दिलीप सरदेसाई यांच्याविषयीच्या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

क्रिकेट, दिलीप सरदेसाई Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दिलीप सरदेसाई

भारतीय क्रिकेटच्या मानबिंदूपैकी एक असलेल्या दिलीप सरदेसाई यांचा आज 78वा वाढदिवस. गुगलनं डुडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे. काय होतं सरदेसाई यांचं भारतीय क्रिकेटला योगदान?

1. प्रतिस्पर्ध्यांच्या कर्मभूमीत, कौशल्यांची परीक्षा पाहणाऱ्या पिचवर, भिन्न वातावरणात फलंदाजी कशी करावी याचा वस्तुपाठ दिलीप सरदेसाई यांनी सादर केला.

2. 1971 मध्ये वेस्ट इंडिजच्या तेजतर्रार माऱ्यासमोर दिलीप सरदेसाई यांनी द्विशतकी खेळी साकारली. विदेशी भूमीवर द्विशतक झळकावणारे सरदेसाई पहिले भारतीय फलंदाज होते. 18 ते 22 फेब्रुवारी 1971 या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टनमध्ये सरदेसाई यांनी साकारलेली 212 धावांची खेळी आजही भारतीय फलंदाजांतर्फे विदेशी भूमीवरील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अजित वाडेकर, सलीम दुर्रानी, दिलीप सरदेसाई आणि किरण मोरे (डावीकडून उजवीकडे)

3. याच दौऱ्यात त्यांनी पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत 112 तर ब्रिजटाऊन कसोटीत 150 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला त्यांच्याच भूमीवर नमवत भारतीय संघानं मालिका विजयाचा पराक्रम केला होता. या विजयात सरदेसाई यांची भूमिका निर्णायक होती.

4. सरदेसाई यांनी 30 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना 39.23च्या सरासरीनं 2001 धावा केल्या. यामध्ये 5 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. विदेशात फलंदाजीच्या वस्तुपाठासाठी विजय मर्चंट यांनी सरदेसाई यांना 'The renaissance man of India' अशी उपाधी दिली होती.

5. प्रथम श्रेणी अर्थात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करताना सरदेसाई यांची आकडेवारी दमदार अशी आहे. 179 सामन्यांमध्ये त्यांनी 41.75च्या सरासरीने 10230 धावा केल्या. यामध्ये 25 शतकं आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे.

6.मुंबईसाठी तब्बल 13 हंगामात सरदेसाई यांनी प्रतिनिधित्व केलं. याच कालावधीत मुंबईने दहा रणजी जेतेपदांवर कब्जा केला. रणजी विजेत्या संघाचा सरदेसाई अविभाज्य घटक होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दिलीप सरदेसाई यांच्या निधनानंतरच्या शोकसभेदरम्यानचे दृश्य.

7. वयाच्या 17व्या वर्षापर्यंत टर्फवर अर्थात आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात तशा पिचवर सरदेसाई खेळले नव्हते. मात्र अल्पावधीत त्यांनी या बदलाशी जुळवून घेत आपली छाप उमटवली. छोट्या आकारमानाच्या गोवा राज्यात जन्मलेले आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले क्रिकेटपटू होते.

8. 1962 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातली सरदेसाई यांची एक आठवण सांगितली जाते. वेस्ट इंडिजकडे त्यावेळी एकापेक्षा एक वेगवान मारा करणारे गोलंदाज होते. भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यात एक उसळता चेंडू बसला होता. त्यामुळे त्यांना डाव अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. त्यांच्यानंतर फलंदाजीला येण्यासाठी फलंदाज तयार नव्हते. त्यावेळी सरदेसाई यांनी पुढाकार घेतला आणि ते खेळायला उतरले.

9. दिलीप सरदेसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलीप सरदेसाई मेमोरियल लेक्चर मुंबईत आयोजित केलं जातं. दिलीप यांच्या पत्नी आणि समाजशास्त्रज्ञ नंदिनी आणि मुलगा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यातर्फे या व्याख्यानाचं आयोजन केलं जातं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)