#5मोठ्याबातम्या : नंदुरबारमध्ये अतिवृष्टी; 5 ठार, घरांचे प्रचंड नुकसान

नंदुरबार

फोटो स्रोत, Pravin Thakare/BBC

फोटो कॅप्शन,

नंदुरबार जिल्ह्यातील पूरस्थिती बिकट झाली आहे.

आजची वृत्तपत्रं आणि विविध वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. नंदुरबार अतिवृष्टी : 5 ठार, घरांचे प्रचंड नुकसान

नंदुरबार जिल्ह्यात गुरुवारपासून अतिवृष्टी होत असून यात 5 जणांचा बळी गेला. तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. दैनिक पुढारीने ही बातमी दिली आहे. पावसामुळे रंगावली, सरपणी या नद्यांना पूर आलेला आहे. विसरवाडी येथील पूल कोसळल्यामुळे धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे. सर्वाधिक नुकसान नवापूर तालुक्यात झाले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

नंदुरबार तालुक्यातील आष्ट्ये येथे 70 मिमी, धडगाव तालुक्यातील मोलगी भागात 80 मिमी, तर अन्यत्र मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.

2. दाभोळकर, पानसरे कुटुंबीयांची सुरक्षा वाढवली

गौरी लंकेश यांच्या खून खटल्यातील एका संशयिताकडे मिळालेल्या एका डायरीतील उल्लेखामुळे प्रा. मेघा पानसरे, डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांना महाराष्ट्र राज्याने एक्स दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. ही बातमी द हिंदू या दैनिकाने दिली आहे. मेघा पानसरे या कॉ. गोविंद पानसरे यांच्या सून आहेत. तर डॉ. हमीद आणि मुक्ता या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची मुलं आहे.

फोटो स्रोत, Megha Pansare/Facebook

फोटो कॅप्शन,

हमीद दाभोळकर आणि प्रा. मेघा पानसरे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

बातमीत म्हटले आहे की या संशयिताकडे मिळालेल्या डायरीत या तिघांचा उल्लेख पुढील 'टार्गेट' असा करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

3. मुंबईत लेप्टोपॉयरोसिसीचे 9 बळी

मुंबईत यंदाच्या पावसात लेप्टोस्पायरोसिसमुळे 9 जणांचा बळी गेला असल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. मुंबईत या पावसात मलेरियामुळे वरळीत एका वरळीत एका सफाई कामगाराचा, तर डेंग्यूमुळे कुर्ल्यात एकाचा आणि लेप्टोमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. कॉलराचेही ३ रुग्ण आढळून आले आहेत, असं या बातमीत म्हटले आहे.

4. युपीएच्या काळात 10.08% विकासदर

2006-2007 या वर्षात देशाचा विकासदर 10.08% होता. हा विकासदर उदारीकरणानंतरचा सर्वांत जास्त होता. अशी बातमी डीएनए या वृत्तपत्राने दिली आहे. नॅशनल स्टॅटिस्टिक कमिशनने स्थापन केलेल्या रीअल सेक्टर स्टॅटिस्टिकने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. रीअल सेक्टर स्टॅटिस्टिकने 2011-12 या वर्षांतील किमती आधारभूत मानून नवी मालिका जाहीर केली आहे.

त्यानुसार 2006 ते 2007 या वर्षांतील विकासदर 10.08% होतो. हाच विकासदर 2004-05च्या मालिकेनुसार 9.57टक्के होतो. देशाने आतापर्यंत सर्वाधिक विकासदर राजीव गांधी पंतप्रधान पदावर असताना 1988-89 या वर्षी 10.2टक्के इतका नोंदवला होता.

5. एमआयएमच्या नगरसेवकाला विरोध

औरंगाबाद महापालिकेत माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत निषेध नोंदवणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण केली. मतीन यांच्या विरोधात सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

या प्रकरणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मतीन यांच्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली असून ही पक्षाची भूमिका नसल्याचे म्हटले आहे. मतीन यांच्या समर्थकांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या कारची मोडतोड केली आहे. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)