'ऑर्गन'ला नवसंजीवनी देतोय कोकणातला हा अवलिया - व्हीडिओ

दाते Image copyright Mushataq Khan

"1950 नंतर संपूर्ण जगभरात ऑर्गन निर्मिती थांबली होती. इतकं सुरेल वाद्य कुठेच मिळू नये ही गोष्ट मनाला पटत नव्हती. या वाद्याला संजीवनी मिळायला हवी, असं मला वाटू लागलं. मग आपणच या वाद्याच्या निर्मिती का करू नये, हा विचार मनात घोळू लागला," निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातल्या आडविरे गावातले उमाशंकर दाते तळमळीनं बोलत होते.

एकेकाळी संगीत नाटकांचा अविभाज्य घटक असलेलं ऑर्गन हे वाद्य काळाच्या ओघात मागे पडू लागलं होतं.

गुंतागुंतीची रचना असलेल्या या वाद्याला मागणी कमी होती असं नाही, पण जगभरातच त्याची निर्मिती थांबली होती.

अमेरिकेसारख्या देशात ऑर्गन भंगारात काढले जाऊ लागले होते. हार्मोनियम, पिआनो आणि इलेक्ट्रॉनिक वाद्याच्या जमान्यात हे वाद्य मागे पडलं होतं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : दुर्मिळ ऑर्गनला पुनरुज्जीवित करणारा अवलिया

नाटक आणि संगीताची आवड असणारे दाते वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजर राहत. २००१ साली संगीत नाटकात पहिल्यांदा त्यांनी ऑर्गन आणि त्यामधून उमटणारे सूर अनुभवले. त्यापूर्वीच हार्मोनियमशी त्यांची गट्टी जमली होती. ऑर्गनचे सूर इतके मधूर होते की, उमाशंकर दाते त्याच्या प्रेमात पडले.

हे वाद्य आपल्याकडे असावं त्यांना वाटू लागलं. त्यांना हार्मोनियम वाजवता येत होतं पण ऑर्गनच्या सूरांची उंची हार्मोनियमला गाठता येणार नाही असं वाटून त्यांनी ऑर्गनचा शोध सुरू केला. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. मग आपणच हे वाद्य का बनवू नये याचा विचार त्यांनी सुरू केला.

१९५० साली पूर्वी जर या वाद्याची निर्मिती होत होती तर आताच्या आधुनिक युगात तर हे आणखी सोपं होऊ शकतं, असं दातेंना सतत वाटत होतं.

अखेर मुंबईत राहणारे मुकुंद आठवले यांनी जुन्या ऑर्गनचा साऊंड बॉक्स त्यांना मिळवून दिला. त्याचवेळी अमेरिकेतल्या एका मित्राच्या मदतीनं ऑर्गनचे ५० रिड्सही मिळवण्यात ते यशस्वी झाले. लाकडी मिलींग मशीन दातेंनी स्वतः बनवली.

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर आणि जिज्ञासेच्या बळावर त्यांनी १० वर्ष केलेल्या संशोधनाला सत्यात उतरवलं. या काळात चुका आणि त्यामधून पुन्हा दुरुस्त्या करत त्यांचे जवळचे हार्मोनियम निर्माते वामन मेस्त्री यांच्या सहकार्यानं २०१३ साली भारतीय बनावटीचा पहिलं ऑर्गन निर्माण करण्यात यशस्वी झाले.

Image copyright Mushtaq khan

त्यांच्या या कामाची दखल 'सक्शन रीड ऑर्गन सोसायटीनं' देखील घेतली. या सोसायटीच्या तिमाही नियतकालिकात दातेंवर नऊ पानांचा लेख देखील छापून आला. अमेरिकेत राहणारे हार्मोनियम निर्माते डेव्हिड एस्टस यांनी त्यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं.

ते म्हणतात, "एखादी व्यक्ती पुन्हा या वाद्याची निर्मिती करत आहे हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांच्या या कार्याची दखल घेण्याचं कारण म्हणजे हे वाद्य बनवणारे ते जगातील एकमेव निर्माते असावेत."

बऱ्याच जणांना ऑर्गन आणि हार्मोनियम हे एकच वाद्य आहे असं वाटतं. पण दोन्ही वाद्यं निराळी आहेत.

हार्मोनियममध्ये हवेचा दाब (प्रेशर) या तत्त्वावर आवाजाची निर्मिती होते तर ऑर्गनमध्ये निर्वात (व्हॅक्यूम) या तत्त्वावर आवाजाची निर्मिती होते.

हार्मोनियमचा भाता मारल्यावर हवा आत घेतली जाते आणि बटण (की) दाबल्यावर हवा बाहेर जाताना आवाजाची निर्मिती होते.

ऑर्गनमध्ये पायाच्या साहय्याने भाता मारल्यावर व्हॅक्यूम तयार होतं आणि बटण (की) दाबल्यावर बाहेरची हवा आत जाते आणि आवाजाची निर्मिती होते.

भारतात ऑर्गन तयार होऊ लागला आहे हे कळल्यावर दातेंच्या ऑर्गनला नाट्यक्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतून मागणी येऊ लागली.

त्यांनी निर्माण केलेल्या ऑर्गनचा वापर 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटात झाला आहे. या चित्रपटात शंकर महादेवन यांनी भूमिका साकारली आहे आणि त्यांनी गाणी देखील म्हटली आहे. महादेवन यांनी दाते यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे.

Image copyright Mushtaq khan

"भारतात ऑर्गनची निर्मिती बंद झाली होती. उमाशंकर दाते यांनी मिशन हाती घेऊन कोकणात रीड ऑर्गनची निर्मिती केली. आम्ही उमाशंकर दाते यांचे खूप आभारी आहोत. संगीत क्षेत्रासाठी त्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे. माझे मित्र आदित्य ओक यांनी 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमात प्रत्येक गाण्यामध्ये या ऑर्गनचा वापर केला आहे," असं ते म्हणतात.

ऑर्गन कसं बनवलं जातं?

ऑर्गनची निर्मिती करायची म्हटल्यावर त्यांच्यासमोर पहिला प्रश्न होता की त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठून आणायचा. कारण ऑर्गन म्हटलं तर त्यासाठी रीड लागणार, लाकूड लागणार. बरं हे सर्व मिळवलं तरी त्यांची जुळवणी कशी करणार?

अमेरिकेत ऑर्गन भंगारात काढले जातात हे त्यांना कळलं. तिथं असणाऱ्या मित्रांच्या साहाय्यानं त्यांनी ते मिळवण्यास सुरुवात केली. त्या रीड्स ते अल्ट्रासॉनिक क्लिनिंगनं स्वच्छ करून घेतात. मग त्यांची जुळवणी वर्कशॉपमध्ये केली जाते.

Image copyright Mushtaq khan
प्रतिमा मथळा दाते यांच्या कारखान्यातील कारागीर सुभाष पांचाळ

"ऑर्गनसाठी उच्च दर्जाचं लाकूड वापरणं आवश्यक आहे अन्यथा त्याला तडे जाऊ शकतात. रीडबोर्डसाठी लागणारं लाकूड एका विशिष्ट रेझोनन्सचं असावं लागतं नाही तर आवाजाच्या टोनवर परिणाम होतो.

यासाठी जर्मन स्मूथ, पाईन वूड, ऍस्टर आदींचा वापर केला जातो. ऑर्गनसाठी वेगवेगळ्या प्रकारची आणि घनतेची लाडकं वापरावी लागतात. आवश्यकतेनुसार ही लाकडं आयात करावी लागतात," दाते सांगतात.

आडविरे इथल्या त्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करणारे कारागीरदेखील हे काम करण्यात आपल्याला आनंद मिळतो असं सांगतात.

"हे काम एखादा दागिना बनवण्यासारखं आहे. मी फर्निचरची देखील कामे करतो पण या कामातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो," असं सुभाष पांचाळ सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)