. ठाकूर यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं.

पी. सी. ठाकूर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मी स्वतः कांतीच्या परिवाराला भेटायला गेलो. मी त्यासाठी इतरांनाही भेटलो आणि त्याच्यासाठी मदत मिळवण्याचा प्रयत्न केला."

विनोद राठवा यांनीच आता कांतीला दत्तक घेतलं आहे. जेणेकरून तो त्याचं शिक्षण पूर्ण करू शकेल. विनोद राठवा आणि पी. सी. ठाकूर यांच्या मदतीनं कांती पुन्हा शाळेत जाऊ लागला आहे. तो आता छोटा उदयपूरजवळच्या एकलव्य शाळेत शिक्षण घेत आहे.

चित्रकार बनण्याची इच्छा

कांतीला कला क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं आहे. त्यांचे वडील जेंदू राठवा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "कांती शाळेत जात असल्याचा आम्हाला आनंद आहे. पण, आमच्यासाठी खेदाची बाब आहे की, आम्ही आमच्या बाकीच्या मुलांना शाळेत पाठवू शकत नाही."

Image copyright VINOD RATHVA

कांतीने तिसरीमध्ये असताना काढलेलं चित्र आज त्याचं शालेय शिक्षण पुन्हा सुरू करण्यामागचं कारण बनलं आहे. गुजरातच्या शिक्षण विभागाच्या आकड्यांनुसार, 2013-14मध्ये शिक्षण अर्ध्यातच सोडणाऱ्यांचा दर 6.91 टक्के आहे.

विनोद राठवा सांगतात, "कांती भविष्यांत चित्रकार किंवा कलाकार बनू शकतो. पण, आपण मुलांना शिक्षण अर्ध्यात सोडण्यापासून थांबवू नाही शकलो, तर भविष्यांतले अनेक कलाकार आपण गमावून बसू."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)