हार्दिक पटेल यांनी लिहिलं मृत्युपत्र; उपोषणाचा 11 दिवस

  • तुषार कुलकर्णी
  • बीबीसी मराठी
हर्दिक पटेल

फोटो स्रोत, Getty Images

"आम्ही दहा जण निघालो होतो, पण आमच्या पैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली. इथं येऊन पाहतो तर गेटवर पुन्हा पोलीस बंदोबस्त. मग आम्ही पोलिसांची नजर चुकवून सोसायटीमध्ये घुसलो."

हार्दिक पटेल यांना ध्रांगद्राहून भेटण्यासाठी आलेले युवक गोपाल पटेल बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागदेकर छारा यांना सांगत होते.

"मुख्य रस्त्यानं आम्हाला येता आलं नाही तर आम्ही शेत ओलंडून कच्च्या रस्त्यानं आलो आहोत. जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता." गोपाल सांगतात. इतकी जोखीम पत्करून तुम्ही कशासाठी आलात? असं विचारलं असता गोपाल सांगतात, "कोणत्याही किमतीत या आंदोलनाचा एक स्वयंसेवक होण्याची माझ्या मनात प्रबळ इच्छा होती म्हणून मी इथं आलो."

पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आमरण उपोषणाला सुरूवात करून 11 दिवस झाले आहेत. पण त्यांच्या या नव्यानं सुरू झालेल्या आंदोलनाला अजून गर्दी जमताना दिसत नाहीये.

फोटो कॅप्शन,

ग्रीनवूड बंगलोज बाहेर पोलिसांचा बंदोबस्त

अहमदाबाद शहराच्या परिघात असलेल्या ग्रीनवूड बंगलोज या सोसायटीतल्या 'छत्रपती' या त्यांच्या एका समर्थकाच्या घरात हार्दिक यांनी आपलं उपोषण सुरू केलं.

या ठिकाणी सामान्य माणसांना जाता येणं कठीण झालं आहे. काही मोजकेच कार्यकर्ते 'जय सरदार' असलेली टोपी घालून बसलेले दिसत आहेत. आपल्याला कधीही अटक होऊ शकते असंच त्यांना वाटतं.

'हार्दिक यांचं मृत्युपत्र'

हार्दिक पटेल यांनी आपलं मृत्युपत्र लिहिलं आहे. त्यांची संपत्ती आई-वडील आणि गोशाळेत त्यांनी विभागली आहे.

"मी भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात 25 ऑगस्टला उपोषणाला सुरुवात केली आहे. माझं शरीर क्षीण होत आहे आणि मला खूप वेदना होत आहेत. माझं शरीर केव्हाही माझी साथ देणं सोडू शकतं. तेव्हा मी माझं मृत्युपत्र जाहीर करत आहे," असं हार्दिक पटेलनं म्हटलं आहे.

हार्दिक यांचे निकटवर्तीय मनोज पनारा यांनी हार्दिक यांचं मृत्युपत्र वाचून दाखवलं, असं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, facebook/Hardik patel

हार्दिक पटेल यांच्यावर आपलं मृत्युपत्र लिहिण्याची वेळ आली, पण त्यांच्या उपोषणाला गर्दी दिसत नाही. एरव्ही हजारो लाखोंची गर्दी खेचणाऱ्या हार्दिक पटेल यांची लोकांनी साथ सोडली आहे का? असा प्रश्न देखील चर्चिला जात आहे.

घराच्या परिसराला छावणीचं स्वरूप

"जेव्हा हार्दिक यांनी उपोषणाला सुरूवात केली तेव्हा पोलिसांनी तेव्हापासून ते जिथं उपोषण करत आहेत त्या भागाला छावणीचं स्वरूप आलं आहे," असं बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागदेकर छारा सांगतात.

"या सोसायटीला तीन गेट आहेत. तिन्ही गेटवर पोलिसांचा कडक पहारा आहे. चौकशी केल्याशिवाय कुणालाच आत जाऊ दिलं जात नाही," असं या सोसायटीच्या रहिवासी लाशिका बोस सांगतात. फेरीवाले किंवा विक्रेत्यांना सोसायटीत येण्यासाठी बंदी आहे.

फोटो कॅप्शन,

ओळखपत्र पाहूनच पोलीस आत सोडत आहेत.

"जाणाऱ्या येणाऱ्याचं ओळखपत्र पाहूनच सोसायटीमध्ये सोडलं जात आहे. आमच्या माळ्याकडे आधारकार्ड नव्हतं. तर त्याला परत पाठवण्यात आलं," असं बोस सांगतात.

या दक्षतेचं कारण विचारलं असता अहमदाबादचे पोलीस उपायुक्त जयपालसिंह राठोड सांगतात की "पोलीस फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांची ओळख पाहत आहेत. त्यांना जाण्या-येण्यावर कुठलीही बंदी नाही."

"अहमदाबादमध्ये 144 वं कलम लागू करण्यात आलं आहे, त्यामुळे जमावबंदी आहे. एकावेळी चार जणांपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमू दिले जात नाही. पण कमी संख्येत लोक किंवा नेते हार्दिक पटेल यांना भेटण्यासाठी आले तर त्यांना आम्ही सोडत आहोत," असं राठोड सांगतात.

मैदानाची परवानगी नाही

"2015मध्ये हार्दिक पटेल यांनी GMDC मैदानावर उपोषण केलं होतं. त्यावेळी खूप लोक जमले होते. यावेळी त्यांना निकोल मैदानावर उपोषण करण्याची परवानगी हवी होती. पण पोलिसांनी परवानगी नाकारली. मग त्यांनी दुसऱ्या मैदानाची मागणी केली ती देखील पोलिसांनी सुरक्षेच्या कारणाने नाकारली," असं छारा सांगतात.

याच कारणामुळे पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या एका कार्यकर्त्याच्या घरी अहमदाबाद शहराच्या परिसरात असलेल्या 'ग्रीनवूड बंगलोज' येथे त्यांनी घरी उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

सरकार जपून पावलं उचलत आहे?

गेल्या विधानसभेत अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांनी सत्ताधारी भाजपला आव्हान दिलं होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्याबाबत पावलं जपून उचलत आहेत असं जाणकार सांगत आहेत.

"यावेळी हार्दिक पटेल यांच्यासोबत कुणी नाही हे सिद्ध करण्यासाठी भाजपनं कुठलीच कसर बाकी ठेवली नाही," असं बीबीसी गुजरातीसाठी लिहिणारे पत्रकार उर्वीश कोठारी यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

"या व्यतिरिक्त जे लोक हार्दिक पटेल यांना भेटायला येत आहेत त्यांना पोलीस अडवत आहेत. त्यांना चौकशीच्या नावाखाली ताटकळत ठेवलं जात आहे. तसेच हार्दिक पटेल समर्थकांसाठी जी साधन सामुग्री येत आहे ती देखील अडवली जात असल्याच्या आरोपांची चर्चा होत आहे," असं कोठारी सांगतात.

"2015मध्ये ज्या चुका सरकारनं केल्या आणि त्यामुळे हे आंदोलन चिघळलं त्या चुका सरकार टाळण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या क्षेत्रात पटेलांचा प्रभाव आहे त्या ठिकाणी 144 कलम लावण्यात आलं आहे," असं ज्येष्ठ पत्रकार अजय उमट यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

'मराठा आणि जाट आंदोलनातून घेतला धडा'

फोटो स्रोत, Getty Images

"पटेल आंदोलनाची धार कमी झाली हे नाकारता येणार नाही. पटेल समाजातले अनेक लोक हे शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहेत. त्यांना ही गोष्ट कळून चुकली आहे की आंदोलन करून किंवा बंद करून आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आपल्याला आरक्षण हवं असेल तर ते कायदेशीररीत्या मिळवावे लागेल," उमट सांगतात.

महाराष्ट्रात मराठा आंदोलन आणि हरियाणात जाट आंदोलन करत आहेत. दोन्ही राज्यातल्या सरकारांनी आरक्षण देण्याबाबत तयारी दर्शवली आहे. पण त्यांना आरक्षण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मिळू शकतं. ही बाब पटेल समाजाच्या लक्षात आली आहे, असं उमट सांगतात.

हार्दिक पटेल एकटे पडले आहेत का?

फोटो स्रोत, facebook/ hardik

हार्दिक पटेल एकटे पडले आहेत अशी चर्चा एप्रिल महिन्यापासूनच सुरू होती. त्यांचे काही सहकारी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडून गेले होते. तेव्हापासून ते एकटे पडले आहेत असं म्हटलं जाऊ लागलं होतं.

"हार्दिक पटेल हे एकटे पडले आहेत. त्यांची टीम विखुरली गेली आहे. पाटीदार आंदोलनाची दिशा बदलली आहे," असं मत एकेकाळचे हार्दिक पटेल यांचे सहकारी अतुल पटेल यांनी बीबीसी गुजरातीसोबत बोलताना व्यक्त केलं होतं.

अतुल पटेल हे सध्या काँग्रेससोबत आहे. ते म्हणतात, "जर हार्दिक पटेल येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असतील तर त्यांनी ते आताच जाहीर करावं. ऐनवेळी त्यांनी तसं जाहीर करणं म्हणजे समर्थकांची फसवणूक ठरेल."

आपण एकटे नाही असं मात्र हार्दिक यांनी वेळोवेळी म्हटलं आहे. ते सांगतात, "सुरुवातीला मी एकटाच होतो. आंदोलन सुरू केलं आणि लोक माझ्यासोबत जोडले गेले. काही लोक मला सोडून गेले हे जरी खरं असलं तरी मी मात्र एकटा पडलेलो नाही."

'हार्दिक यांना काँग्रेसचा पाठिंबा?'

फोटो स्रोत, facebook/hardik

फोटो कॅप्शन,

हार्दिक पटेल यांना भेटायला आलेले काँग्रेस नेते.

हार्दिक उपोषणाला बसल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात काँग्रेस नेते भेटायला आले.

सिद्धार्थ पटेल, अर्जुन मोधवाला, काँग्रेस आमदार शैलेश परमार, हिम्मत सिंह पटेल आणि माजी खासदार विक्रमभाई मदाम या नेत्यांनी हार्दिक यांची भेट घेतली.

या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, तृणमूल काँग्रेस नेते दिनेश त्रिवेदी यांनी देखील त्यांची भेट घेतली.

"हार्दिक पटेल यांना भेटायला येणाऱ्यांमध्ये काँग्रेस नेत्यांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे हार्दिक आणि काँग्रेसच्या जवळीकतेबाबत लोक शंका घेत आहेत. हार्दिक यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं लोकांना वाटत आहे, त्यामुळे देखील त्यांच्या प्रती असणारी सहानुभूती कमी झाल्याचं दिसतं," असं उमट सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)