सोशल : 'सनातनी आणि नक्षली दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत'

अरुंधती रॉय Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अरुंधती रॉय

मंगळवारी देशभरातून 5 मानवी हक्क कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर काही वाचकांना हे जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी सुरू असलेलं छापासत्र वाटतं. तर काहींना डावे आणि उजवे एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात.

"देशात मॉब लिंचिंग करणाऱ्यांचा सत्कार होतो आणि हक्कांसाठी लढणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जातं," अशी प्रतिक्रिया लेखिका अरुंधती रॉय यांनी मंगळवारच्या अटकसत्रावर व्यक्त केली होती. बीबीसी मराठीनं यावर होऊ द्या चर्चामध्ये वाचकांना त्याचं मत विचारलं.

यातील काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया इथं देत आहोत.

प्रविण लोणारे म्हणतात, "मागे एकदा शेतकऱ्यांच्या मोर्चाला एक मंत्री नक्षली लोकांचा मोर्चा म्हणत होते. त्यांच्यामते मुस्लीम आतंकवादी आहेत. आदिवासी नक्षली आहेत. शेतकरी आणि दलित माओवादी आहेत. फक्त सनातनी देशभक्त आहेत."

धवल पाटील म्हणतात, "पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल ही अटक असल्यानं यावर आता चर्चा करणं घाईचं ठरेल. जेव्हा आरोप ठेवले जातात तेव्हा संबधितांची पार्श्वभूमी कमी महत्वाची ठरते."

सनद पवार म्हणतात, "भाजप हा हिंदुत्ववादाचा राजकीय मुखवटा असल्यामुळे त्यांना कारवाईचे ढोंग करणं भाग पडले. महाराष्ट्र सरकारनं डाव्या विचारवंतांना नक्षली घोषित करून अटक करण्याचा सपाटा लावला आहे. याला अघोषित आणीबाणी म्हणण्यापेक्षा "दृश्य स्वरूपातील अघोषित हुकुमशाही (फँसिझम)" म्हणता येईल. प्रत्येक हिंदू ज्याप्रमाणे हिंदुत्ववादी असत नाही, प्रत्येक मुस्लिम जिहादी असू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक डाव्या विचारसरणीची व्यक्ती नक्षलवादी असणं गरजेचं नाही."

अमोल पाटील यांच्यामते, "मोदींनी सत्तेत आल्यावर सर्वप्रथम ज्या काही NGO वर बंदी आणली तो निर्णय योग्यच होता हे आता दिसून येत आहे."

मिलिंद म्हात्रे म्हणतात, "पोलीस मूर्ख नाहीत कोणालाही पकडायला. फक्त त्यांना पकडलं आहे अजून मुख्य आरोप सिद्ध व्हायचे आहेत. ते सिद्ध होण्याआधीच तुम्ही त्यांच्याबाजूनं ओरडायला सुरुवात केली आहे. जर आरोप सिद्ध झाले की पुरस्कार वापसी गँग तयारच आहे पुरस्कार परत करायला."

सुधांशू लासुरकर यांच्या मते, "सनातनी आणि नक्षली दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही देशासाठी घातकच. या दोघांचा अंतिम उद्देश दहशतवादच आहे. दोघांवर लवकरात लवकर बंदी घातली पाहिजे. तसेच भाजपचा संबंध सनातनशी आणि कम्युनिस्टांचा संबंध काँग्रेसशी जोडणं चुकीचंच. दोन्ही पक्ष कितीही भांडखोर असलेतरी अशावेळी दोघांनी attitude बाजूला ठेऊन एकत्र येऊन या लोकांविरुद्ध कारवाई केली पाहिजे."

भाऊ पांचाळ म्हणतात, "दाभोळकर खून प्रकरणातील आरोपी असतील किंवा 'कोरेगांव-भिमा' प्रकरणातील, त्यांच्या अटकेच्या निषेधाचं समर्थन होऊच शकत नाही. विचारवंतांनी वैचारिक पातळीवर स्पष्टीकरण देणं एकवेळेस मान्य आहे. पण सरकारला बोल लावण्यासाठी, पोलिसांवर आरोप करणे, न्यायिक प्रक्रियेआधीच निर्दोष ठरवणे, असली कृत्य समाजाच्या सामाजिक आरोग्यासाठी अपायकारक आहेत."

कौतिकराव नरवडे यांच्यामते, "सनदशीर मार्गाने हक्कासाठी लढणारे नक्षलवादी ठरवले जातात. तर दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांची हत्या करणारे देशभक्त. ऊद्धवा अजब तुझे सरकार."

राहुल माळी यांच्यामते, "देशाच्या पंतप्रधानांना जर मारण्याचा डाव असेल तर नक्कीच अशी कारवाई झाली पाहिजे. यात कुठेही जातीधर्माचं राजकारण व्हायला नको."

नयन साळवी म्हणतात, "सामाजिक आणि धार्मिक विषमता असणाऱ्या व्यवस्थेबद्दल जे विचारवंत लिखाण करतात, लोकांना त्या मानसिक गुलामगिरीतून वर आणण्याचा प्रयत्न करतात त्यांचा शहरी नक्षलवादाशी (नवीन संकल्पना) संबंध जोडला जातो. कायदा चालवणारे जर एवढेच पारदर्शक आहेत, तर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपींना अटक का केली नाही."

सुमीत दांडगे म्हणतात, "जर कोणी एक माणूस दुसऱ्या कोणत्याही जीवित घटकाला अघोरी आनंदासाठी इजा पोहोचवत असेल तर तो माणूस नाही सैतान आहे. त्याचे समर्थन करणारे ही त्याच्यासारखेच आहेत. दुर्देवानं शासनही तसंच वर्तन करतं आहे."

बाबू डिसूजा म्हणतात, "दाभोलकर, गौरी लंकेश यांचे मारेकरी कर्नाटक पोलिसांनी शोधून काढले. जे महाराष्ट्र पोलिसांना पाच वर्षांत जमले नाही वा राजकीय सत्ताधाऱ्यांनी त्यांना ते करू दिलं नाही. लोकांपुढे संबंधित संघटनेचा चेहरा उघड पडला. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माओवादी वा डाव्यांवर हे छापेसत्र सुरू आहे."

प्रशांत हिंदू म्हणतात, "काहींच्यामते सनातनचे सूत्रधार पकडणं म्हणजे लोकशाही पण नक्षल्यांचे सूत्रधार पकडणे ही लोकशाहीची हत्या असते."

प्रविण वानखेडकर म्हणतात, "या लेखिका स्वतःला न्यायाधीश आणि कायद्याच्यावर समजायला लागल्या आहेत."

अशा प्रकारे वाचकांनी अरुंधती रॉय यांच्या वक्तव्याच्या निमित्तानं देशभर सुरू असलेल्या चर्चेबद्दलची त्यांची मतं मांडली आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)