सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं

घुमडे गावात आढळलेले माहापाषाणीय संस्कृतीतले शिळावर्तुळ Image copyright Amit Samant
प्रतिमा मथळा घुमडे गावात आढळलेले माहापाषाणीय संस्कृतीतले शिळावर्तुळ

कोकणवासियांनो आणि पर्यटकांनो, सिंधुदुर्गात मालवणला जाताना, घुमडे या गावाजवळ माळरानावर गोल आकारात रचलेले काही मोठ्या आकारातील दगड पाहिले आहेत का? जर पाहिले असतील, तर लक्षात घ्या ते साधेसुधे दगड नाहीत.

ती गोलाकार मांडलेली 'शिळावर्तुळं' आहेत. ही आहेत उत्तर अश्मयुगातील किंवा महापाषाणीय संस्कृतीतील नागरिकांनी मृत आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारकं.

अशा स्वरुपाची स्मारकं महाराष्ट्रात अडीच हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात अश्मयुगाच्या अखेरीस नेमकी कोणती संस्कृती नांदत होती? हा नवा प्रश्न पुरातत्वज्ञांसमोर उभा राहिला आहे.

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिळावर्तुळं आढळली आहेत. या वर्तुळांचं आणि स्मृतीस्मारकांच्या नेमका काळ ठरवण्याचं (डेटींग) काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत केवळ पुणे, विदर्भ, कर्नाटक इथेच ही स्मारकं आढळली होती.

पुरातत्वज्ञांच्यामते अश्मयुगात अशा प्रकारची शिळास्मारकं उभारण्याची पद्धत रूढ होती. परंतु कोकणात अशी शिळावर्तुळं कधीच आढळली नव्हती.

याही पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथे पुरातत्वअभ्यासक व पत्रकार विनायक परब यांना सापडलेल्या दोन महापाषाण युगीन शिळास्मारकाच्या निमित्ताने कोकणाचा इतिहास अश्मयुगीन कालखंडापर्यंत मागे गेला होता, त्यात आता घुमडे गावाच्या शिळावर्तुळांची भर पडली आहे.

सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीच यांच्यामुळे प्रसिध्द असलेल्या मालवण शहरापासून 6 किलोमीटरवर घुमडे हे गाव आहे. गावातल्या निसर्गरम्य पठारावर 7 शिळावर्तुळं (Megalithic Circles) शोधून काढण्यात हौशी पुरातत्वअभ्यासक अमित सामंत आणि पुरातत्व अभ्यासक विनायक परब यांना यश आले आहे.

यापूर्वी महाराष्ट्रात विदर्भात अशा प्रकारची शिळावर्तुळं सापडलेली आहेत. पण, दक्षिण कोकणात प्रथमच अशा प्रकारची महापाषाणीय शिळावर्तुळं सापडली आहेत.

Image copyright Amit Samant
प्रतिमा मथळा दक्षिण कोकणात प्रथमच अशा प्रकारची महापाषाणीय शिळावर्तुळं सापडली आहेत.

शिळावर्तुळं म्हणजेच विशिष्ट आकाराचे दगड ठराविक अंतरात गोलाकार रचण्यात आलेले असतात. ही एकप्रकारची स्मृतिस्मारकं असतात. आपल्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ अशी स्मारकं रचण्याची परंपरा महापाषाणीय मानवी संस्कृती असल्याचं पुरातत्वज्ञांचं मत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडीज' आणि 'इन्स्ट्युसेन' (INSTUCEN) यांच्यावतीने विद्यापीठातील मराठी भाषा भवन इथे 'एक्सप्लोरेशन इन महाराष्ट्र - 5' ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील 23 व्यावसायिक आणि अव्यावसायिक पुरातत्ववेत्यांनी विविध विषयांवर आपले शोधनिबंध सादर केले.

जून महिन्याच्या अखेरीस पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याच्या पुरातत्व विभाग आणि संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे उपस्थित होते. याच कार्यशाळेत घुमडे गावात आढळलेल्या महापाषाणीय शिलावर्तुळांविषयी शोधनिबंध सादर करण्यात आला.

शिळावर्तुळं म्हणजे काय?

सिंधुदुर्गातील घुमडे इथल्या शिळावर्तुळंचा शोध घेणारे विनायक परब यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली.

शिळावर्तुळं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर देताना परब सांगतात, "अश्मयुगीन काळात माणसांच्या मृत्यूनंतर त्यास दफन केलेल्या ठिकाणी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शिळास्मारकं उभारली जात असतं किंवा शिळावर्तुळं रचली जात असत. सिंधुदुर्गातील घुमडे गावात आम्हाला अशी 7 शिळावर्तुळं आढळली असून यातली 3 वर्तुळं चांगल्या अवस्थेत आहेत. तर, उरलेली 4 वर्तुळं अखंड नाहीत."

Image copyright Amit Samant
प्रतिमा मथळा अश्मयुगीन काळात माणसांच्या मृत्यूनंतर त्यासा दफन केलेल्या ठिकाणी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शिळास्मारकं उभारली जात असतं.

परब पुढे असंही सांगतात की, "मात्र ती शिळावर्तुळंच आहेत याची कल्पना येण्याइतपत ती व्यवस्थित आहेत. इथे स्मशान होते का याचा शोध घेण्यासाठी या शिळावर्तुळांमध्ये उत्खनन करावे लागते, अनेकदा अवशेष सापडतातही. मात्र तळ कोकणात प्रतिवर्षी होणाऱ्या तुफान पावसाने इथला मातीचा वरचा मोठा थर पूर्णपणे वाहून गेला असून सध्या पाहायला मिळते ते जांभा दगडाचे पठार किंवा सडा. तळ कोकणातल्या तुफान पावसामुळे या भागात पुरातत्वीय बाबी तुलनेने कमी सापडतात."

'सेक्रेड ऑलवेज अ सेक्रेड'

शिळावर्तुळांबद्दल अधिक माहिती देताना परब सांगतात, "मात्र पेंडूरच्या बाबतीत बोलायचे तर अजस्त्र असे हे शिळाखंड किंवा घुमड्याच्या बाबतीत शिळावर्तुळ पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याचा प्रश्नच येत नाही. या शिळावर्तुळांच्या शोधाला अधिक बळकटी मिळण्यास महत्त्वाच्या ठरल्या, त्या इथेच सापडलेल्या काही मध्ययुगीन समाधी."

"ही शिळावर्तुळे आणि समाधी एकाच ठिकाणी आहेत. पुरातत्वामध्ये 'वन्स सेक्रेड ऑलवेज अ सेक्रेड' असं म्हटलं जातं. याचा अर्थ एखाद्या जागेचा विशेष किंवा त्याचं महत्त्व हे दीर्घकाळ मानवी पिढ्यांमध्ये सांस्कृतिक स्मृतीच्या माध्यमातून जपलं जातं," असं त्यांनी स्पष्ट केलं.

Image copyright Vinayak Parab / Facebook
प्रतिमा मथळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथे पुरातत्व अभ्यासक विनायक परब यांना दोन महापाषाण युगीन शिळास्मारकं सापडली होती.

आधुनिक एपिजिनोमिक्स नावाची विज्ञानाची नवी शाखा असं सांगते की, ही सांस्कृतिक स्मृती आपल्या जनुकांमधून पुढील पिढीकडे संक्रमित होते. हीच जागा मध्ययुगामध्येही तत्कालीन पिढीने समाधीसाठी निवडण्यामागे हेच सांस्कृतिक स्मृतीचे गणित काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

परब पुढे सांगतात, "सिंधुदुर्गातील पेंडूर इथे सापडलेल्या महापाषाणयुगीन संस्कृतीचे निदर्शक असलेल्या शिळास्मारकानंतर, पाषाणयुगाचे पुरावे आजूबाजूला आणखी सापडायलाच हवेत, असं सातत्यानं वाटत होतं. तसं गृहितकही मांडलेलं होतं. आता अमित सामंत यांच्या गावी घुमडे येथे सापडलेल्या अश्मयुगीन शिळावर्तुळांमुळे त्या गृहितकाला बळकटीच आली आहे. त्यामुळे कोकणाच्या प्राचिनत्त्वावर अधिक प्रकाश पडेल."

शिळावर्तुळं किंवा महापाषाणीय दफनांचा (स्मशान) इतिहास

ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी त्यांच्या भारताची कुळकथा या पुस्तकांत शिळावर्तुळं आणि महापाषाणीय दफने यांच्याबद्दलचे स्पष्टीकरण दिलं आहे.

Image copyright Amit Samant
प्रतिमा मथळा घुमडे गावात महापाषाणीय संस्कृतीशी निगडीत असलेले हे अजून एक प्रकारचे स्मारक.

ढवळीकर लिहीतात, "महाराष्ट्रात महापाषाणीय दफने विदर्भात शेकडो आहेत. पुण्याजवळही काही आढळली आहेत. त्यांचा शोध डेक्कन कॉलजचे डॉ. ह. धी. सांकलिया यांनी लावला. विदर्भातील महापाषाणीय संस्कृतीचा सखोल अभ्यास डॉ. शां. भा. देव यांनी केला. तिथे खूप विस्तृत महापाषाणीय स्मशाने आहेत. ही सगळी शिळावर्तुळंच आहेत. त्यांचा व्यास 10-30 मीटर इतका आहे. शिळावर्तुळांची मधली जागा मृताचे अवशेष पुरण्यासाठी वापरली असते. ती प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत आढळतात."

ढवळीकर पुढे लिहीतात, "महापाषाणीय दफनांमध्ये सहसा आढळणारी पद्धत अशी की, मृत व्यक्तीस किंवा तिच्या अस्थी व इतर वस्तू पुरण्यासाठी पुरेसा होईल एवढा खड्डा खणला जात असे. खड्ड्यात मृत शरीर किंवा अस्थिकुंभ व त्यासोबत खापराची भांडी ठेवण्यात येत. या भांड्यांमध्ये मृतात्म्यांसाठी अन्नपाणी ठेवत असावेत. याखेरीज कुऱ्हाडी, तलवारी, खंजीर, घोड्याचे अलंकार यासारख्या लोखंडी वस्तूही ठेवल्या जात. अशा रीतीने पूर्ण सामग्री भरली की खड्डा मातीने बुजवला जाईल. त्यावर दगडधोंडे, माती यांचा एक ढिगारा रचला जात असे आणि त्याच्याभोवती थडग्याच्या जागी निदर्शक म्हणून 'शिळावर्तुळ' उभं केलं जात असे."

Image copyright Amit Samant
प्रतिमा मथळा घुमडे गावात आढळलेली महापाषाणीय शिळावर्तुळे, समाध्या आणि मध्ययुगीन समाध्या, व्यापारी मार्गांचा हा नकाशा

मग, सिंधुदुर्गातील घुमडे गावात आढळलेली शिळावर्तुळं ही देखील स्मशानेच आहेत काय? असा प्रश्न परब यांना विचारला असता ते सांगतात, "घुमडे गावात आढळलेली ही स्मारकं जांभा खडकाच्या पठारावर आहेत. इथे पाऊस जोरदार होतो. त्यामुळे इथल्या शिळावर्तुळांवर असलेली माती वाहून गेली असावी. सध्या दिसत असलेलं शिळावर्तुळांचं स्वरुप हे स्मारकांप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी या शिळावर्तुळांना स्मशानं संबोधता येणार नाही. पण म्हणून ती स्मशानं नाहीत असंही म्हणता येणार नाही."

स्मारकं की स्मशानं?

घुमडे गावातील या शिळावर्तुळांच्या कालखंडाबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसीने मुंबईस्थित ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. कुरुष दलाल यांच्याशी बातचीत केली.

दलाल सांगतात, "भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये इ.स.पूर्व 1000 ते इ.स. 300 या कालखंडात उभारण्यात आलेली अशी शिळावर्तुळे आढळली आहेत. महाराष्ट्रात पुण्यात आणि विदर्भात इ.स.पूर्व 600-700 या कालखंडात उभारण्यात आलेली शिळावर्तुळं दिसतात. हा सगळा कालखंड अश्मयुगानंतरचा कालावधी आहे. या काळात मृतांना पुरण्यासाठी स्मशानं उभारली जात. त्यात माणसांना पुरण्यात येत असे आणि त्याभोवती शिळावर्तुळं उभारण्यात येई. सध्या कोकणात आढळलेली शिळावर्तुळं ही स्मशानं असण्याची शक्यता नाकारता येत नाही."

घुमडे गावात इतिहासाच्या पाऊलखुणा

सिंधुदुर्गातील घुमडे गावात आढळलेल्या या शिळावर्तुळांचा माग काढणारे हौशी पुरातत्व अभ्यासक अमित सामंत यांनी त्यांच्या शोधाबद्दल बीबीसीला माहिती दिली.

Image copyright Amit Samant
प्रतिमा मथळा शिळावर्तुळांची नोंदणी करताना हौशी पुराअभ्यासक अमित सामंत

सामंत सांगतात, "2014मध्ये गिरिमित्र संमेलनात विनायक परब यांनी सिंधुदुर्गातील पेंडूरच्या महापाषाणयुगीन शिळास्मारकाबद्दल सादरीकरण केलं होते. त्यावरून प्रेरणा घेत मी माझ्या घुमडे या गावातल्या माळरानावर (सड्यावर) प्राचीन दगडांचा माग काढला. 2015पासून ही शोधमोहीम सुरू आहे."

"अशी 7 शिळावर्तुळं मला आढळली असून त्यांच्याबरोबरीनं दोन मध्ययुगीन समाध्या या गावात सापडल्या आहेत. यावरून कोकणाचा इतिहास अश्मयुगीन किंवा महापाषाणीय संस्कृतीपर्यंत मागे जात असल्याचं दिसून येतं," असंही सामंत यांनी सांगितलं.

Image copyright Amit Samant
प्रतिमा मथळा घुमडे गावात आढळलेल्या मध्ययुगीन व्यापारी मार्गातील एका विहिरीकडे जाणारा मार्ग.

सामंत पुढे सांगतात, "त्याचबरोबर या घुमडे गावातून जाणारा मध्ययुगीन बांधीव व्यापारी मार्गही सापडला आहे. त्या मार्गावरील माल उतरवण्यासाठी असलेला धक्का, टोल/संरक्षणासाठी असलेली गुहा, कातळात खोदलेली घोडेबाव (step well) इत्यादी व्यापारीमार्गाला बळकटी देणार्‍या गोष्टी सापडलेल्या आहेत. त्याकाळी समुद्रामार्गे येणारा माल कोळंब खाडी मार्गे घुमडे गावातील व्हाळात (ओहळात) बांधलेल्या धक्क्यापर्यंत येत असे. तेथून जनावरांच्या पाठीवर सामान लादून बांधीव घाटमार्गाने माल सड्यावर येत असे व तेथून पुढे जात असे. हा घाटमार्ग बांधण्यासाठी चिर्‍याचे दगड वापरलेले आहेत."

जनावरांना चढण्याचा त्रास होवू नये यासाठी घाटमार्ग बनवताना पायर्‍या बनवलेल्या नाहीत ही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, अशीही माहिती सामंत यांनी दिली.

सांस्कृतिक स्मृतींचा वारसा

घुमडे गावात अश्मयुगीन ते मध्ययुगीन स्मारके आणि व्यापारी मार्ग आढळल्याने दोन कालखंडातील पुरातत्त्वीय अवशेष एकाच ठिकाणी आढळण्यामागचे गूढ काय? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.

Image copyright Amit samant
प्रतिमा मथळा घुमडे गावातील एका शिळावर्तुळाला स्थानिक ग्रामस्थ गवळदेव म्हणून पुजतात.

या प्रश्नावर बोलताना परब सांगतात, "सांस्कृतिक स्मृतींचा वारसा मानवी संस्कृती वेळोवेळी जपत आल्याचं आजवरच्या इतिहासातून आढळून आलं आहे. अश्यमयुगीन स्मारके घुमडेमध्ये आढळली. त्याचबरोबर मध्ययुगातही नेमकी हीच जागा समाधींसाठी निवडण्यात आली आणि आज 21व्या शतकांत देखील यातील सर्वांत मोठे शिळावर्तुळ गवळदेव म्हणून पुजले जाते. यावरूनच ही सांस्कृतिक स्मृती आजतागायत सर्व पिढ्यांनी जपली आहे हे लक्षात येते."

अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गवळदेव पुजला जातो. तिथे छोटेखानी शिळावर्तुळ तयार करण्याची प्रथा आहे. मात्र, इथे असलेली शिळावर्तुळे आणि यातील दगडांचे मोठे आकार, समाधी असलेल्या ठिकाणांशी त्याचे असलेले नाते हे थेट अश्मयुगाशीच जोडलेले आहे हे पुरते स्पष्ट करणारे आहे. अशीही माहिती परब यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)