#5मोठ्याबातम्या: 'शिस्तीबद्दल बोललं तर लोक हुकूमशहा म्हणतात'- पंतप्रधान मोदी

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, EPA/JAGADEESH NV

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'शिस्तीबद्दल बोललं तर लोक हुकूमशहा म्हणतात'-मोदी

"आपल्या देशात अशी स्थिती आहे की जर कुणी शिस्तीबद्दल बोललं तर त्या व्यक्तीला लोकशाहीविरोधी म्हटलं जातं. कुणी जर शिस्त पाळा असं म्हटलं तर त्या व्यक्तीला हुकूमशहा म्हटलं जातं," असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.

भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वर्षपूर्तीनिमित्त 'Moving on, Moving forward: A year in Office' या पुस्तक प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते.

"व्यंकय्या नायडू हे शिस्तप्रिय व्यक्ती आहेत. ज्या प्रकारच्या शिस्तीची नायडू अपेक्षा ठेवतात त्या प्रकारची शिस्त ते स्वतः देखील पाळतात," असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले.

2. तेलंगणा विधानसभा विसर्जन तूर्तास नाही?

तेलंगणा राज्याच्या निवडणुका पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये होणं अपेक्षित आहे. त्याच वेळी लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे राज्यातील विधानसभा विसर्जित करून नव्यानं निवडणुका घेण्याचा तेलंगणा राष्ट्रीय समितीचा विचार होता.

त्यासाठी हैदराबादमध्ये रविवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय होणार होता पण तूर्तास हा निर्णय विचाराधीन असल्याचं पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. हे वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

राज्याचे IT मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव के. टी. रामाराव म्हणाले, "पुन्हा जनतेकडे जाऊन नव्याने कौल घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असं पक्षाला वाटतं. मुदतपूर्व निवडणूक झाल्यास पक्ष पूर्वीपेक्षा अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल. एवढंच नव्हे तर विधानसभा निवडणूक आधी झाल्यास नंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची गणितं अधिक स्पष्टपणे मांडता येतील," असं ते म्हणाले.

"योग्य वेळ आल्यावरच याबाबत निर्णय घेऊ," असं राव यांनी यावेळी म्हटलं.

3. उत्तर प्रदेशात अतिवृष्टीचे 16 बळी

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 16 लोकांचा मृत्यू आणि 12 जण जखमी झाल्याची माहिती राज्य प्रशासनाने दिली आहे. News18.comने दिलेल्या या बातमीनुसार शहाजहानपूर भागात सगळ्यांत जास्त नुकसान झालं आहे. इथे वीज कोसळल्यामुळे सहा लोकांचा मृत्यू झाला आहे तसंच सात लोक जखमी झाले आहेत.

"शहाजहानपूर जिल्ह्यात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यात सीतापूर जिल्ह्यात तीन लोकांचा मृत्यू झाला" असं उत्तर प्रदेशचे बचावकार्य विभागाच्या आयुक्तांनी रविवारी एका निवदेनाद्वारे सांगितलं.

याबरोबरच 18 प्राण्यांचा मृत्यू झाला आणि 461 घरांचं किंवा झोपडपट्ट्यांचं नुकसान झाल्याचंही या निवेदनात सांगण्यात आलं आहे.

4. कन्हैया कुमार निवडणूक लढवणार?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर बिहारच्या बेगुसरायहून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची बातमी बिझनेस स्टॅँडर्डने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

"जर पक्षाने मला बेगुसरायहून तिकीट दिलं आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिला तर मला काही अडचण नाही," असं कन्हैया कुमारनं PTI ला सांगितलं.

कन्हैया बेगुसराय जिल्ह्यातील बरुनी भागातील रहिवासी आहे त्याची आई अंगणवाडी सेविका आणि वडील शेतकरी आहे.

5. 'ते' 14 बालकांचे मृतदेह नाहीत

कोलकात्यात 14 अर्भकांच्या मृतदेहाचे अवशेष प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये सापडल्याचं वृत्त काल अनेक माध्यमांमध्ये आलं होतं. त्यामुळे खळबळ उडाली होती.

महापौरांनी लगेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आणि घटनास्थळी सापडलेल्या पिशव्या पोलिसांनी डॉक्टरांकडे पाठवल्या.

त्यानंतर या पिशव्यांमध्ये मानवी उती नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. या पिशव्यातले अवशेष तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

वाचा बीबीसी न्यूजची पूर्ण बातमी इथे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)