#5मोठ्याबातम्या : मेजर कौस्तुभ राणेंवर अंत्यसंस्कार

कौस्तुभ राणे Image copyright Twitter

पाहूयात वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. मेजर कौस्तुभ राणेंवर अंत्यसंस्कार

काश्मीर खोऱ्यात जहालवाद्यांशी संघर्ष करताना चकमकीत मेजर कौस्तुभ राणेंसह चार जवानांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबतचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

आज सकाळी 10 वाजता मिरारोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्याआधी सकाळी 6 ते 8 पर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे.

2. भीक मागणं हा गुन्हा नाही

भीक मागणं हा गुन्हा नाही असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं बुधवारी दिला. ही बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

भीक मागण्याला गुन्हा ठरवणारा कायदाही कोर्टाने रद्द केला आहे. भिकाऱ्यांच्या मानवी हक्कांसाठी दाखल केलेल्या दोन जनहित याचिकांवर सुनावणी करताना कोर्टानं हा निर्णय दिला आहे.

Image copyright Getty Images

जबरदस्तीनं भीक मागायला लावणाऱ्यांची टोळी कार्यरत असेल तर त्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या पाहिजेत असंही कोर्टाने सुनावलं.

3. प्राप्तिकर प्रकरणी राहूल गांधींना दिलासा नाही

'नॅशनल हेराल्ड'शी संबंधित प्राप्तिकर पुनर्मूल्यांकन प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अंतरिम दिलासा देण्यास दिल्ली हायकोर्टान बुधवारी नकार दिला. याविषयीची बातमी महाराष्ट्र टाईम्सनं दिली आहे.

या खटल्यासंबंधी बातम्या देण्यास मीडियाला मनाई करावी अशा मागणीची राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे.

राहुल गांधी हे २०१० सालापासून 'यंग इंडियन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड'चे संचालक आहेत. ही कंपनी 'नॅशनल हेराल्ड' गैरव्यवहार प्रकरणात आरोपी आहे.

Image copyright Getty Images

पण, राहुल यांनी २०११-१२ च्या कर विवरणपत्रात कंपनीचे संचालक असल्याची माहिती दिली नाही. त्यामुळे प्राप्तिकर विभागानं 'नॅशनल हेराल्ड' आणि 'यंग इंडियन'मध्ये २०११-१२ या वर्षी झालेल्या देवाणघेवाणीची पुन्हा नव्यानं कर पुनर्मूल्यांकन करण्याबाबत राहुल गांधींना नोटीस पाठवली होती.

4. टीम इंडियासोबत फोटो काढल्याने अनुष्का शर्मा ट्रोल

टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्यादरम्यान आपल्या खेळाडूंनी लंडनमधल्या भारतीय दुतावासाला भेट दिली.

त्यावेळी भारतीय संघासोबत कॅप्टन विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे तिला लोकांनी ट्रोल केलं. याबाबतचं वृत्त सकाळनं दिलं आहे.

Image copyright BCCI/Twitter

अनुष्का शर्मा या फोटोत पहिल्या रांगेत उभी आहे तर व्हाईस-कॅप्टन अजिंक्य राहाणे शेवटच्या रांगेत. त्यामुळे BCCI आणि अनुष्का शर्माला ट्रोल करण्यात येत आहे.

5. राज्यसभेच्या उपसभापतींची निवड आज

राज्यसभेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज होणार आहे. भाजप आणि काँग्रेसनं आपआपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आजतकच्या वेबसाईटवर याचं वृत्त देण्यात आलं आहे.

भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून JD(U) चे राज्यसभा खासदार हरिवंश सिंह मैदानात आहेत तर काँग्रेसकडून त्यांचे खासदार बी.के. हरिप्रसाद मैदानात आहेत.

राज्यसभेची सदस्य संख्या सध्या 244 आहे. भाजपच्या गणितानुसार हरिवंश सिंहांना 126 मतं मिळण्याची शक्यता आहेत तर बीके हरिप्रसाद यांना 111 मतं मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का?