'मराठा आरक्षण नोकरी देऊ शकतं पण नोकरी निर्माण नाही करू शकत' - सोशल

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Getty Images

"मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत. बँकेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स यंत्रणेचा वापर वाढला आहे. यामुळे तिथेही नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरभरतीही बंद आहे. आरक्षणाचा फायदा फक्‍त शिष्यवृत्तीसाठी मिळेल."

राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हे विधान केलं आहे.

"देशात आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणावर सुरू झाले. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आरक्षण न देण्याचा निर्णय घेतला. तरीही मुख्यमंत्री आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाबाबत शांतता राखण्याची गरज आहे. लोकांना समजावून सांगण्याचीही आवश्‍यकता आहे," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

दरम्यान, नितीन गडकरींच्या या वक्तव्याबाबत वाचकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही 'होऊ द्या चर्चा'मधून केला आहे. त्यावर वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया खालीलप्रमाणे -

बाबू डिसुझा म्हणतात, "पक्षाने नोकऱ्या देण्याची खोटी आश्वासनं दिलं, याची अप्रत्यक्षरीत्या ते कबुलीच देत आहे. सगळीकडे कंत्राटी ठेकेदारी पद्धत आणून नोकऱ्या कमी त्यांनीच केल्या."

फोटो स्रोत, Facebook

"खासगीकरण जोरात होत असल्याने शासकीय नोकऱ्याच कमी होत जातील. खासगी कंपन्यांमध्ये कुठल्याच जातीला आरक्षण मिळू शकत नाही. जरी 100% आरक्षण मिळालं तरी कोट्यवधी मराठा बांधवांना पुरणार नाही. त्यामुळे फक्त आरक्षण मिळाल्यावर प्रश्न सुटणार नाहीत," अशी प्रतिक्रिया यशवंत पिंगळे यांनी दिली आहे.

यशवंत यांच्या या प्रतिक्रियेला मीना काने, रोहन तिखे, यांच्यासह अनेकांनी 👍 सहमती दर्शवली आहे.

फोटो स्रोत, Facebook

"तर आरक्षण फक्त नोकऱ्यांपर्यंतच मर्यादित आहे, असं यांना का पटवून द्यायचं आहे? नोकऱ्या नाहीत तर मग 2014ला यांनी लोकांना खोटी आश्वासनं का दिली? फसवणूक करून निवडून आलेलं हे सरकार, आता दिशाभूल करून उरलेले दिवस भरती करण्याचा प्रयत्न आहे हा," असं मत जयमाळ धनकीकर यांनी व्यक्त केलं आहे.

"जर नोकऱ्या नाहीत तर सगळे आरक्षण रद्द करा ना मग. पूर्ण माहिती घेतल्या शिवाय का बोलतात मंत्री लोक? आणि 2014 मध्ये जे 'हर साल दो करोड रोजगार' म्हणून गळा फाडत होते ते कुठे आहेत? 'हर महिना 2 लाख बेरोजगार' अशी परिस्थिती निर्माण केली या सरकारने," असा ही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook

"श्याम चतूर यांनी आरक्षणाला फक्त नोकरी सोबत जोडलं जाऊ नये," असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook

कौस्तुभ जंगम यांनी नितीन गडकरींचं विधान योग्य असल्याचं म्हटलं आहे. "आरक्षण नोकरी देऊ शकतं पण नोकरी निर्माण नाही करू शकत. आणि फक्त नोकरीच काही जगायचं साधन नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच सगळ्या नोकऱ्या आरक्षणात येत नाहीत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तरुणांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असं मला वाटतं," असं ही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)