जैन धर्मातील संथारा व्रत आत्महत्या आहे का?
- तुषार कुलकर्णी
- बीबीसी प्रतिनिधी

फोटो स्रोत, Getty Images
"जेव्हा माझ्या बहिणीचे सासरे, नरेंद्र कुमार जैन यांनी संथारा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरात महोत्सवाचं वातावरण होतं. कारण ज्यांचं आयुष्य परिपूर्ण आहे आणि ज्यांच्या भाग्यात समाधी मरण आहे त्यांनाच ते प्राप्त होतं," नागपूरच्या रिचा जैन सांगतात.
"2015मध्ये नरेंद्र कुमार जैन यांनी संथारा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना गुरुग्रहातून आदेश येण्याची वाट पाहावी लागली. आचार्य विद्यासागर यांनी त्यांना परवानगी दिली आणि नरेंद्र कुमार जैन यांचा मोक्षाचा मार्ग मोकळा झाला," रिचा सांगतात.
नरेंद्र कुमार जैन हे अशा अनेक जैन साधकांपैकी एक आहेत ज्यांनी 'मोक्षप्राप्ती'साठी संथाराचा मार्ग पत्करला. महाराष्ट्रात संथारा घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तर संथारा व्रताला विरोध करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ही प्रथा म्हणजे आत्महत्या आहे, असं मानणाऱ्यांनी या प्रथेविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
"कुणी संथारा घेऊन समाधी मरण प्राप्त केलं तर त्यावर दुःखी कष्टी न होता महोत्सव साजरा करावा असा धार्मिक आदेश आहे. त्याच आदेशाचं पालन आम्ही करतो," रिचा सांगतात.
जैन मुनी तरुणसागर यांचं 51व्या वर्षी निधन झालं. ते आजारी होते त्यांनी शुक्रवारी संथारा घेतला आणि अन्नत्याग केला होता असं त्यांच्या निकटवर्तीयांनी माध्यमांना सांगितलं. त्यांच्या निधनानंतर संथारा म्हणजे काय याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
काही जण संथारा व्रताला विरोध देखील करतात. तेव्हा संथारा म्हणजे नेमकं काय आणि संथाराबाबत असलेल्या वादाचं स्वरूप काय याची माहिती देणारा हा लेख.
संथारा म्हणजे काय?
जैन धर्मीयांची अशी धारणा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती किंवा जैन मुनी आपलं आयुष्य परिपूर्णरीत्या जगते, शरीरानं साथ देणं सोडलं तेव्हा संथारा घेतला जातो. संथाऱ्याला संलेखना देखील म्हटलं जातं. संथारा हा धार्मिक संकल्प असतो. त्यानंतर ती व्यक्ती अन्नत्याग करते आणि मृत्यूला सामोरं जाते.
संथाऱ्याचा उद्देश हा आत्मशुद्धीचा असतो. यामध्ये परिग्रह असतो. कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष मिळवणे हा मनुष्य जन्माचा उद्देश असतो आणि त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी संथाराचं साहाय्य मिळतं असं 'संलेखना इज नॉट सुसाइड' या पुस्तकात म्हटलं आहे. जैन धर्माचे अभ्यासक न्यायमूर्ती टी. के. तुकोल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
संथारा घेण्याची धर्माज्ञा गृहस्थाला तसेच मुनी किंवा साधूला आहे. दुसऱ्या शतकात लिहण्यात आचार्य समंतभद्र यांनी लिहिलेल्या 'रत्नकरण्ड श्रावकाचार' या ग्रंथात संथाराचा उल्लेख आहे. श्रावक किंवा साधकाचं वर्तन कसं असावं याविषयीची माहिती या ग्रंथात दिलेली आहे. हा ग्रंथ जैन धर्मातला एक प्रमुख ग्रंथ मानला जातो.
यात म्हटलं आहे की आणीबाणीचा प्रसंग ओढवल्यावर, दुष्काळाच्या स्थितीमध्ये, म्हातारपणी किंवा दीर्घ आजारात व्यक्तीनं संलेखना (संथारा) घेता येते. ज्या व्यक्तीने हा संकल्प केला आहे त्या व्यक्तीनं शुद्ध अंतकरणानं, ममत्व आणि द्वेष सोडून सर्वांच्या चुका माफ करायला हव्या तसेच स्वतःच्या चुकांची माफी देखील मागायला हवी.
फोटो स्रोत, Surendra jain/bbc
धर्माज्ञेनुसार धर्मगुरूच त्या व्यक्तीला संथाराची परवानगी देतात. ती परवानगी मिळाल्यानंतर ती व्यक्ती अन्नाचा त्याग करते. त्यावेळी धार्मिक प्रवचन आणि धर्मग्रंथांचं वाचन त्या व्यक्तीच्या भोवती केलं जातं. त्या व्यक्तीला अनेक जण भेटायला येतात आणि त्या व्यक्तीचे आशीर्वाद घेतात. संथारा घेतलेल्या व्यक्तीच्या निधनाला समाधीमरण म्हणतात. त्या व्यक्तीच्या पार्थिवाला पद्मासनात बसवलं जातं आणि मिरवणूक काढली जाते.
संथारा म्हणजे आत्महत्या आहे का?
जैन धर्मीयांमध्ये संथारा ही पद्धत आस्थेचा विषय आहे पण काही जणांचा संथारा या प्रथेला विरोध आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर ही प्रथा म्हणजे आत्महत्येचं एक रूप आहे असं देखील म्हटलं जातं.
2006 साली निखील सोनी यांनी संथाराविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. संथारा ही प्रथा आत्महत्येप्रमाणेच आहे आणि आधुनिक युगात अशा प्रथेला थारा नसावा अशी हरकत सोनी यांनी आपल्या याचिकेत घेतली होती. संथारा घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचं समाजातलं स्थान वाढतं यामुळे या प्रथेला कुटुंबीयांकडूनच उत्तेजन मिळतं असं देखील सोनी यांनी याचिकेत म्हटलं होतं.
या याचिकेचा निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने 2015 साली दिला होता. संथारा ही प्रथा बेकायदेशीर आहे असं न्यायालयाने म्हटलं होतं. संथारामुळं मोक्षप्राप्ती होते याचा धर्मग्रंथात उल्लेख आहे हे जरी खरं असलं तरी हाच मोक्षाचा एकमेव मार्ग नाही. ही प्रथा जैन धर्मासाठी अनिवार्य नाही म्हणत राजस्थान न्यायालयाने संथारावर बंदी घातली होती.
फोटो स्रोत, kunal chhajer/bbc
सोनी यांचे वकील माधव मित्र यांनी बीबीसी हिंदीला म्हटलं होतं, "हा एक महत्त्वपूर्ण निकाल आहे. संथारा घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या किंवा त्या व्यक्तीला सहकार्य करणाऱ्याला IPCच्या 306 या कलमानुसार दोषी मानलं जाईल."
राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पाना चंद जैन यांनी या निकालावर असहमती दर्शवली होती. ते म्हणाले होते, "संथाराला आत्महत्या म्हणणं योग्य नाही. आत्महत्या आवेशात केली जाते तर संथारा ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. जैन शास्त्रांनी याला परवानगी दिली आहे. असाध्य रोग झालेली व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्तीनं संथारा घेता येतो."
या निकालाला आव्हान देण्यात आलं. सुप्रीम कोर्टानं राजस्थान उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आणि संथाराची प्रथा सुरू ठेवण्याची परवानगी दिली.
फोटो स्रोत, Surendra jain/bbc
मुंबईत साखळी पद्धतीनं होतो संथारा
मुंबई आणि मुंबई उपनगरात संथारा घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. टाइम्स ऑफ इंडियानं 2015 साली प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलं आहे की गेल्या सात वर्षांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरात संथारा घेणाऱ्यांची संख्या ही 400च्या आसपास आहे. डोंबिवली ते नालासोपारा या भागात साखळी पद्धतीनं संथारा घेतला जातो. डोंबिवलीतील रतांशी शामजी सावला यांनी संथारा घेतल्यानंतर काही दिवसात त्यांचं निधन (समाधी मरण) झालं. त्यानंतर नालासोपाऱ्यातील कस्तुरीबेन गाला यांनी संथारा घेतला. सतराव्या दिवशी त्यांचं देहावसन झालं. "साखळी पद्धतीनं होणाऱ्या संथारामुळे जैन समाज एकत्र बांधला गेला आहे," असं बाबूलाल जैन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला त्यावेळी सांगितलं होतं.
राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यात जैन धर्मीयांची संख्या लक्षणीय आहे. या ठिकाणी देखील अनेक जण संथारा घेतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)