भीमा कोरेगाव : पोलिसांच्या पत्रकार परिषदेवर मुंबई हायकोर्टाचे ताशेरे

फोटो स्रोत, GETTY / FACEBOOK
वरवरा राव, गौतम नवलखा आणि सुधा भारद्वाज
एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचारासंदर्भात अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवर मुंबई उच्च न्यायायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंह आणि या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही कागदपत्रं सादर केली आणि अटक करण्यात आलेल्या संशयितांविरोधात पुरावे असल्याचा दावा केला.
या वर्षांच्या सुरुवातील भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी वरावरा राव, अरुण फरेरा, वर्नोन गोन्साल्व्हिस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक केली आहे. सुप्रीम कोर्टाने या सर्वांना 6 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. अटक केलेल्या या कार्यकर्त्यांवर बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
सतीश गायकवाड यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्याबाबत याचिका दाखल केली आहे. "हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रसारमाध्यमांसमोर पुरावे सादर करण्याच्या निर्णयाबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पत्रकार परिषद घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली," असं याचिकाकर्त्यांचे वकील नितीन सातपुते यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मृदुला भटकर यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली.
फोटो स्रोत, ANI/TWITTER
महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह
या प्रकरणाची सुनावणी 7 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
सरकार पक्षाचे वकील दीपक ठाकरे यांना न्यायालयाने या प्रकरणांत तपास संस्थानी पुन्हा पत्रकार परिषद घेऊ नये असे आदेश दिले आहेत.
पत्रकार परिषदेत पोलीस काय म्हणाले?
शुक्रवारी मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेत पोलिसांना तपासादरम्यान अनेक पत्रं मिळाल्याचा दावा केला. तसंच काही पत्रांतील मजकूर वाचून दाखवला. हा पत्रव्यवहार सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे आणि रोना विल्सन यांच्यामध्ये झाला आहे, असा दावाही पोलिसांनी केला.
भीमा कोरेगावमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी माओवादी संघटनांकडून पैसै देण्यात आल्याचंही सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
तसंच रोना विल्सन यांच्या कॉम्प्युटरचा पासवर्ड संरक्षित पत्र पोलिसांच्या हाती लागलं. विल्सन यांनी बंदुकींच्या 4 लाख गोळ्या, ग्रेनेड आणि 8 कोटी रुपयांचा उल्लेख असलेलं पत्र कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलं होतं, यात राजीव गांधी यांची जशी हत्या करण्यात आली तसा घातपात घडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाचा उल्लेख होता, असा दावाही पोलिसांनी केला.
तर सुधा भारद्वाज यांनी माध्यमांना पाठवलेल्या पत्रात पोलिसांचे हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलीस ज्या पत्राचा उल्लेख करत आहेत, ते पत्र बनावट असल्याचा दावा भारद्वाज यांनी केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)