#5मोठ्याबातम्या : 'पानी फाउंडेशन'च्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा अजितदादांना टोला

वॉटरकपच्या व्यासपीठावर राज ठाकरे आणि अजित पवार

फोटो स्रोत, Paani Foundation screengrab

फोटो कॅप्शन,

वॉटरकपच्या व्यासपीठावर राज ठाकरे आणि अजित पवार

आजच्या वर्तमानपत्रांतील आणि विविध वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. राज ठाकरेंचा अजितदादांना टोला

"गेल्या 60 वर्षातील पाटबंधारे विभागात पैसा मुरला नसता तर राज्याची पाणीपातळी कमी झाली नसती. गेल्या ६० वर्षांतला सिंचनाचा पैसा कुठे गेला," असं पानी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या मंचावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपस्थित होते.

एबीपी माझाच्या वेबसाईटवरील वृत्तानुसार, ठाकरेंच्या भाषणानंतर आलेल्या अजित पवार यांनी नाव न घेता "बोलघेवडे" म्हणत राज ठाकरेंवरही टीका केली.

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेचा निकाल या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातल्या टाकेवाडी (आंधळी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ७५ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह मिळालं.

तर द्वितीय क्रमांक सातारा जिल्ह्यांतल्या माण तालुक्यातल्याच भांडवली गावाला आणि बुलडाणा जिल्ह्यांतल्या मोताळा तालुक्यातल्या सिंदखेड गावाला विभागून देण्यात आला. या दोन्ही गावांना प्रत्येकी २५ लाख आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलं.

तर तृतीय क्रमांक बीड जिल्ह्यांतल्या आष्टी तालुक्यातल्या आनंदवाडी गावाला आणि नागपूर जिल्ह्यांतल्या नरखेड तालुक्यातल्या उमठा गावाला विभागून देण्यात आला. या दोन्ही गावांना प्रत्येकी १० लाख आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलं.

यावेळी स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक असलेले अभिनेते आमिर खान म्हणाले, "गेल्या ३० वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने राजकीय मंडळींशी चांगले संबंध आहेत. मात्र कधीही राजकारणात जाणार नाही. त्यापासून लांबच राहणार."

2. पोलीस अकार्यक्षम म्हणून गोरक्षक रस्त्यांवर - बाबा रामदेव

"पोलीस आणि स्थानिक सरकार गायींची तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्यानेच गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गायींची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर व्हावं लागत आहे," असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी जयपूरमध्ये किलं.

फोटो स्रोत, AFP

हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ते पुढे म्हणाले, "गायींची तस्करी करणाऱ्यांबद्दल कुणीही बोलत नाही. गायींची हत्या करण्याला आपण का प्रोत्साहन देत आहोत? जे गायींची हत्या करतात आणि त्यांची अवैध वाहतूक करतात, आम्ही अशा लोकांच्या विरोधातच आहोत."

3. दुसऱ्या कसोटीत भारताची दाणादाण

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 159 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतल्याचं टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलंय.

या कसोटीत इंग्लंडने चौथ्या दिवशी 7 बाद 396 धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. भारतीय संघासमोर यावेळी 289 धावांचं आव्हान होतं. पण इंग्लंडच्या आक्रमणापुढे भारताचा दुसरा डाव 130 धावांत गडगडला.

३. विरोधकांच्या महाआघाडीला निवडणुकीत यश मिळणार नाही - नरेंद्र मोदी

2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची महाआघाडी तयार होत आहे. त्यांचं हे एकत्र येणं हा राजकीय संधीसाधूपणा असून या महाआघाडीला निवडणुकीत यश मिळणार नाही, असं हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका ई-मेल मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

"ज्यांचा यापूर्वी पराभव झाला आहे, ते भविष्यात जिंकू शकणार नाहीत. कारण लोकांना सक्षम सरकार हवं आहे. सगळ्यांसाठी आणि तो सुद्धा जलद गतीने केलेला विकास हाच आमचा येत्या निवडणूक प्रचाराचा अजेंडा राहील," असंही मोदी यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.

5. रेल्वे प्रवाशांसाठीचा मोफत विमा संपुष्टात

प्रवाशांना देण्यात येणारी मोफत विमा सुविधा रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असून रेल्वेचे तिकीट काढणाऱ्यांना प्रवासी विम्याचा प्रीमियम द्यावा लागणार आहे.

फोटो स्रोत, EPA

महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेल्या या वृत्तानुसार, मोफत विमा सुविधा देत असताना रेल्वेतर्फे प्रति व्यक्ती 92 पैसे प्रवास शुल्क आकारण्यात येत होतं. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेतर्फे मोफत प्रवासी विमा योजनेची सुरुवात झाली होती.

भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या IRCTCच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरपासून प्रवाशांकडून प्रीमियमसह तिकीट घेण्याव्यतिरिक्त विमा न घेण्याचाही पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे.

वेबसाइट किंवा मोबाइलवरून तिकीट काढताना प्रवाशांना दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापैकी एका पर्यायाची निवड प्रवाशांना करता येणार आहे. ज्या प्रवाशांना प्रवासी विमा हवा आहे, त्यांना प्रीमियमची रक्कम अदा करावी लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)