सिगरेटचं व्यसन सोडायचं आहे? काय आहेत सरकारी उपाय?

  • सरोज सिंह
  • बीबीसी प्रतिनिधी

सरकारच्या मते भारतात दरवर्षी 10 लाख लोक सिगरेटच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात तर ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार भारतात सिगरेट ओढणाऱ्या लोकांची संख्या 10 कोटींहून जास्त आहे.

ही संख्या लक्षात घेऊन सरकारने 1 सप्टेंबरपासून सिगरेटच्या पाकिटवर एक हेल्पलाईन नंबर लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. हा नंबर आहे 1800-11-2356.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुढच्या महिन्यापासून सिगरेट पाकिटावर लिहिलं असेल - आजच सोडा. कॉल करा 1800-11-2356 वर.

नव्या पाकिटावर चित्र आणि इशारा दोन्ही आता बदलतील. हेल्पलाईनच्या नंबरबरोबरच पॅकेटवर 'तंबाखूने कॅन्सर होतो' किंवा 'तंबाखूने हालहाल होऊन मृत्यू येतो' असं लिहिणं आवश्यक असेल.

सिगरेट ओढण्याचं व्यसन कसं सोडणार?

सरकारच्या या आदेशामुळं आणि हेल्पलाईन नंबरमुळे धुम्रपान करणाऱ्यांचं सिगरेटचं व्यसन सुटेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

हेच जाणून घ्यायला आम्ही राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्रावर फोन केला.

2016पासून केंद्र सरकार दिल्लीमध्ये ही हेल्पलाईन चालवते. हेल्पलाईनवर फोन केल्यावर आधी एक रेकॉर्डेड आवाज ऐकू येतो, 'तुम्ही तंबाखू सोडण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल अभिनंदन. आमचे समुपदेशक लवकरच तुमच्याशी संवाद साधतील.'

बऱ्याचदा समुपदेशक बिझी असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं होऊ शकत नाही.

या हेल्पलाईनवर तीन वेळा फोन करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केल्यावर चौथ्या वेळी मात्र आमचा फोन लागला. फोनवर महिलेचा आवाज ऐकून समुपदेशक थोडी चकित झालेली दिसल्या.

त्यांच्या आश्चर्याचं कारणं विचारलं तर त्यांनी सांगितलं की देशात केवळ तीन टक्के महिला तंबाखूचं सेवन करतात.

सिगरेट सोडण्यासाठी हेल्पलाईनला फोन करणारे बहुतांश पुरुष असतात. महिलांनी फोन केला तर त्या सहसा भाऊ, पती किंवा इतर पुरुष नातेवाईकांसाठी करतात, अशी माहिती आम्हाला देण्यात आली.

यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. त्या समुपदेशिकेने विचारलं, तुम्ही कधीपासून सिगरेट ओढत आहात? तुम्हाला ही सवय कशी लागली? एका दिवसात किती सिगरेट ओढता? वगैरे वगैरे.

त्यांच्या मते हे जाणून घेणं गरजेचं आहे म्हणजे त्या सिगरेट ओढणाऱ्या माणसाचं व्यसन सोडवणं अवघड आहे की सोपं हे लक्षात येईल.

एवढं सगळं जाणून घेतल्यावर समुपदेशक सिगरेट ओढणाऱ्यालाच विचारतात, सिगरेट सोडण्याची डेडलाईन काय आहे?

हेतू हा की सिगरेट पिणाऱ्या माणसाला ते व्यसन सोडण्याची किती तीव्र इच्छा आहे आणि त्यासाठी तो काय करायला तयार आहे, हे समजावं.

सल्ला क्रमांक 1 - सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या. तुम्ही या पाण्यात मधही घालू शकता.

सल्ला क्रमांक 2 - जेव्हाही सिगरेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा मनाची समजूत घाला की 'मला काहीही करून सिगरेट सोडायची आहे.' सिगरेट सोडण्यासाठी इच्छाशक्ती सगळ्यांत आवश्यक आहे.

सल्ला क्रमांक 3 - पूर्ण इच्छाशक्तीसह तुम्ही जेव्हा सिगरेट सोडण्याची डेडलाईन ठरवता आणि त्यानंतर तुम्हाला सिगरेट ओढायची तलफ येते तेव्हा शांत बसा, मोठ्ठा श्वास घ्या आणि पाणी प्या. असं केल्याने तुमचं लक्ष सिगरेटपासून विचलित होईल.

सल्ला क्रमांक 4 - आलं आणि आवळे किसून वाळवून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून डब्यात भरून नेहमी तुमच्यासोबत ठेवा. जेव्हाही सिगरेट ओढायची तलफ येईल तेव्हा थोड्या थोड्यावेळाने ही पेस्ट चघळत राहा. याशिवाय मोसंबी, संत्री, आणि द्राक्षांसारख्या फळांचा रस पिणंही सिगरेटची तलफ घालवायला कामी येतं.

हेल्पलाईनवर हे सल्ले दिल्यानंतर समुपदेशक एका आठवड्यानंतर तुमच्यासोबत फॉलोअपही घेऊ शकता.

सध्या या हेल्पलाईन नंबरवर 40-45 फोन येतात. समुपदेशकांच्या मते ज्या दिवशी वर्तमानपत्रांत जाहिराती येतात त्यादिवशी जास्त फोन येतात.

ही हेल्पलाईन सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत चालू असते. इथे सध्या 14 समुपदेशक काम करतात.

या हेल्पलाईननुसार सिगरेट किंवा तंबाखू सोडण्याच्या सुरुवातीच्या दिवसात चिडचिड, अस्वस्थता वाढते. जीव घाबराघुबरा होतो. तुम्हाला किती दिवसांपासून किती सिगरेट ओढण्याची सवय आहे यावरून तुमची लक्षणं ठरतात.

हेल्पलाईन नंबर किती फायदेशीर?

मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सरचे चेअरमन डॉ. हरित चतुर्वेदींच्या मते या नव्या हेल्पलाईनचे फायदे होतील.

"मी आजपर्यंत असा एकही माणूस पाहिला नाही ज्याला तंबाखूचं व्यसन सोडायचं नाहीये. हेल्पलाईन नंबर सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं तर ज्यांना व्यसन सोडायचं आहे त्यांना कळेल की कुठे जायचं, कोणाशी बोलायचं. याशिवाय ज्यांनी नुकतीच सिगरेट ओढायला सुरुवात केली आहे ते आधीच सावध होऊन जातील," असं ते म्हणाले.

डॉ. चतुर्वेदींच्या मते भारतात गेल्या तंबाखूच्या पाकिटांवर छापलेल्या इशाऱ्यामुळे दरवर्षी सिगरेट ओढणाऱ्यांची संख्या घटत आहे.

ऑस्ट्रेलियन सरकाने 2006 साली सिगरेटच्या पाकिटांवर अशा प्रकारचे हेल्पलाईन नंबर लिहायला सुरुवात केली. हा उपाय कितपत यशस्वी ठरला यावर 2009 साली एक रिपोर्ट प्रकाशित झाला. या रिपोर्टनुसार पाकिटावर हेल्पलाईन नंबर छापायला लागल्यापासून या नंबरवर येणारे फोन कॉल्स वाढले. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की ज्यांना सिगरेट सोडायची आहे त्यांना मार्ग माहिती नाही.

देशभरातल्या 46 देशांमध्ये तंबाखू उत्पादनांवर असे नंबर्स लिहिलेले असतात.

व्हॉलंट्री हेल्थ असोसिएन ऑफ इंडियाच्या सीईओ भावना मुखोपाध्याय यांच्या मते, "ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे 2016-17मध्ये ही गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे 62% सिगरेट ओढणाऱ्यांनी आणि 54% विडी ओढणाऱ्यांनी चित्रातलं इशारा पाहून तंबाखू सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे."

डॉ. चतुर्वेदीच्या मते, "एक महिनाभर जर कोणी सिगरेट ओढली नाही तर ते परत सिगरेट ओढण्याची शक्यता कमी होते. पण जर सहा महिने कोणी सिगरेटला हातही लावला नाही तर त्यांनी सिगरेट पुन्हा ओढण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते."

लोकांची मतं

सिगरेट ओढणाऱ्या तसंच न ओढणाऱ्या लोकांकडूनही बीबीसीने त्यांची मतं जाणून घेतली.

दिल्लीत शिकणाऱ्या सदफ खान यांच्या मते, "सिगरेटच्या पाकिटावर इशारा लिहिलेला असतो. पण तरीही सिगरेट ओढतातच, मीही ओढते. हेल्पलाईन नंबरने काही फरक पडणार नाही."

आकडे काय म्हणतात?

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार देशात 10.7% प्रौढ तंबाखूचं सेवन करतात. देशात 19% पुरुष आणि 2% महिला तंबाखूचं सेवन करतात.

फक्त सिगरेट ओढण्याची गोष्ट असेल तर 4% प्रौढ सिगरेट ओढतात, त्यात 7.3% पुरूष आहेत तर 0.6% महिला.

WHOच्या रिपोर्टनुसार भारतीय महिलांना सिगरेटपेक्षा विडी ओढण्याची जास्त सवय आहे. देशात 1.2% महिला विडी ओढतात.

भारतात सिगरेटशी असणारे निगडीत कायदे

2014 साली आलेल्या कायद्याने सिगरेटच्या पाकिटावर चित्रासह 'सिगरेट ओढणं आरोग्यासाठी धोकादायक आहे,' असा इशारा लिहिणं सक्तीचं झालं. सिगरेट कंपन्यांनी याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पण 2016 साली सुप्रीम कोर्टाने सरकारच्या बाजूने निकाल दिला.

भारतात तंबाखूशी संबंधित उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखूची उत्पादन विकता येत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिण्यावर बंदी आहे. असं करताना जर कोणी आढळलं तर त्याला दंड करण्याचाही कायदा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)