किकीनंतर आता मोमो चॅलेंज : ही काय नवीन भानगड?

मोमो चॅलेंज

फोटो स्रोत, UIDI / TWITTER

मोठे बटबटीत आणि पिवळ्या रंगाचे डोळे असलेली, एकदम भयानक पद्धतीने हसणारी, वाकडं तिकडं नाक असलेली एक व्यक्ती त्या फोटोमध्ये आहे.

अचानक तुमच्याही व्हॉट्सअॅपवर एखाद्या अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर जर हा फोटो दिसला तर थोडं सांभाळून राहा. या नंबरला उत्तर देऊ नका.

हा फोटो एका गेम चॅलेंजचा भाग आहे, त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

या गेमचं नाव आहे मोमो चॅलेंज. हा असा गेम आहे, जो तुमच्या मेंदूशी खेळतो, भीतीचं वातावरण तयार करतो आणि नंतर तुमचा जीव घेतो.

भारतात गेले काही दिवस हा गेम चर्चेत आहे. आणि आता राजस्थानच्या अजमेरमधल्या एका आत्महत्येशी या गेमचा संबंध असल्याचं सांगण्यात येतंय.

दहावीमध्ये शिकणाऱ्या या मुलीने 31 जुलैला आत्महत्या केली होती. तिच्या घरच्यांचा असा दावा आहे की तिचा फोन पाहिल्यानंतर त्यांना समजलं की तिचा मृत्यू मोमो चॅलेंजमुळे झाला आहे. पण ही गोष्ट अजून सिद्ध झालेली नाही.

तर अजमेर पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून म्हटलं आहे की ही मुलगी मोमो चॅलेंज खेळत होती, असं माध्यमांतून कळतं. आम्ही या अनुषंगाने तपास करत आहोत.

अजमेर पोलिसांनी म्हटलं आहे की मोमो चॅलेंज नावाने आणखी एक गेम मुलांच्या मनाशी खेळत आहे. या गेममध्ये अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधला जातो आणि तुमची खासगी माहिती विचारली जाते.

अशा गेममध्ये सहभागी होऊ नका, असं आवाहन अजमेर पोलीस करत आहेत. या पूर्वी मुंबई पोलिसांनीही #NoNoMoMo #MomoChallenge वापरून असंच ट्वीट केलं होतं.

फोटो स्रोत, TWITTER/@MUMBAIPOLICE

लोकांत भीती पसरवणारं हे चॅलेंज आहे तरी काय?

मोमो चॅलेंज देणारी व्यक्ती अनोळखी नंबरवरून तुमच्याशी व्हॉटसअपवर संपर्क साधते. सुरुवातील हाय-हॅलो झाल्यानंतर पुढे संवाद वाढवला जातो. नाव विचारल्यानंतर तो त्याचं नाव मोमो असं सांगतो. तो नावासोबत एक फोटोही पाठवतो. एका भयानक मुलीचा हा फोटो असतो.

नंतर तुम्हाला नंबर सेव्ह करण्यासाठी सांगितलं जातं. तुम्ही जर नकार दिला तर तुमची खासगी माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली जाते. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे चॅलेंज दिले जातात आणि तुम्हाला आत्महत्या करण्यासाठीही उत्तेजित केलं जातं.

मोमो चॅलेंज धोकादायक का आहे?

मेक्सिकोच्या गुन्हे अन्वेषण विभागाने म्हटलं आहे की अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या मोमोशी बातचीत केली तर पाच प्रकारचे धोके असतात, एक तर म्हणजे तुमची खासगी माहिती सार्वजनिक होते, तुमची बदनामी केली जाते, आत्महत्या किंवा इतर काही हिंसा करण्यासाठी उचकलं जातं, मानसिक ताणतणाव निर्माण होतं, यांचा यात समावेश आहे.

मोमो चॅलेंजची सुरुवात

मेक्सिकोतील काँप्युटर क्राइम इन्व्हेस्टिगेशन विभागाच्या मते हा गेम फेसबुकवरून सुरू झाला. या गेममध्ये अनोळखी नंबरला रिप्लाय देण्यासाठी सांगितलं जातं. रिप्लाय दिल्यानंतर मोमोकडून भीतीदायक आणि हिंसक मेसेजस पाठवले जातात आणि तुमची गोपनीय माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली जाते.

फोटो स्रोत, इमेज कॉपीरइटINSTAGRAM/MOMOSOY

हा गेम अर्जेंटिना, फ्रान्स, जर्मनीमध्ये पसरला आहे. हा गेम आता भारतातही आला आहे.

बीबीसी मुंडोच्या एका वृत्तानुसार या चॅलेंजमध्ये जो फोटो वापरला आहे तो जपानमधील आहे. हा फोटो बर्ड वुमेनची कलाकृती आहे. भुताखेतांशी संबंधित एका प्रदर्शनात 2016मध्ये हो फोटो पहिल्यांदा लावण्यात आला होता. सर्वांत आधी जपानमध्ये इन्स्टाग्रावर हा फोटो आला होता.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ - तुम्ही सतत मोबाईलवर गेम खेळता का? हा एक मानसिक असू शकतो

यापूर्वीही भारतामध्ये ब्लू व्हेल चॅलेंज नावाचा गेम आला होता. या गेममध्ये 50 दिवसांत 50 वेगवेगळे टास्क पूर्ण करायचे होते, त्यानंतर हातावर एकएक व्हेलच्या आकाराचं चिन्ह बनवायचं असतं. आणि शेवटचा टास्क आत्महत्या करणं असतं.

त्यावेळी जगभरातील अनेक मुलं या 'ब्लू व्हेल'चे बळी ठरले होते. भारतातही अशा काही घटना घडल्या होत्या, पण त्या प्रकरणांचा ठामपणे निष्कर्ष काढता आलेला नाही.

त्यानंतर महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी सर्व प्राचार्यांना पत्र पाठवून मुलांना या गेमपासून दूर राहण्यासाठी सांगावं, असं आवाहन केलं होतं.

हेही वाचलंत का?