केरळ पूर : मृतांचा आकडा 67 वर, कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद

केरळमध्ये जोरदार पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे आतापर्यंत 67 लोकांचा बळी गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या 24 तासांतच 25 लोक पूर आणि भूस्खलनाचे बळी ठरले आहेत.

परिस्थिती इतकी गंभीर आहे सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच राज्यातलं मुख्य असं कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद करण्यात आलं आहेत.

केरळ पूर Image copyright PRAKASH ELAMAKKARA/Getty Images
प्रतिमा मथळा कोचीमध्ये पावसाचं पाणी पुलाला टेकलं आहे.

बचावकार्य मोहिमेचे नोडल अधिकारी P. H. कुरियन यांनी बीबीसीला सांगितलं की, "पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री बचावकार्य पार पाडण्यात थोडा त्रास झाला पण दिवसा आम्ही पुन्हा जोमाने कामास लागलो. भारतीय सेना खूप मदत करत आहे."

NDRFच्या आणखी पाच तुकड्या मदतीसाठी येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केरळ पूर Image copyright AFP/Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री पिनारई विजयन यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतल्याचं सांगितलं.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांशी बोलणं झाल्याचं ट्विटरवर सांगितलं. "आम्ही केंद्राकडून आणखी हेलिकॉप्टर आणि बचावपथकं मागवलीत आहेत. पंतप्रधानांनी सर्व मदतीचं आश्वासन दिलं आहे."

"केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांच्याशी सविस्तर चर्चा करून मी पूर स्थितीचा आढावा घेतला आहे. केंद्र सरकार केरळच्या लोकांच्या पाठीशी उभी आहे. कुठलीही मदत पुरवण्यास आम्ही तयार आहोत," असं मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.

केरळ पूर Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा भुथाथंकट्टू इथलं इदमलयार धरण पूर्ण भरल्यामुळे त्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पेरियार नदीची उपनदी इदमलयार नदीवर हे धरण बांधलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून केरळमध्ये सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे दैनंदिन जीवन विस्कळित झालं आहे. दिवसरात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे हाय अलर्ट घोषित केलेल्या भागात शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

शनिवारी मुन्नार या प्रसिद्ध पर्यटनस्थळी एका रिसॉर्टमध्ये 57 परदेशी पर्यटक अडकले होते. यापैकी बहुतांश लोक अमेरिका, सौदी अरेबिया आणि ओमानहून आलेले आहेत.

केरळ पूर Image copyright PRAKASH ELAMAKKARA/EPA
प्रतिमा मथळा एर्नाकुलममधलं घर पुराच्या पाण्याखाली बुडालं आहे.

"भूस्खलनामुळे रिसॉर्टकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. पण रिसॉर्टमधले सर्वजण सुरक्षित आहेत. प्रशासन आणि भारतीय सैन्य रस्ता लवकर पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करत आहेत," असं केरळ पर्यटन विभागाचे संचालक पी. बालाकिरण यांनी बीबीसीला सांगितलं.

केरळ पूर Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा कोझिकोडे जिल्ह्यातलं हे घर जोरदार पावसामुळे उध्वस्त झालं आहे.

जोरदार पावसामुळे अनेक जलाशयांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आतापर्यंत 27 धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. त्यापैकी इडुक्की चेरुथोनी या धरणाचे दरवाजे तब्बल 26 वर्षांनंतर पहिल्यांदाच उघडण्यात आले आहेत. पेरियार नदीवरचे हे धरण आशियातील मोठ्या धरणांपैकी एक आहे.

केरळ पूर Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा पुराचं पाणी एर्नाकुलममधल्या घरांमध्ये शिरलं आहे.

प्रशासनाने कोट्टायम, इडुक्की, मलप्पुरम, पलक्कड, कोळिकोडे, कोल्लम, एर्नाकुलमसह आणखी काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला आहे.

तर कोची विमानतळात संपूर्ण परिसरात पाणी भरल्याने विमानतळाला तलावाचं स्वरूप आलं आहे.

மாநிலமெங்கும் நிவாரண முகாம்கள் அமைப்பு

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार ज्यांच्या घरांचं आणि जमिनीचं नुकसान झालं आहे, त्यांना प्रत्येकी 10 लाखांची मदत तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

केरळ पूर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एर्नाकुलम येथे पुराच्या पाण्यातून वाट काढत जाताना रहिवासी.

.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)