गुरुदास कामत : नाराजीमुळे मंत्रिपदाची शपथ न घेणारा काँग्रेस नेता

गुरुदास कामत Image copyright Getty Images

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं नवी दिल्लीत निधन झालं आहे. दिल्लीत कामानिमित्त आले असताना त्यांना हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

63 वर्षांचे कामत आयुष्यभर मुंबई काँग्रेसमध्ये सक्रिय होते. गेल्याच वर्षी त्यांनी काँग्रेसमधल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. मुंबई काँग्रेसची जबाबदारी संजय निरुपम यांच्याकडे दिल्यामुळे ते नाराज होते. गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी जाहीरपणे नाराजी बोलूनही दाखवली होती.

सत्तरच्या दशकात त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. 1976 साली ते NSUIचे अध्यक्ष होते. 1984ला ते पहिल्यांदा मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले. 2003 ते 2008 ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2009 ते 2011 या काळात ते UPA सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांनी वेळोवेळी पक्षाची इतर राज्यातील जबाबदारीही स्वीकारली होती.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा सोनिया गांधींनी घेतलं अंत्यदर्शन

मनमोहन सिंग यांच्या UPA-2च्या मंत्रिमंडळात गुरुदास कामत यांच्याकडे गृह आणि टेलिकॉम या दोन खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. जुलै 2011मध्ये मंत्रिमंडळात खातेबदल करण्यात आला. त्यात कामत यांना पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय हे कॅबिनेट दर्जाचं मंत्री करण्यात आलं. पण कामत त्या शपथविधीसाठीच आलेच नाहीत.

याविषयी सांगताना महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीतले विशेष प्रतिनिधी सुनील चावके सांगतात, "ते खातं त्यांना आवडलं नाही. आपल्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीला हे असं कमी दर्जाचं खातं द्यावं याचं त्यांना वाईट वाटलं. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला. एका अर्थी त्यांना राज्यमंत्री पदावरून बढतीच होती, पण ती त्यांना रुचली नाही. काँग्रसेच्या अलिकडच्या इतिहासात असं काही घडल्याचं हे एकमेव उदाहरण असावं."

2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ते कमालीचे नाराज होते. नव्याने अध्यक्ष झालेले संजय निरुपम माझ्या समर्थकांची तिकिटं कापत आहेत, असा त्यांचा आरोप होता. पक्षातील जुने नेते पक्ष सोडून जात आहेत, हे वाईट आहे आणि अहमद पटेल यांनी याकडे लक्ष द्यावं, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. ते प्रचार करायलाही बाहेर पडले नव्हते. अखेरच्या आठवड्यात त्यांनी काही ठिकाणी प्रचार केला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुरली देवरा आणि गुरुदास कामत

मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि मुरली देवरा असे दोन मोठे गट होते. देवरांचा दबदबा मुंबई शहरात होता तर उपनगरात कामतांचा जोर होता. कामत यांनी स्वतः ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून चार वेळा विजय मिळवला तरी काँग्रेस पक्ष मुंबईत वाढवण्यात त्यांना मर्यादितच यश मिळालं. गटातटात विभागलेली मुंबई काँग्रेस दिवसेंदिवस कमजोर होत गेली.

'नाराज असले तरी काँग्रेसीच'

"शिवसेनेचा झंझावात असतानाही काँग्रेस पक्ष जनतेपर्यंत नेण्यात गुरुदास कामतांचं योगदान मोलाचं होतं. त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी मोठी होती," असं ज्येष्ठ राजकीय पत्रकार मृणालिनी नानीवडेकर यांनी सांगितलं.

"राजीव गांधीचे ते निकटवर्तीय होते. गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध होते. पक्षाचा एखादा निर्णय पटला नाही तर शांत राहून काम करायचं ही राजकारणातली ठरलेली चौकट आहे. मात्र कामत यांनी ती झुगारून दिली. ते पक्षाविरोधात, सहकाऱ्यांविरोधात बोलायचे मात्र पक्ष सोडण्याचा, दुसऱ्या पक्षात जाण्याचा किंवा स्वत:चा पक्ष काढण्याचा विचार त्यांच्या डोक्यात कधीच डोकावला नाही. कारण ते शंभर टक्के काँग्रेसी होते. त्यांच्या डोक्यात सदैव पक्षाचा विचार असायचा. यामुळे अन्य पक्ष कामत यांच्या काँग्रेसप्रती नाराजीनंतरही त्यांच्याशी संपर्क करत नसत. कारण कामत यांची काँग्रेसनिष्ठा त्यांना ठाऊक होती," असं त्यांनी सांगितलं.

त्या पुढे सांगतात, "अत्यंत मनस्वी असा नेता होता. त्यांना काँग्रेसमधूनच विरोध व्हायचा. त्यांना छोटं दाखवण्याचा प्रयत्न होत असे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी निवडणुकीच्या वेळी कामत यांना बरोबर घेऊन जाण्याचं धोरण अंगीकारलं होतं. स्वाभिमान असल्यामुळे ते नाराजी व्यक्त करायचे पण ही नाराजी मर्यादित राहायची. केंद्रीय राज्यमंत्रीपद सोडल्यानंतर ते फारसे सक्रिय नव्हते."

देवरा-कामत संघर्ष

मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांच्या गटांमधील संघर्ष कायम चर्चेचा विषय राहिला.

मिड-डे चे राजकीय संपादक धर्मेंद जोरे यांनी या संघर्षाविषयी बोलताना सांगितलं की, "काँग्रेस पक्षात सर्वत्र दिसणारी गटबाजी मुंबईतही प्रकर्षानं जाणवत होती. गुरुदास कामत आणि मुरली देवरा या दोन नेत्यांचं जे 'सख्य' होतं त्यामुळे काँग्रेस पक्षाचं बरेचदा नुकसान झालं. या गटबाजीमुळे काँग्रेसला मुंबई महापालिका अनेक वर्षांपासून जिंकता आली नाही ही वस्तुस्थिती आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा संजय निरुपम यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद गेल्यानंतर कामत नाराज होते.

"अर्थात जेव्हा त्यांना असं वाटायचं की आपल्या वादामुळे पक्षाचं खूप मोठं नुकसान होईल तेव्हा मात्र ते एकत्रपणे काम करायचे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये या दोघांनी काहीवेळा गटबाजी बाजूला ठेऊन काम केल्यानं काँग्रेसला यशही मिळालं आहे. या दोन्ही नेत्यांची गांधी घराण्याशी जवळीक होती. हायकमांडकडून मुरली देवरा यांना बऱ्यापैकी झुकतं माप दिले गेलं, हेही वास्तवच आहे."

"गुरुदास कामत हे राजीव गांधींचे निकटवर्तीय होते. मात्र त्यांच्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समजून घेण्यात ते कमी पडले. पक्के काँग्रेसी असल्याने त्यांनी कधीही दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केला नाही. दुसऱ्या पक्षात जाऊन छाप उमटवण्याएवढं किंवा स्वत:चा पक्ष वगैरे काढून वर्चस्व गाजवण्याएवढी शक्ती नसल्याचं त्यांना ठाऊक होतं. पक्षानं घेतलेल्या निर्णयाबद्दल नाराजी असेल तर त्यांनी राजीनाम्याच्या माध्यमातून ब्लॅकमेलचं धोरण स्वीकारलं," असं ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, "शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. 1999 साली पवारांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. कामत पवारांसोबत जातील अशी चर्चा होती मात्र गांधी घराण्याप्रती निष्ठा असल्याचं सांगत कामत यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. मुरली देवरा आणि गुरुदास कामत अशी दोन सत्ताकेंद्रं मुंबई काँग्रेसमध्ये होती. मात्र ते दोघे एकमेकांच्या बालेकिल्ल्यात शिरत नसत. मात्र संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंह यांच्या हातात सूत्रं गेल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)