एशियन गेम्स : सहा बोटांच्या अडचणीवर स्वप्ना बर्मननं अशी केली मात

फोटो स्रोत, Reuters
हेप्टॅथलॉन क्रीडा प्रकारात स्वप्ना बर्मन हिनं सुवर्ण पदक पटकावलं.
जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या स्वप्ना बर्मन या खेळाडूनं हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्ण पदक जिंकून नवा इतिहास रचला. एशियन गेम्समधल्या हेप्टॅथलॉनमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळालं.
हेप्टॅथलॉन या स्पर्धा प्रकारात एकूण सात खेळ असतात. 100 मीटर हर्डल, हाय जंप, गोळा फेक, लाँग जंप, 200 मीटर धावणे, भाला फेक, 800 मीटर धावणे यांचा समावेश होतो.
पश्चिम बंगालच्या जलपायगुडीमधल्या 21 वर्षांच्या स्वप्नाचा या पदकापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिचे वडील रिक्षाचालक आहेत आणि तिची आई चहाच्या मळ्यात काम करते. घरची एकूण परिस्थिती बेताचीच.
त्यात स्वप्नाच्या दोन्ही पायांना 6 बोटं. तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष. एरवी पायाला सहा बोटं असली तरी काही अडचण येत नाही. पण स्वप्नाला मात्र त्याचा खूपच त्रास झाला.
"स्पर्धेपूर्वी पायात बसतील असे बूट मला मिळत नव्हते. पण स्पर्धेत भाग तर घ्यायचा होता, त्यामुळे मग कामचलाऊ बूट घालून मी मैदानात उतरले आणि देशासाठी सुवर्ण पदक जिकलं," स्वप्नानं तिच्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या. स्पर्धा जिंकल्यानंतर स्वप्नानं तिचं दु:ख बोलून दाखवलं.
पायाला सहा बोटं असणं हा कोणताही आजार नाही. हाता-पायांना अतिरिक्त बोटं असणं, याला विज्ञानाच्या भाषेत पॉलिडॅक्टिली म्हणतात. काही व्यक्तीमध्ये पॉलिडॅक्टिली जन्मापासूनच असते. डॉक्टरांच्या मतानुसार हात आणि पाय यांना सहा बोटं असण्यानं रोजच्या जगण्यात किंवा कामात विशेष फरक पडत नाही.
फोटो स्रोत, Reuters
सहा बोटांसह स्वप्नाचा प्रवास
स्वप्ना बर्मन हिच्या दोन्ही पायांना सहा बोटं असून तो पॉलिडॅक्टिलीमधला तिसरा प्रकार आहे. त्यात मांसाबरोबर हाडदेखील असतं. अजूनही स्वप्नानं ही बोटं शस्त्रक्रिया करून काढलेली नाहीत. सहा बोटांनी धावण्यात काहीच अडचण नसली तरी त्यासाठी वेगळ्या प्रकारचे बूट वापरावे लागतात. या वेगळ्या बुटांसाठी स्वप्नाला खूप झगडावं लागलं.
स्वप्नाचे वडील रिक्षाचालक होते. पण 2013मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला. तेव्हापासून ते झोपून आहेत. सध्या तिची आई चहाच्या मळ्यात काम करते आणि त्यांच्याच उत्पन्नावर या कुटुंबाचा चरितार्थ चालतो.
स्वप्नाच्या घरी एवढे पैसेच नव्हते की तिला वेगळ्या प्रकारचे बूट विकत घेता येतील. स्वप्नाच्या घरी आई-वडिलांसह मोठा भाऊ असित आणि त्याची पत्नी आहे.
फोटो स्रोत, Reuters
"मी या खेळात करिअर करावं असं माझ्या वडिलांनी ठरवलं होतं. मी चांगली खेळाडू आहे हे त्यांनी ओळखलं होतं. ते रिक्षा चालवायचे आणि रिक्षानंच मला मैदानावर प्रॅक्टीससाठी सोडायचे. तिथूनच माझ्या खेळाची सुरुवात झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुवर्ण पदक जिंकल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे," असं सुरुवातीच्या प्रवासाबद्दल स्वप्ना सांगते.
फोटो स्रोत, EPA
जकार्तातल्या स्पर्धेविषयी स्वप्ना सांगते की, "जकार्ताला पोहोचल्यानंतर माझ्या तोंडात इन्फेक्शन झालं होतं. इतकं दुखत होतं की स्पर्धेत भाग घेऊ नये, असं वाटत होतं. पण मला माझी 4 वर्षांची मेहनत आठवली आणि मी खेळले. निकाल तुमच्या सर्वांसमोर आहे."
स्वप्नाच्या वहिनीनं बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "स्वप्नाला पळताना कोणतीच अडचण येत नाही. पण तिला चांगले बूट न मिळाल्याची खंत वाटते. दुकानात जेव्हा तिच्यासाठी बूट घ्यायला जातो, तेव्हा तिच्या आकाराचे बूट मिळायचेच नाहीत. पायाचे पंजे रुंद असल्याने लांबीला नीट न येणारे बूट घालून धावल्यामुळे तिला त्रास व्हायचा."
फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
या अडचणीवर मात कशी केली याबद्दल बोलताना त्या सांगतात, "स्वप्नाच्या पायाच्या आकारचे बूट मिळवण्यात अनेक अडचणी आल्या. ट्रेनिंगपासून तिच्या खेळापर्यंत. अनेकदा बूट नसल्याने तिची निवडच व्हायची नाही. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण साध्या बुटांसाठीही जिथे पैसे नव्हते तिथे महागड्या उपचारासाठी कुठून पैसे आणणार? अशी परिस्थिती होती."
स्वप्ना 2012मध्ये कोलकाता येथे सरावासाठी आली. प्रशिक्षक सुभाष सरकार यांनी तिला हेप्टॅथलॉनचा सराव करण्यास सांगितलं.
आता स्वप्नाची तयारी सुरू होईल ती ऑलिंपिकची.
(बीबीसी प्रतिनिधी सुमिरन प्रीत कौर यांच्याशी झालेल्या मुलाखतीवर आधारित)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)