दहीहंडी : 'पाचव्या थरावरून खाली पडलो नसतो तर आज आयुष्य वेगळं असतं'

  • नागेश भोईर
  • बीबीसी मराठीसाठी
नागेश भोईर

फोटो स्रोत, Prashant Nanaware

फोटो कॅप्शन,

नऊ वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवातल्या अपघातात जखमी झालेला नागेश आजही अंथरुणातच आहे.

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं होणारा दहीहंडी उत्सव ही मुंबई-ठाण्याची ओळख. दहीहंडीचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (18 ऑगस्ट) विधानसभेत केली.

सरकारतर्फे प्रो- गोविंदा स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतला असून या स्पर्धेत बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. गोविंदांना शासनसेवेत पाच टक्के आरक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

पण अनेकदा सुरक्षेच्या नियमाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यामुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. एका दिवसाच्या या खेळामुळे त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होऊन बसतो.

शुक्रवारी (19 ऑगस्ट) साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने, तेरा वर्षांपूर्वी जखमी होऊन अंथरूणाला खिळून बसलेल्या गोविंदाची कहाणी त्याच्याच शब्दात.

14 ऑगस्ट 2009 हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मी 22 वर्षांचा होतो. भिवंडीतल्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकातर्फे दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून पडलो. गंभीर जखमी झालो. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या छातीपासून शरीराच्या खालच्या भागात काहीच संवेदना नाहीत.

हात हलवू शकतो पण हाताची बोटं कडक झाली आहेत. पडलो नसतो तर आयुष्य वेगळं असलं असतं. आता सर्व इच्छा-आकांक्षा संपल्याच आहेत. फक्त पुन्हा व्यवस्थित बरा होऊ दे एवढीच इच्छा आहे.

दहीहंडीच्या उत्सवात मी लहानपणापासून सहभागी व्हायचो. भिवंडीतील तरुणांनी एकत्र येऊन जय महाराष्ट्र हे गोविंदा पथक सुरू केलं होतं. मी त्याच 130 जणांच्या पथकाचा भाग होतो. माझ्या अपघातानंतर आमच्या पथकानं दहीहंडीत सहभाग घेणं बंद केलं.

दंहीहंडीचा उत्सव जवळ आला की आम्ही महिना-दीड महिना आधी रात्रीच्या वेळेस भिवंडीतल्या गौरीपाड्यातच सराव करायचो. गरज पडेल तसं मी तळापासून वरपर्यंत सर्व थरांमध्ये असायचो. शिवाय वजनाने हलका असल्याने अनेकदा सर्वांत वरच्या थरावर चढून हंडीसुध्दा फोडायचो.

2009च्या दहीहंडी उत्सवाच्या दिवशी आम्ही दिवसभरात सात ते आठ हंड्या फोडल्या होत्या. टिळक चौकातली दहीहंडी फोडतानाही सर्व मुलं उत्साहात होती. एक-एक थर लागत गेले आणि मी सर्वांत वरच्या चौथ्या थरावर चढून पाचवा थर रचला.

फोटो स्रोत, Prashant Nanaware

फोटो कॅप्शन,

नागेशचा वाढदिवस साजरा करताना त्याचे मित्र

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

दहीहंडी फोडली आणि अचानक दहीहंडी बांधलेली दोरी तुटली. मला काही कळायच्या आतच मी दोरीसकट खाली आलो आणि बाहेर फेकला गेलो.

'पुठ्ठ्यावर झोपवलं होतं...'

मी इतक्या प्रचंड वेगाने खाली आलो होतो की, पडल्यानंतर मला काय झालं ते कळलंच नाही. ताबडतोब एका रिक्षातून जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिथे माझ्यावर उपचार करता येतील अशी काहीच व्यवस्था नव्हती. हळूहळू माझ्या पायाला मुंग्या यायला लागल्या होत्या.

मी बेशुध्द झालो. त्या हॉस्पिटलमधून मला दुसऱ्या हॉस्पिटलला हलवण्यात आलं. तिथे सिटी स्कॅन केलं आणि MRI काढण्यात आला. तिथल्या डॉक्टरांनीही सांगितलं की, याला मोठ्या हॉस्पिटलला हलवावं लागेल.

शुध्दीवर आलो तेव्हा मी मुंबईच्या केईएम रुग्णालयात होतो. मला पुठ्ठ्यावर झोपवण्यात आलं होतं. कारण तिथे बेड उपलब्ध नव्हता. पहाटे चार वाजता मला बेड मिळाला. केईएममध्येच मला रक्ताची उलटीही झाली. खरंतर मला यातलं काहीच आठवत नाही. आईने मला हे सर्व नंतर सांगितलं.

केईएमनंतर मी शुध्दीवर आलो तेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होतो. ऑपरेशननंतर माझ्या नाका-तोंडात नळ्या टाकलेल्या होत्या. फक्त टीsss... टीsss... एवढाच आवाज ऐकू येत होता.

फोटो स्रोत, Prashant Nanaware

फोटो कॅप्शन,

अपघातापूर्वी नागेश भोईर बहिणींसह

पुढची दोन-अडीच वर्षं मला काहीच कळत नव्हतं. मला धड बोलताही यायचं नाही. तो सर्व काळ घर आणि हॉस्पिटल यातच गेला. 2012 साली मला थोडं फार कळायला लागलं.

'गेली नऊ वर्षं बिछान्यावर पडून'

गर्दीत लोकांच्या अंगावर पडलो असतो तर मला फार दुखापत झाली नसती. पण काँक्रीटच्या रस्त्यावर आदळल्याने माझ्या मणक्याला दुखापत झाली. त्यामुळे माझ्या छातीपासून शरीराचा खालचा सर्व भाग लुळा पडला. कंबर, पायात काहीच संवेदना नाहीत. हात हलवू शकतो पण माझ्या हाताची बोटं कडक झालेली आहेत.

ऑपरेशननंतर सात महिने बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात होतो. खरंतर अपघातानंतर सहा महिने किंवा वर्षभरात बरा होईन, असं घरच्यांना आणि मित्रांना वाटलं होतं.

पण गेली नऊ वर्षं मी बिछान्यावर पडून आहे. मला जागेवरून उठायचं असलं तरी मदत लागते. घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी एकट्या 75 वर्षांच्या वडिलांवर आहे. त्यात माझ्या उपचारांचा खर्चदेखील आहेच.

मला झालेल्या दुखापतीवर अद्याप पूर्ण उपचार निघालेला नाही. पण मी सध्या 'ब्रेन आणि स्पाईन इन्स्टिट्यूट'च्या डॉ. नंदीनी गोकुलचंद्रन यांच्याकडे 'स्टेम सेल्स'द्वारा उपचार घेत आहे. या उपचाराने खूप फरक पडला. शिवाय फिजिओथेरपीसुध्दा सुरू आहे.

'सर्व इच्छा-आकांक्षा संपल्या आहेत'

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी माझं ऑपरेशन केलं. "तू कधी चालू शकशील का हे सांगता येणार नाही," असंही ते म्हणाले होते.

अडचणीच्या काळात माझ्या मित्रांनी, मंडळाच्या लोकांनी मला खूप मदत केली. उपचारांसाठी पैशाची जमवाजमव असो किंवा आताही गरज लागेल तेव्हा प्रत्येक कामासाठी ते धावून येतात.

फोटो स्रोत, Prashant Nanaware

फोटो कॅप्शन,

आईसह नागेश भोईर

अपघातानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. पडलो नसतो तर बरं झालं असतं, असं वाटतं. पण अपघात कधीही, कसाही होऊ शकतो.

'...मागच्याने शहाणं व्हायला हवं'

दहा वर्षांपूर्वी मी खेळायचो तेव्हा हार्नेस किंवा हेल्मेट या गोष्टीही वापरल्या जात नव्हत्या. पण अपघातानंतर त्याची आवश्यकता लक्षात आली. त्यावेळी कधीच असं वाटलं नव्हतं की, आपल्यासोबत असं काही होईल. ज्याचा त्रास माझ्यासोबत घरच्यांनाही भोगावा लागेल. त्यामुळे पुढच्याला ठेच लागली तर मागच्याने शहाणं व्हायला हवं.

माझा अपघात दोरी तुटून झाला. आयोजकांनी नवीन आणि चांगली दोरी बांधलेली असली तरी अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.

कधी पाय सटकतो, पावसाने हात भिजलेले असतात. ही खरंतर जीवघेणी स्पर्धा आणि खेळ आहे.

ज्या अर्थी विमा काढावा लागतो त्याचवेळी अपघाताची शक्यता ही गृहीत धरलेली असते. इतर कोणत्या सणाला विमा काढला जातो का?

फक्त हेल्मेट घालून, हार्नेस लावून आणि खाली मॅट टाकून गोविंदा सुरक्षित होणार नाहीत. उंचीच्या निर्णयाचं काटेकोरपणे पालन करणंही आवश्यक आहे.

दहीहंडी हा उत्सव आनंदासाठी साजरा करायलाच पाहिजे. पण तरुणांनी उंचीच्या भानगडीत पडू नये. यासाठी मी 2016साली सोशल मीडियावर कॅम्पेनही केलं होतं. कमी थर लावण्याबाबत गोविंदा पथकांना आवाहन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

'सणाचा इव्हेंट झालाय'

दहा वर्षांपूर्वी दहीहंडीला राजकारणाचं स्वरूप नव्हतं. पण गेल्या पाच-सात वर्षांत या सणाचा इव्हेंटच झाला आहे. कुणाची दहीहंडी मोठी यामध्ये स्पर्धा लागते आणि मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मुलं जखमी होतात किंवा कायमचे प्राणास मुकतात.

फोटो स्रोत, Prashant Nanaware

बहुतेक दहीहंडी पथकांमध्ये सहभागी होणारे गोविंदा गरीब घरातील असतात. कितीही काळजी घेतली तरी अपघात होतातच. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी सरकारी रूग्णालयांमध्ये काही बेड राखीव ठेवायला हवेत. तसं पत्र दहीहंडी मंडळांच्या समन्वय समितीने रुग्णालयांना द्यायला हवं. जेणेकरून जखमी गोविंदांवर ताबडतोब उपचार होऊ शकतील.

'आमचं पथक बंद झालं'

माझ्या अपघातानंतर मित्रांना खूप दु:ख झालं. मी ज्या पथकातून खेळायचो ते पथकही बंद झालं. पण मोठी मंडळं बक्षिसाच्या मिळणाऱ्या रकमेमुळे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.

दहीहंडी हा सण सुरू राहायला हवा, असं मला वाटतं. पण यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मी एवढंच सांगेन की, "कमीत कमी थर लावून स्वत:ची काळजी घेऊन हा सण साजरा करा. सकाळी दहा ते रात्री दहा या बारा तासांसाठी आपला जीव पणाला लावू नका. कमी थर लावा आणि आनंद साजरा करा."

(शब्दांकन - प्रशांत ननावरे)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)