#5मोठ्याबातम्या : कारण कुठलंही असो, मॉब लिंचिंग हा गुन्हाच - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आजच्या वर्तमानपत्रांतील आणि विविध वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. 'मॉब लिंचिंग' हा गुन्हाच - नरेंद्र मोदी

"मॉब लिंचिंग म्हणजेच समूहानं एखाद्याची हत्या करणं हा गुन्हाच आहे. यामागे या समूहाचा कोणताही उद्देश असला तरी हा गुन्हा आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले.

मोदी पुढे सांगतात, "याबाबत कारवाई करण्याचे आमच्या सरकारने सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. देशातील कोणत्याही नागरिकाला कायदा हातात घेऊन हिंसाचार करण्याचा कोणताही अधिकार नाही."

ANI वृत्तसंस्थेच्य हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, आसाममधल्या NRC प्रकरणाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारताच्या कोणत्याही नागरिकाला हा देश सोडून जावा लागणार नाही. ठरलेल्या प्रक्रियेनुसार सर्व काही पार पडत आहे. लोकांच्या याबाबतच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्व त्या संधी प्रत्येकाला दिल्या जातील."

2. 'भारतातल्या ज्येष्ठांचा टक्का वाढणार'

भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2050 सालापर्यंत 34 कोटी होणार आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येणार असून त्यांना योग्य त्या आरोग्य सुविधा वेळेत पुरवल्या जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिली.

बिझनेस स्टँडर्डमधल्या बातमीनुसार, यासाठी 'National Programme for HealthCare and Elderly' हा आरोग्य सुविधा पुरवणारा कार्यक्रम या सरकारने सुरू केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच आरोग्य सुविधा पुरवली जाईल.

3. 'मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव'

"मराठा समाजाने 9 ऑगस्टला पुकारलेल्या बंदमध्ये हिंसाचार झाला. हा मराठा समाज आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव आहे", असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याची बातमी ABPने दिली आहे.

फोटो स्रोत, MATTHEW LEWIS/GETTY IMAGES

नवी दिल्ली बोलताना ते पुढे म्हणाले, "मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. हिंसा, जाळपोळीचे प्रकार थांबवून आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावं."

4. तृणमूल काँग्रेसला भाजप मुळासकट उखडणार - अमित शाह

"येत्या निवडणुकीत भाजप ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला मुळासकट उखडून टाकेल," असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी कोलकात्यात सभेदरम्यान केलं.

फोटो स्रोत, Getty Images

"आसाममधल्या NRCची नोंदणी प्रक्रिया शांततेत पार पडेल. ही प्रक्रिया रोखण्यापासून ममता बॅनर्जी, राहुल गांधी हे कुणीच आम्हाला अडवू शकणार नाहीत. ममता बॅनर्जी यांना बांगलादेशी घुसखोर कशासाठी हवे आहेत? राहुल गांधीदेखील मतांच्या राजकारणासाठी त्यांना देशात ठेवू पाहत आहेत," असंही अमित शाह यावेळी बोलताना म्हणाले.

5. निवडणूक आयोग खरेदी करणार 17 लाख VVPAT यंत्रं

VVPAT यंत्रांमध्ये होणाऱ्या बिघाडांमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने 17.4 लाख यंत्रांची मागणी नोंदवली आहे. या यंत्रांमध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांवेळी बिघाड झाला होता. त्यामुळे त्याच्या सत्यतेवर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते.

इंडियन एक्स्प्रेसमधल्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने 20 जूनला 1.3 लाख यंत्रांची मागणी नोंदवली. तर यापूर्वीच आयोगाने 16.15 लाख VVPAT यंत्रांची मागणी नोंदवल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)