सोशल : 'भाजप ज्येष्ठ नेत्यांचं काय करतं, यावर शिवसेनेनं न बोललेलंच बरं'

भाजप, अडवाणी, मोदी, वाजपेयी

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/Getty Images

फोटो कॅप्शन,

विचारमग्न लालकृष्ण अडवाणी.

"भाजपात ज्येष्ठ नेत्यांना महत्त्व राहिलेलं नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्त्व मिळत आहे," असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला होता. अडवाणी आणि इतर ज्येष्ठांना मोदींनी बाजूला सारल्याबद्दल 'सामना'मधून टोलेबाजी करण्यात आली आहे.

ज्येष्ठांना बाजूला सारणं योग्य आहे का? की वय झाल्यानंतर त्यांनी स्वतःहूनच निवृत्ती घ्यायला हवी, असा प्रश्न बीबीसी मराठीनं 'होऊ द्या चर्चा'मध्ये वाचकांना विचारला होता. त्यातील काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया इथं देत आहोत.

सानद पवार यांच्यामते "तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना, अशी शिवसेनेची अवस्था आहे. अडवाणींची काळजी वाहण्याआधी सेनेनं मनोहर जोशींसोबत काय केलं ते जगजाहीर आहे. विरोधासाठी विरोध हेच सेनेचं धोरण आता कंटाळवाणं वाटू लागलं आहे. बाळासाहेबांच्या करिश्म्यातून बाहेर येण्याची यांची अजूनही तयारी नाही. राहिला प्रश्न अडवाणींचा तर त्यांच्यावर हा काळाने उगवलेला सूड आहे. त्याची पूर्ण जबाबदारी अडवाणींची राहील. हिंदुत्वाचं राजकारण निर्दयी आहे, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल."

सुष्मा कुलकर्णी यांनी, "मग नव्यांना कधी संधी मिळणार?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. "निसर्गाचा नियमच आहे पिकली पानं गळल्यावर नवी येतात. नवीन technology आपण वापरतो तेव्हा जुनं आउटडेट होतंच. गैर काय?" असं मत त्या व्यक्त करतात.

डेक्स्टर मुरुगन म्हणतात, "2014 ते 2018 एकदाही मोदींनी अटल बिहारी वाजपेयींचं नाव घेतलं नाही किंवा त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात झालेली विकास कामं आणि यशस्वी उपक्रमांची नावं घेतली नाहीत. अडवाणीसारखा आक्रमक भाषणं आणि निर्णय घेणारा नेता आज संसद आणि मीडिया समोर गप्प बसलेला पाहून हे समजतं की भाजपमध्ये मोदींची एकाधिकारशाही आहे. संघटनेची परंपरा असलेली भाजप जाऊन आता व्यक्तिकेंद्रित भाजप निर्माण होत आहे."

प्रसाद चव्हाण म्हणतात, "एक तर शिवसेनेने दुसऱ्याच्या ऐवजी स्वतःकडे बघावं. बीजेपी मध्ये काय होत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे शिवसेनेमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कधी झाली, कुणाला आठवतंय का?"

प्रकाश खुळे यांच्यामते, "राजकारणात संत नसतात. सत्तेच्या साठमारीत युध्द आणि प्रेमासारखे सगळ क्षम्य असते. असे अनेक नेते कांग्रेस. भाजप आणि जगात असंख्य आहेत."

नितीन कुरणे यांच्यामते, "भाजपात कुणालाही बाजूला सारलेलं नाही. नाहीतर आजपर्यंत भाजपमधून फुटून दोन तीन पक्ष निघाले असते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नेत्यांना बाजूला बसवलं तरी घराणेशाही चालत नाही. योग्य आणि लायक माणसाला संधी दिली जाते."

"नव्या नेत्यांनी ज्येष्ठांना विश्वासात घेतलं पाहिजे, यावर मुलायम सिंग यांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. कारण नवखे नेते आयत्या पीठावर रेघोट्या मारतात. तेव्हा ज्येष्ठांची मानसिकता समजून घ्यायला हवी," असं मत धनंजय खाडे यांनी व्यक्त केलं.

पवन थोरमोटे पाटील म्हणतात, "हे राजकारण आहे. 2004च्या पराभवानंतर अटल बिहारी वाजपेयींना देखील असंच बाजूला सारण्यात आलं होतं. शिवसेनेने देखील गजानन बाबर, मनोहर जोशी सारख्या नेत्यांना बाजूला सारलं."

डॉ. अमोल मोलावडे उलट शिवसेनेला विचारतात, "मनोहर जोशी बद्दल आपले काय मत आहे?"

"पंचाहत्तरी उलटली की स्वतःहून सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन कनिष्ठांना संधी द्यावी आणि पक्षाचे मार्गदर्शक, सल्लागार व्हावं," असं मंगेश के म्हणतात.

शिवसेनेने या विषयावर काही बोलले नाही तर बरे राहील, असं मत सौरभ शिंदे यांनी व्यक्त केलं.

अटलजी आजारी असताना भाजपनेच त्यांना भारतरत्न दिला, तरी आठवण ठेवली नाही, असा प्रश्न धनंजय देशपांडे उपस्थित करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)