एशियन गेम्समध्ये भारताने अशी केली 67 वर्षांनंतर लक्षणीय कामगिरी

एशियन गेम्स Image copyright Getty Images

इेडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं एशियन गेम्सची रविवारी सांगता झाली. त्यात भारतानं 1951च्या पहिल्या एशियन गेम्सनंतरचं सर्वांत दिमाखदार प्रदर्शन केलं आहे. सुवर्ण पदकांच्याबाबत भारताने 67 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

1951मध्ये भारताची कामगिरी

1951 साली पहिले एशियन गेम्स 4 ते 11 मार्च दरम्यान दिल्लीत झाले. त्यास 'फर्स्ट एशियाड' असंही म्हटलं जातं. आयोजन समितीनं जवळजवळ सगळ्या देशांना निमंत्रण पाठवलं होतं. पण चीनकडून काहीही उत्तर आलं नाही. काश्मीरच्या मुद्द्यामुळे पाकिस्तानने स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला होता.

पहिल्या एशियन गेम्समध्ये भारतासह एकूण 11 देशांनी सहभाग घेतला. त्यावेळी जपानने सर्वाधिक पदकं मिळवली. भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. जपानने 24 सुवर्ण, 21 रौप्य आणि 15 कांस्य अशी एकूण 60 पदकं मिळवली. तर भारताने 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 20 कांस्य अशी एकूण 41 पदकं जिंकली होती.

Image copyright TWITTER/RAJYAVARDHAN RATHORE

पदकांची संख्या वाढली

यंदाच्या एशियन गेम्समध्ये या आधीचं रेकॉर्ड मोडत भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 29 कांस्य जिंकलेल्या भारताच्या एकूण पदकांची संख्या 68 झाली आहे.

2010मध्ये चीनमधल्या ग्वांझू येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताने एकूण 65 पदकं जिंकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती.

13व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारताने ग्वांझाव एशियन गेम्समधल्या (2010) कामगिरीशी बरोबरी केली होती.

शनिवारी अमित पंघलने 49 किलो वजन गटात उझबेकिस्तानच्या हसनबॉय दस्मातोव्हला नमवत सुवर्ण पदक पटकावलं. अमितच्या सुवर्णवेधाने भारतानं एकूण 14 गोल्ड मेडल्सची कमाई केली.

Image copyright TWITTER/RAJYAVARDHAN RATHORE
प्रतिमा मथळा अमित पंघल

त्यानंतर ब्रिज स्पर्धेत शिवनाथ सरकार आणि प्रणव वर्धन जाडीने सुवर्ण पदक पटकावलं. भारताला अजून एका सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, पण स्क्वॉशच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला टीमला हाँगकाँगकडून 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना रौप्य पदकावरच समाधान मानावं लागलं.

शनिवारी पाकिस्तानच्या पुरुष हॉकी टीमला धूळ चारत भारतानं कांस्य पदक जिंकलं. शेवटच्या दोन दिवसात 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवत भारताच्या एकूण पदकांची संख्या 68 वर पोहोचली. ही भारतीय खेळाडूंची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

मागच्या एशियन गेम्समध्ये (2014) भारताने 57 पदकं जिंकली होती. त्यात 11 सुवर्ण पदकं होती. दक्षिण कोरियाच्या इंचॉन शहरात झालेल्या एशियन गेम्समध्ये भारत 8व्या क्रमांकावर होता.

Image copyright TWITTER/RAJYAVARDHAN RATHORE
प्रतिमा मथळा शिवनाथ सरकार आणि प्रणव वर्धन

एकूण पदकांच्या मालिकेत चीन पहिल्या क्रमांकावर राहिला. चीनच्या खेळाडूंनी एकूण 257 पदकं जिंकली. तर 70 सुवर्ण पदकांसहित 196 पदकांची कमाई करणारा जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियाने 167 पदकं जिंकत तिसरा क्रमांक मिळवला.

भारताचा शेजारी पाकिस्तानला केवळ 4 कांस्य पदक मिळवत 34व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. तर नेपाळला एक रौप्य मिळाल्यानं त्यांचा क्रमांक पाकिस्तानच्या वरचा राहिला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)