सुप्रीम कोर्टात आता न्यायदान करणार 3 महिला

सुप्रीम कोर्ट
प्रतिमा मथळा सुप्रीम कोर्टातल्या तीन महिला न्यायमुर्ती

दीर्घकाळानंतर सुप्रीम कोर्टात मंगळवारी 3 न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. न्यायमूर्ती के. एम. जोसेफ, विनीत शरण आणि इंदिरा बॅनर्जी आता सुप्रीम कोर्टाचा भाग असतील.

के. एम. जोसेफ यांच्या नियुक्तीवरून बरीच चर्चा झाली होती. पण चर्चा झालेल्या नावांमध्ये आणखी एक नावाचा समावेश आहे, जे भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात नोंदलं जाईल. हे नाव म्हणजे इंदिरा बॅनर्जी.

देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती एकत्र असतील त्या म्हणजे न्यायमूर्ती आर. भानुमती, इंदू मल्होत्रा आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी.

गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं.

त्यांनी मंगळवारी सकाळी पदाची शपथ घेतली.

इंदिरा बॅनर्जी यांचा प्रवास

इंदिरा बॅनर्जी यांचा जन्म 24 सप्टेंबर 1957ला झाला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण कोलकता इथल्या लोरेटो हाऊसमध्ये झालं आहे. त्यानंतर त्यांनी कोलकतामधल्या प्रसिद्ध प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कायद्याच्या शिक्षणासाठी त्यांनी कोलकता लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला.

5 जुलै 1985ला त्या वकील बनल्या आणि कनिष्ठ न्यायलयात तसंच हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी फौजदारी गुन्ह्यांबरोबरच सगळ्या प्रकारच्या खटले लढले आहेत. त्यानंतर 5 एप्रिल फेब्रुवारी 2002ला त्या कोलकता हायकोर्टात न्यायमूर्ती बनल्या.

2016ला त्यांची नियुक्ती दिल्ली हायकोर्टात झाली. 5 एप्रिल 2017ला मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमू्र्ती होणाऱ्या त्या 8व्या महिला आहेत. त्याचा कार्यकाळ 4 वर्ष आणि 1 महिन्याचा असेल.

मद्रास हायकोर्टात मुख्य न्यायाधीश असताना त्या सुप्रीम कोर्टाच्या अंर्तगत समितीच्या अध्यक्ष होत्या. ही समिती सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ओडिशा हायकोर्टच्या एका न्यायमूर्तीवर लावलेल्या आरोपांवर केलेल्या तपासासाठी नेमण्यात आली होती.

याशिवाय अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला यांच्यावर मेडिकल प्रवेशासंदर्भात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीवरही त्या होत्या.

देशातील सर्व हायकोर्टांतील सगळ्या न्यायमूर्तीमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकाच्या वरिष्ठ मुख्य न्यायाधीश आहेत. त्यामुळे त्यांना ही पदोन्नती मिळाली आहे. प्रांतिक प्रतिनिधित्वाचा विचार केला तर सुप्रीम कोर्टात पश्चिम बंगालचा कोटा रिकामा होता. त्यांच्यामुळे पश्चिम बंगालला प्रतिनिधित्व मिळालं आहे.

इंदू मल्होत्रा

याच वर्षी एप्रिल महिन्यात इंदू मल्होत्रा यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून नेमण्यात आलं. या आधी त्या वरिष्ठ वकील होत्या. बार काऊन्सिलवरून न्यायमूर्ती बनलेल्या पहिल्या आहेत.

त्यांचे वडील प्रकाश मल्होत्रा सुप्रीम कोर्टात वकील होते. मल्होत्रा यांचा जन्म 14 मार्च 1956मध्ये झाला. त्यांचं शिक्षण दिल्लीत झाले आहे. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झालं आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात 30 वर्ष प्रॅक्टिस केली आहे.

आर. भानुमती

आर. भानुमती 2014ला सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बनल्या. त्यांचा जन्म 20 जुलै 1955ला झाला. तामिळनाडू हायकोर्टात 2003ला त्या न्यायमूर्ती बनल्या. 2013ला झारखंडच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी 'Handbook of Civil and Criminal Courts Management and Use of Computers' हे पुस्तक लिहिलं आहे.

Image copyright SUPREME COURT

सुप्रीम कोर्टात इंदिरा बॅनर्जी आणि इंदू मल्होत्रा आज ज्या जागी पोहोचल्या आहेत, त्या जागी पोहोचणाऱ्या पहिल्या महिला होत्या न्यायमूर्ती फातिमा बीबी.

त्यानंतर सुजाता मनोहर, रूमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना देसाई सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती होत्या.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)