मध्ययुगीन भारतावर ठसा उमटवणाऱ्या मुघल राणीची गोष्ट

मुघल Image copyright Penguin

17व्या शतकात भारतात जेव्हा मुघलांची सत्ता होती, तेव्हाच्या काळातील ही गोष्ट. मुघल साम्राज्यातील एका राणीने त्याकाळातील सर्वांत शक्तिशाली महिला, असण्याचा मान मिळवला होता. मुघल साम्राज्यात आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासात या राणीच्या कारकिर्दीची नोंद गौरवाने घेतली जाते. आजच्या काळात तिच्या नेतृत्वाचा इतिहास जाणून घेणं का महत्त्वाचं आहे, हे सांगत आहेत इतिहासतज्ज्ञ रुबी लाल.


जन्माच्या वेळी तिचं नाव मिह्र-उन-निसा होतं. नंतर तिचं नाव नूरजहां (जगाला प्रकाशमान करणारी) असं नाव तिच्या पतीने म्हणजे मुघल राजा जहांगीरने दिलं. राणी एलिझाबेथ (प्रथम) यांच्या जन्माच्या काही दशकानंतर तिचा जन्म झाला. मात्र नूरजहांने राणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा विविधांगी पद्धतीने राज्यकारभार केला.

16व्या शतकात भारतीय उपखंडात प्रवेश केल्यानंतर मुघलांनी विविध भागावर जवळजवळ 300 वर्षं राज्य केलं. मुघल म्हणजे भारताच्या इतिहासातील एक शक्तिशाली साम्राज्य होतं. मुघल साम्राज्यातील अनेक राजे आणि राण्या कलेच्या उपासक होत्या. त्यात नूरजहांचाही समावेश होता. मुघल राजांनी भारतात अनेक शहरांची स्थापना केली. त्याचबरोबरीने मोठमोठे किल्ले, मशिदी आणि स्मारकंही बांधली.

या साम्राज्याची एकमेव महिला प्रशासक म्हणून नूरजहांचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या प्रथांमध्ये नेहमीच आजही उल्लेख होतो.

आवडती पत्नी

आग्रा आणि लाहोर या शहरातल्या विविध घरात आणि स्मारकांमध्ये तिच्याविषयीच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. ज्येष्ठ स्त्रिया आणि पुरुष, टूर गाईड, आणि इतिहासात रुची असणारे लोक जहांगीर आणि नूरजहां यांची प्रेमकहाणी रंगवून सांगतात. एका नरभक्षक वाघाच्या तावडीतून एका माणसाला वाचवण्यासाठी त्या वाघाचा आपल्या बंदुकीने तिने कसा वेध घेतला याची कथा सगळीकडे सांगितली जाते.

तिच्या प्रेमकहाणीच्या आणि तिच्या शौर्याच्या कथा तर नेहमीच सांगितल्या जातात. मात्र तिचं गतिशील जग, राजकीय क्षेत्रातल्या कुशाग्रबुद्धीबद्दल फारच कमी माहिती लोकांकडे आहे. अनेक अडचणींचा सामना करत तिने राज्य केलं होतं, हे फार कमी लोकांना महीत आहे.

ती कवयित्री होती, उत्तम शिकारी होती आणि एक कल्पक वास्तूविशारद होती. तिने तिच्या आईवडिलांच्या स्मारकाच्या केलेल्या रचनेवरून ताज महालाच्या रचनेची प्रेरणा मिळाली होती.

मात्र पुरुषसत्ताक राज्यात आपला झेंडा रोवणारी नूरजहां कोणत्याही राजघराण्यातून आलेली नव्हती. राजकीय कौशल्याच्या जोरावर तिने राजसत्तेचा मुकूट मिळवला होता. ती जहांगीरची सर्वांत आवडती पत्नी आणि मुघल साम्राज्याची सहप्रशासक होती.

मात्र त्याकाळात स्त्रियांना सार्वजनिक जीवनात इतकं फारस महत्त्वा नसताना ती इतकी प्रभावी कशी ठरली?

Image copyright COURTESY OF RAMPUR RAZA LIBRARY

तिच्यावर बालपणी झालेले संस्कार, तिला पाठिंबा देणारे पुरुष आणि स्त्रिया, जहांगीरबरोबर असणारं तिचं विशेष नातं, तिच्या महत्त्वाकांक्षा, ती राज्य करत असलेला परिसर, तिथली लोक अशा बराच गोष्टींबद्लल चर्चा नेहमीच होत असते.

सिंधू नदीच्या पार असलेलं हिंदुस्तान अत्यंत श्रीमंत, सर्वसमावेशक होतं. अरब आणि पर्शियन लोक त्याचा भारत असा उल्लेख करत असत, तिथे विविध संस्कृती, धर्म आणि परंपरा एकत्रितपणे नांदत होत्या.

नूरजहांचा जन्म 1577मध्ये सध्या अफगाणिस्तानात एका पर्शियन उमरावाच्या घरात कंदाहरमध्य़े झाला. मात्र सफाविद घराण्याच्या असहिष्णुतेला कंटाळून त्यांनी इराण सोडलं आणि मुघल साम्राज्यात त्यांनी आसरा घेतला.

प्रेरणादायी आयुष्य

नूरजहांचा जन्म आणि बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे तिच्यावर वेगवेगळे संस्कार झाले. 1594 मध्ये तिने मुघल साम्राज्यातील एक लष्करी अधिकाऱ्याशी लग्न केलं. ती त्याच्याबरोबर बंगालला गेली. एका मुलालाही तिने जन्म दिला.

तिच्या पतीवर जहांगीरविरुद्ध कट करण्याचा ठपका ठेवण्यात आला. राजाने त्याला दरबारात हजर करण्याचे आदेश दिले. मात्र सुबेदाराच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.

जहांगीरने बायकांसाठी असलेल्या निवासस्थानात विधवा नूरजहांला आश्रय दिला होता. तेव्हा इतर स्त्रियांनी तिच्यावर हळूहळू विश्वास ठेवायला सुरुवात केली. तिने 1611मध्ये जहांगीरशी लग्न केले आणि ती त्याची 20वी बायको झाली.

त्यावेळच्या अधिकृत नोंदीत जहांगीरच्या इतर बायकांची नोंद झाली आहे. जहांगीरने 1614मध्ये लिहिलेल्या आठवणीत जहांगीर नूरजहांबरोबर असलेल्या विशेष नात्याचा उल्लेख करतो. एक संवेदनशील जोडीदार, अत्यंत काळजीवाहू, कसलेली सल्लागार, उत्तम शिकारी, मुत्सद्दी आणि कला उपासक म्हणून जहांगीर तिचा उल्लेख करतो.

Image copyright SM Mansoor

अनेक इतिहासकारांना असं वाटतं की जहांगीर अत्यंत दारुडा होता आणि राज्य करण्यासाठी लागणारी क्षमता त्याच्यात नव्हती. म्हणून त्याने राज्याचं नियंत्रण नूरजहांकडे दिलं होतं. पण हे संपूर्ण सत्य नाही.

जहांगीर दारुडा होता आणि तो अफूचं सेवन करायचा हे खरं आहे. त्याचे बायकोवर प्रेम होतं हेही खरं आहे. मात्र त्यामुळे नूरजहां राणी झाली हे खरं नाही. खरंतर नूर आणि जहांगीर एकमेकांना पूरक होते. आपली बायको राज्यकारभारात ढवळाढवळ करतेय असं कधीही जहांगीरला वाटलं नाही.

त्यांच्या लग्नानंतर आपल्या कर्मचाऱ्यांच्या जमिनीच्या हक्काचं रक्षण करण्याचा पहिलाच आदेश काढला. त्यावर नूरजहां पादशाह बेगम असा उल्लेख आहे. याचं भाषांतर नूरजहां महिला प्रशासक असं होतं. हे नूरजहांच्या सार्वभौमत्वाचं द्योतक तर आहेच, शिवाय ताकद वाढतेय असंही अधोरेखित करतं.

1617मध्ये एका सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यावर जहांगीरच्या मागच्या बाजूला तिचं नाव कोरलेली नाणी वाटायला त्यांनी सुरू केली. दरबारातील इतिहासकार, मुत्सद्दी, व्यापारी आणि भेटी देणाऱ्यांना तिला मिळणारा विशेष दर्जा लक्षात येऊ लागला.

Image copyright SILVER

तिने एकदा राजांसाठी असलेल्या बाल्कनीत येऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ही बाल्कनी फक्त पुरुषांसाठी राखीव होती. हा प्रसंग दरबारातील एक व्यक्ती सांगते.

तिच्या निडर वागणुकीचं हे एकमेव उदाहरण नाही. शिकार असो, राजकीय आदेश असो, सार्वजनिक इमारतींची रचना असो, गरीब आणि मागासेल्या स्त्रियांना आधार देणं असो त्या काळच्या स्त्रियांच्या कल्पनेपलीकडचं आयुष्य ती जगली.

जेव्हा राजाचं अपहरण झालं तेव्हा तिने सैन्याचं नेतृत्वही केलं. तिच्या या धैर्यामुळे तिचं नाव समाजात आणि इतिहासात कायमचं कोरलं गेलं आहे.

(रुबी लाल या इतिहासकार असून एमरॉय विद्यापीठात शिकवतात. Empress: The Astonishing Reign of Nur Jahan या पुस्तकाच्या त्या लेखिका आहे हे पुस्तक अमेरिकेत WW Norton आणि भारतात पेंग्विन इंडियातर्फे प्रकाशित करण्यात आलं आहे. )

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)