'पंजाबमध्ये ड्रग्स इतक्या सहज मिळत नसते तर आज माझा मुलगा माझ्याजवळ असता'

प्रतिमा मथळा लक्ष्मी यांनी आपला 24 वर्षांचा मुलगा गमावला.

"मी रात्रभर त्याच्या फोटोकडे बघून रडत असते," लक्ष्मी देवी (55) आपल्या मुलाबद्दल सांगतात. त्यांचा 24 वर्षांचा मुलगा, रिकी लाहोरिया हा शाळेत असतानाच ड्रग्सच्या आहारी गेला.

त्याला ड्रग्सचा नाद असा लागला की शाळेतून तो ड्रॉप आऊट झाला. आणि काही आठवड्यांपूर्वी ड्रग्सच्या अतिसेवनानं तो गेला तो कायमचाच.

आज लक्ष्मी जालंधर इथल्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरात काम करतात. त्यांचे पती मजुरी करतात.

"आमची परिस्थिती आधीपासूनच हलाखीची होती. पण आमचा मुलगा ड्रग्सच्या नादी लागला आणि त्यासाठी तो सापडेल ती वस्तू विकू लागला," त्या सांगतात. "दोन महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. लग्नात मिळालेल्या सर्व भेटवस्तू त्यानं ड्रग्स घेण्यासाठी विकल्या."  

Image copyright Getty Images

"रिकी घराबाहेर जायचा. त्याच्या मित्रांसोबत सिरप आणि इंजेक्शन घ्यायचा. पुढं तो हेरॉइन घेऊ लागला. मग एक वेळ अशी आली की तो दिवसभर ड्रग्सच्याच नशेत असायचा," त्याची आई पुढे सांगते.

"पण त्याच्या शेवटच्या दिवसात त्याला व्यसन सोडावंसं वाटत होतं. त्याला आम्ही हॉस्पिटलला नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता," हे सांगताना लक्ष्मी यांचा कंठ दाटून येतो आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात.

Image copyright Ravinder singh robin

पण त्याला ड्रग्स एवढ्या लहान वयात मिळायचे कसे?

"पंजाबमध्ये ड्रग्ज सहज मिळतात. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती ती पडतात आणि नंतर त्यांचा त्यात मृत्यू होतो. त्याला जवळच्या रस्त्यावरच ड्रग्ज मिळायचे. जर ड्रग्स इतक्या सहज मिळत नसते तर आज माझा मुलगा माझ्याजवळ असता," ती आई हतबल होऊन सांगते.

Image copyright Getty Images

पंजाबमध्ये लक्ष्मीसारख्या अनेक महिला आहेत ज्यांना आपल्या तरुण मुलांच्या मृतदेहाजवळ बसून रडावं लागलं आहे किंवा अशा तरी महिला आहेत ज्यांना आपलं मूल ड्रग्जच्या व्यसनाच्या विळख्यात अडकेल की काय, अशी भीती सतत वाटत असते.

जून 2018पर्यंत ड्रग्समुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 60च्या आसपास आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत ही संख्या वर्षाला 30-40 इतकी होती, असं पंजाब पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं निरीक्षण आहे.

2017मध्ये ड्रग्स ओव्हरडोस किंवा ड्रग्स संबंधित समस्येमुळे 38 लोक मृत्युमुखी पडले होते. या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात ड्रग्ससंबंधित 37 मृत्यूंची प्रकरणं पुढे आली आहेत, असं पंजाब पोलिसांच्या ड्रग्सचा प्रश्न सोडवण्यासाठी तयार केलेल्या विशेष कृती दलाच्या (Special Task Force) अहवालात म्हटलं आहे.

प्रतिमा मथळा व्यसनमुक्ती केंद्र

पंजाबमधला ड्रग्सचा प्रश्न किती गंभीर आहे, हे समजून घेण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनं (AIIMS, Delhi) संशोधन केलं होतं. केंद्रीय समाज कल्याण मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या संशोधनात असं म्हटलं आहे की ड्रग्स किंवा अमली पदार्थांवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या 2.32 लाख इतकी असावी अंदाज व्यक्त केला होता. तसंच वर्षाला पंजाबमध्ये 7,500 कोटी रुपयांची उलाढाल होत असावी, असं देखील या अहवालात म्हटलं होतं.

पंजाबमध्ये झालेल्या प्रत्येक मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. ड्रग्स तस्करीच्या मार्गावरची पाळत पोलिसांनी वाढवली असल्याचं अमरिंदर सिंग यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पंजाबात ड्रग्स आणणं तस्करांना कठीण झालं आहे. यामुळे ते लोक हेरॉइनमध्ये काही स्वस्त पदार्थ मिसळतात आणि ते जीवघेणं ठरत आहे.

हेरॉईनचं व्यसन असलेल्याचा दिवसाचा खर्च

बीबीसीने पंजाब पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि गुप्तचर विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ड्रग्सच्या व्यापाराचं आणि सेवनाचं तंत्र समजून घेण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांच्या मते पंजाबमध्ये पॉपी हस्क, अफू, हेरॉईन आणि फार्मास्युटिकल ड्रग्स, अशा चार प्रकारचे ड्रग्स घेतले जातात. पण हेरॉईनचं (स्थानिक भाषेत त्याला चिट्टा असं म्हणतात) गेल्या काही वर्षांत सगळ्यांत जास्त सेवन केलं जात आहे.

हेरॉईन हे विशेषत: महागडं व्यसन आहे. एक ग्रॅम हेरॉईनची किंमत 4,000 ते 6,000 रुपये असते. अट्टल व्यसनी व्यक्ती एका दिवसाला 0.5 ग्रॅम ते दोन ग्रॅमपर्यंत हेरॉईनचं सेवन करतो.

जेव्हा पोलिसांची दक्षता किंवा जप्तीचं प्रमाण वाढतं, तेव्हा काही ड्रग्स बाजारात मिळणं कठीण होतं. मग व्यसनी व्यक्ती दुसऱ्या ड्रगकडे वळतो.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते ड्रग्स सेवनाच्या पद्धतीत ग्रामीण भागात आणि शहरी भागात फरक आढळतो. लुधियानाचे पोलीस आयुक्त सुखचैन सिंग सांगतात, "आमच्याकडे हेरॉईनपेक्षा वैद्यकीय औषधांच्या गैरवापराच्या तक्रारी जास्त प्रमाणात येतात. कदाचित हेरॉईन सेवनाचं प्रमाण ग्रामीण भागात जास्त असावं."

गेल्या काही महिन्यात त्यांच्या भागात ड्रग्सच्या तस्करीला आळा बसल्याचा ते दावा करतात.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्य ड्रग्सच्या विळख्यातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला होता.

पंजाबचे आरोग्य मंत्री ब्रह्म मोहिंद्रा यांनी बीबीसीला सांगितलं, "सध्या पंजाबमध्ये ड्रग्स वितरण व्यवस्था मोडकळलीस आली आहे, असं मी ठामपणे सांगू शकतो. जेव्हा ड्रग्स उपलब्ध नसतात किंवा महाग मिळतात याचाच अर्थ वितरकांनी ते विकणं बंद केलंय किंवा त्यांच्याकडेच ड्रग नसावेत."

Image copyright Aarju alam

या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात ड्रग्समुळे 60 मृत्यूंबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. 2016 आणि 2017 मध्ये हा आकडा दरवर्षी 30 इतका होता. त्यावर मोहिंद्रा म्हणाले, "ड्रग्सचं वितरण विस्कळित झालं आहे, हे स्पष्ट झालं आहे. या व्यापारात असलेले लोक ड्रग्समध्ये स्वस्त रसायन मिसळतात. त्यामुळे जीवितहानी जास्त प्रमाणात होत आहे."

"त्याचवेळी ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होतात, असं सांगितलं जात आहे. मात्र ओव्हरडोस म्हणजे नेमकं किती, हे अजून स्पष्ट झालं नाही. आतापर्यंत झालेले मृत्यू गंभीर आणि दुर्दैवी आहेत हे मात्र खरं."

सरकारनं वितरण थांबवल्याचा दावा केला असला तरी त्यांची जबाबदारी पूर्ण झाली असा त्याचा अर्थ होत नाही.

"आम्ही कडक उपाययोजना करत आहोत. मात्र जोपर्यंत समाज ड्रग्सला संपूर्णपणे नकार देत नाही तोपर्यंत कठीण आहे. त्यासाठी जनजागृती आणि व्यसनमुक्ती केंद्राने आणखी काम करण्याची गरज आहे," अशी कबुली एका अधिकाऱ्यानं दिली.

हे वाचलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : 'रस्त्यात मरून पडलेलं कुत्रं पाहून मी नशा करणं सोडलं!' - शूट/एडिट - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)