सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी Image copyright Getty Images / Hindustan Times
प्रतिमा मथळा लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं वयाच्या 89व्या वर्षी कोलकात्यात निधन झालं. पश्चिम बंगालसह देशाच्या राजकारणात सोमनाथ चॅटर्जी हे एक मोठं नाव होतं.

ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. जूनमध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता आणि गेल्या महिनाभर एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

25 जुलै 1929 रोजी चॅटर्जी यांचा जन्म झाला. त्यांनी ब्रिटनच्या मिडल टेंपल इथून बॅरिस्टरचं शिक्षण घेतलं होतं. त्यांचे वडील N. C. चॅटर्जी हिंदू महासभेशी संबंधित होते. तरीही ते कम्युनिझमकडे वळले होते.

वडिलांच्या मृत्यूनंतर रिकाम्या झालेल्या जागेवर त्यांनी 1971 मध्ये प्रथम लोकसभा निवडणूक लढवली. भारतीय राजकारणात सर्वाधिक काळ खासदार राहिलेल्या लोकांपैकी एक होते. ते 1971 ते 2009 या काळात पश्चिम बंगालमधल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमधून 10 वेळा निवडून गेले होते. यात बर्दवान, बोलपूर, जाधवपूर मतदारसंघ होते.

आपल्या संपूर्ण खासदारकीच्या काळात ते फक्त एकदा पराभूत झाले. 1984 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या ममता बॅनर्जी यांनी चॅटर्जी यांना पराभूत करत प्रथमच लोकसभेवर निवडून गेल्या.

अतिशय संयत राजकारणी म्हणून ओळखले जाणारे चॅटर्जी 1968 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात (CPM किंवा माकप) सामील झाले.

सोमनाथ चॅटर्जी यांच्याबद्दल सर्वपक्षियांमध्ये आदर होता. त्यांनी अनेक संसदीय समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम पाहिलं होतं. 1996 मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला होता.

लोकसभा अध्यक्ष म्हणूनही चॅटर्जी यांचं कौतुक व्हायचं. सक्रिय राजकारणातून बाहेर पडल्यावर चॅटर्जी राजकीय परिस्थितीवर बिनधास्त मत व्यक्त करायचे.

चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या वाढत्या लोकप्रियतेवरून CPM पक्षाला सावध राहण्यास सूचित केलं होतं. शेवटी 2011 मध्ये CPM पक्षाला ममता यांनी सत्तेवरून उखडून टाकलं.

चॅटर्जी यांनी प्रकाश करात यांच्या नेतृत्वाखालील CPM पक्षाचीही कठोर शब्दांत समीक्षा केली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संयक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर चॅटर्जी

मनमोहन सिंह यांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या सरकारच्या कार्यकाळात माकप मित्रपक्ष म्हणून सामील झाला आणि चॅटर्जी लोकसभेचे अध्यक्ष झाले.

पुढे भारताने अमेरिकेशी अणू करार केल्यानंतर पक्षाने त्यांना लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं, पण त्यांनी तसं करण्यास नाही म्हटलं. नंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

'संसदेतली लोकशाही मजबूत केली'

चॅटर्जींच्या निधनाची बातमी कळताच अनेक मोठ्या नेत्यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "सोमनाथ चॅटर्जी एक दिग्गज खासदार होते ज्यांचं संसदेत आपलं एक भक्कम स्थान होतं. त्यांच्या जाण्याने बंगालचं आणि भारताचं मोठं नुकसान झालं आहे."

"सोमनाथ चॅटर्जी यांनी भारताची संसदेतली लोकशाही मजबूत केली. ते गरिबांच्या आणि शोषितांच्या कल्याणासाठी आवाज उठवणारे एक सशक्त आवाज होते. त्यांच्या निधनाने मी दुःखी झालोय," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी एका ट्वीटद्वारे म्हणाले.

"सोमनाथ चॅटर्जी स्वतः एक मोठं संस्थान होतं. सर्व पक्षांतले खासदार त्यांचा आदर करायचे, त्यांची प्रशंसा करायचे," या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, "सोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दःख झालं. भारताच्या इतिहासातले ते सर्वांत महान खासदारांपैकी ते एक होते आणि नक्कीच सर्वांत मोठ्या लोकसभा अध्यक्षांपैकी एक."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे : ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जमावं की नाही यावरुन मनसेमध्येच गोंधळ?

हाँगकाँग निदर्शनं : ट्विटर आणि फेसबुकने काढून टाकले चिनी अकाऊंट्स

चांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चांगली चर्चा - ट्रंप

सामूहिक बलात्कार पीडितेला 30 वर्षांची शिक्षा आणि सुटका

पूरग्रस्त भागात हे 7 घरगुती उपाय ठेवतील रोगांपासून दूर

‘उमराव जान’ला संगीत देण्यापूर्वी खय्याम खूप घाबरले होते कारण...

हिमनदी समुद्रात कोसळताना तुम्ही कधी पाहिली आहे?

कोल्हापूरकरांना भीक नको, संभाजीराजेंची विनोद तावडेंवर टीका