#5मोठ्याबातम्या - तर त्यांना आम्ही मुस्लीम बनवून दाढी ठेवायला भाग पाडू : ओवेसी

ओवेसी

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी मोठ्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. त्यांना आम्ही मुस्लीम बनवू आणि दाढी ठेवायला भाग पाडू : ओवेसी

गुरुग्राम (गुडगाव) मध्ये कथितरित्या एका मुस्लीम व्यक्तीला दाढी काढण्यास बळजबरी केल्याच्या घटनेवर असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र निषेध नोंदवत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना आम्ही मुस्लीम बनवू आणि दाढी ठेवायला भाग पाडू असा इशारा त्यांनी दिला आहे. हे वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसनं दिलं आहे.

"गुरुग्राममध्ये एका मुस्लीम व्यक्तीची दाढी छाटण्यात आली. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना आणि त्यांच्या वडिलांना हे सांगावंसं वाटतंय की तुम्ही आमचा गळा चिरला तरी आम्ही मुसलमानच राहू," असं ते म्हणाले.

त्यापुढे ते म्हणाले, "ज्या लोकांनी त्यांची दाढी छाटली त्यांना आम्ही मुस्लीम बनवू आणि दाढी ठेवायला भाग पाडू." नवी दिल्लीत एका कार्यक्रमावेळी त्यांनी हे उद्गार काढले.

2. राज्य सरकारी कर्मचारी संपावर

वेळोवेळी आश्वासनं देऊनही सरकार सातवा वेतन आयोग लागू करत नसल्यानं राज्यातले 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवसांच्या संपावर जात आहेत. याबाबतचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सनं दिलं आहे.

सातव्या वेतन आयोगाव्यतिरिक्त शासकीय कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करणं तसंच सेवानिवृत्तीचं वय 60 करणं अशा काही संपकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

दुसऱ्या बाजूला सरकारने संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

या संपात राजपत्रित अधिकारी मात्र सहभागी होणार नाहीत.

3. मुख्यमंत्री-पंतप्रधानांमध्ये चर्चा, मराठा आरक्षणावर आज सुनावणी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे.

याविषयीची बातमी एपीबी माझाच्या वेबसाईटनं दिली आहे. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. याविषयी ट्वीट करून फडणवीस यांनी सांगितलं की, त्यांनी पंतप्रधानांना महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांबद्दल माहिती दिली.

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आज उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माच्या बेवसाईटनं दिलं आहे.

राज्य मागासवर्गीय आयोगानं तीन तारखेला मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांबाबत स्टेटस रिपोर्ट सादर केला आहे.

ही सुनावणी याआधी 14 ऑगस्टला होणार होती, पण राज्यातली परिस्थिती पाहाता याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही सुनावणी लवकर घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे ही सुनावणी 7 दिवस आधीच होत आहे.

4. छत्तीसगडच्या सुकमामध्ये 15 माओवादी ठार

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्हातल्या बंडागावाजवळ पोलिसांनी 15 माओवाद्यांचा खात्मा केल्याचं वृत्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images

लोकसत्ताच्या बातमीनुसार बंडा गावाजवळ माओवाद्यांचं शिबिर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचताच माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात या माओवाद्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनास्थळावरून 16 बंदूका, 4 आयडी बाँब आणि मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त केली आहेत.

5. इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय आर. के. धवन याचं निधन

इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस नेते आर. के. धवन यांचं सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये एका रुग्णालयात निधन झालं, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

आर. के. धवन हे राज्यसभेचे खासदार आणि इंदिरा गांधी यांचे खासगी सचिव होते. 1962 ते 1984 या काळात ते इंदिरा गांधी यांचे सचिव होते.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसंच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का?