#5मोठ्याबातम्या: गुन्हे दाखल झालेल्या मराठा तरुणांना नोकऱ्या कशा मिळणार - राज ठाकरे

राज ठाकरे Image copyright PAL PILLAI/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा राज ठाकरे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे, त्यांना नोकऱ्या कोण देणार? - राज ठाकरे

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान तरुणांवर 307सारखे गंभीर गुन्हे लावण्यात आले आहेत. आता आरक्षण मिळालं तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ही बातमी एबीपी माझानं दिलं आहे.

मराठा समाज शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागत आहे, पण सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

मोदी सरकारनं सत्तेत आल्यावर नोटाबंदी घातली त्यामुळे 3 कोटी नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मात्र योगा करत आहेत असा टोला राज यांनी लगावला.

मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलं आहे. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

2. हा तर 'मॉब लिंचिंग'चा प्रकार - हीना गावित

खासदार हीना गावित यांच्यावर मराठा आंदोलकांनी हल्ला केला. 'हा तर मॉब लिंचिंगचा प्रकार होता आणि आपल्याला आपला मृत्युच समोर दिसत होता,' असं वक्तव्य हीना गावित यांनी केल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दिलं आहे.

"आंदोलन अनेक प्रकारचे होतात पण एखाद्या महिला लोकप्रतिनिधींच्या वाहनावर असा हल्ला होत असेल तर हे निंदनीय आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार हीना गावित यांनी दिली.

Image copyright Twitter

खासदार हीना गावीत त्यांच्या वाहनात असतानाच ही तोडफोड करण्यात आली. गाडीवर चढत गाडीची तोडफोड केली. खासदार गावित यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. पण या घटनेमुळे खासदार हीना गावित यांना धक्का बसला आहे असं न्यूज 18नं म्हटलं आहे.

धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनाही मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

3. भावी डॉक्टरांना स्कर्ट आणि बर्म्युडाची बंदी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कॉलेज परिसरात शॉर्ट्स, शॉर्ट पँट, स्कर्ट, बरमुडा असे कपडे घालता येणार नाही.

त्याचवेळी परीक्षा देताना आणखी वेगळा ड्रेस कोड विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळा ड्रेस कोड असणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

विदयापीठाच्या विद्या परिषद बैठकीत याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले. महाविद्यालय, रुग्णालय आणि ग्रंथालय परिसरामध्ये वावरताना हा ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना शर्ट आणि फुल पँट, अप्रन बंधनकारक करण्यात आलं आहे. मुलींसाठी शर्ट-फुल पँट, साडी किंवा सलवार कमीझ, अप्रन, शूज बंधनकारक करण्यात आलं आहे. कॉलेज, रुग्णालय आणि ग्रंथालय परिसरात बिनबाह्यांचे शर्ट, बरमुडा, शॉर्ट पँट किंवा स्कर्ट घालता येणार नाही.

परीक्षा देताना अर्ध्या बाह्यांचे शर्ट किंवा टी-शर्ट किंवा फिक्या रंगाचा शर्ट आणि फुल पँट किंवा साडी-सलवार-कमीज बंधनकारक करण्यात आली आहे.

नक्षीदार बटण, अंगठी-साखळी किंवा अॅप्रन-टोपी-गॉगल-पर्स-वॉलेटसह किंवा घड्याळ आणि कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह परीक्षा देता येणार नाही. परीक्षेवेळी पायात चप्पल असावी, शुज नव्हे, असेही परिपत्रकात नमूद आहे.

4. महाराष्ट्र सरकार घेणार 40,000 कोटींचं कर्ज

महाराष्ट्र सरकार 40,000 कोटींचं कर्ज घेणार असल्याची बातमी लोकसत्तानं दिली आहे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करणे, मेगा नोकरी भरती, शेतकरी कर्जमाफी, दूध अनुदान या गोष्टींमुळे सरकारवर भविष्यात आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.

त्यामुळे सरकार खुल्या बाजारातून 40,000 कोटींचं कर्ज घेणार असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे. केंद्र सरकारनं मर्यादित कर्ज काढण्यासाठी मान्यता दिली आहे. 1 जानेवारी 2016पासून पूर्वलक्षी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी 21,000 कोटींची आवश्यकता आहे.

5. आधारची माहिती सुरक्षित-UIDAI

आधार यंत्रणेच्या प्रतिमेला बट्टा लावण्यासाठी तसंच नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी समाजातील काही घटकांनी आधार हेल्पलाइन नंबर फोनबुकमध्ये सेव्ह करण्याचं षडयंत्र रचलं असं UIDAIने स्पष्ट केलं. डेक्कन क्रोनिकलनं यासंदर्भात बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आधार कार्ड

मोबाइलच्या फोनबुकमध्ये सेव्ह केलेला नंबरच्या माध्यमातून डेटा चोरला जाऊ शकत नाही असंही UIDAIने तर्फे सांगण्यात आलं.

गुगलकडून झालेल्या तांत्रिक चुकीमुळे आधार हेल्पलाइन क्रमांक फोनमध्ये सेव्ह झाला. यामुळे गोपनीय माहितीला जराही धक्का पोहोचलेला नाही मात्र त्यासंदर्भात विनाकारण अफवा उठवण्यात आल्या.

यामुळे आधार यंत्रणेची बदनामी झाली. अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने आधार यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. आधारने नागरिकांना कोणताही क्रमांक सेव्ह करण्यास सांगितलेलं नाही. आधारसंदर्भात नवा हेल्पलाइन क्रमांक 1947 नागरिक सेव्ह करू शकतात असं UIDAI ने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)