#5मोठ्याबातम्या : मेळघाटात 30 दिवसांत 37 बालकांचा मृत्यू

कुपोषण

फोटो स्रोत, AFP

आजची वृत्तपत्रं आणि विविध वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. मेळघाटात 30 दिवसांत 37 बालकांचा मृत्यू

राज्यात 21,000 बालके तीव्र कुपोषित असून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात जुलै महिन्यात शून्य ते सहा वर्षं वयोगटातील 37 बालकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. लोकमतनंही बातमी दिली आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने आदिवासी भागातील बालमृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी शनिवारी गाभा समितीची मुंबईत बैठक घेण्यात आली होती.

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत एप्रिल ते जून या तीन महिन्यात 114 बालकांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षीपेक्षा ही आकडेवारी जास्त आहे, या बाबी बैठकीत समोर आल्या आहेत.

30 गावांमध्ये आयटी कनेक्टिव्हिटी बाकी आहे. अंगणवाडी केंद्रातून सतत खिचडी न देता, कुठला आहार आदिवासी बालकांना देण्यात यावा याबाबत विचार करावा, अशी मतं तज्ज्ञांनी मांडली. नंदुरबार, मेळघाट आणि पालघर आदिवासी जिल्ह्यांमध्ये विविध योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

2. '...जमावाकडून होणाऱ्या मारहाणीला जबाबदार'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, जमावाकडून होणाऱ्या मारहाणीला नोटांबदी, बेरोजगारी आणि जीएसटी जबाबदार आहे, असं म्हटलं आहे. जर्मनीतल्या हॅमबर्ग येथे बोलताना त्यांनी हे मांडलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Reuters

मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट करत छोट्या आणि मध्यम उद्योगांना उद्धवस्त केलं आहे आणि त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत.

त्यात मोदींनी अत्यंत वाईट पद्धतीनं जीएसटीची अंमलबजावणी केली आणि त्यामुळे गुंतागुंत अधिकच वाढली, असं गांधी यावेळी म्हणाले.

तसंच भाजप सरकार दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना विकासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवत आहे, असा आरोपही गांधींनी यावेळी केला.

3. भारतीय साईट्सवरील 35% हल्ले चीनमधून

भारताच्या अधिकृत साईट्सवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांत सर्वाधिक म्हणजे 35% हल्ले चीनमधून होत आहे, असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला दिलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

चीनपाठोपाठात US (17 %), रशिया (15 %), पाकिस्तान (9 %), कॅनडा (7 %) आणि जर्मनी (5 %) यांचा क्रमांक लागतो.

भारतीय सायबर विश्वात चीन वारंवार नाक खुपसत आहे, असं या अहवालातून समोर आलं आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकातल्या अनेक संस्थांवर असे हल्ले झाले आहेत आणि या संस्थांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

4. धर्मस्थळांचं ऑडिट करा - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयानं स्वच्छता, प्रवेश, मालमत्ता या संदर्भात देशातली धार्मिक स्थळं आणि धर्मादाय संस्थांचं ऑडिट सुरू केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, AFP

यासंबंधींच्या तक्रारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाव्यात आणि त्या उच्च न्यायालयाकडे पाठवाव्यात.

उच्च न्यायालय त्यांना जनहित याचिका म्हणून दाखल करून घेऊ शकतं, असं मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय देशभरातल्या सर्व मंदिरं, मशिदी, चर्च आणि इतर धर्मादाय संस्थांना लागू होणार आहे.

5. त्या नगरसेवकाची तुरुंगात रवानगी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास औरंगाबाद येथील AIMIMचे नगरसेवक सय्यद मतीन राशिद यांनी नकार दर्शवला होता. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली होती.

फोटो स्रोत, EPA

आता औरंगाबाद पोलिसांनी Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug-Offenders and Dangerous Persons Act, 1981 या कलमांतर्गत एका वर्षासाठी त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

राशिद दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करत आहेत, अशी भाजपच्या नगरसेवकांनी तक्रार नोंदवली होती. मंगळवारी त्यांनी जामीन मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी वरील कायद्याअंतर्गत त्यांना हर्सूल तुरुंगात एका वर्षासाठी न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)