#5मोठ्याबातम्या : रघुराम राजन यांच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था घसरली - NITI आयोग उपाध्यक्ष

रघुराम राजन

आजची वृत्तपत्र आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. रघुराम राजन यांच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था घसरली : NITI आयोग उपाध्यक्ष

NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर टीका केली असून त्यांच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था घसरली असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

ANI या वृत्तसंस्थेला राजीव कुमार यांनी मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, "रघुराम राजन यांच्या NPAच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था घसरली होती. अर्थव्यवस्थेच्या घसरणीशी नोटाबंदीचा संबंध नाही. 2015-2016 या कलावधीत सलग 6 तिमाहींमध्ये अर्थव्यवस्थेने घसरणीचा ट्रेंड दाखवला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे."

2. 'गौरी लंकेश हत्याप्रकरणातील संशयितांशी पंगारकरांचा संबंध'

नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत पंगारकर कर्नाटकमधील गौरी लंकेश खून प्रकरणातील संशयितांच्या संपर्कात होते, असा दावा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) न्यायालयात केला आहे. द फर्स्ट पोस्टने ही बातमी दिली आहे.

पंगारकर यांची पोलीस कोठडी न्यायलयाने 6 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, असं या बातमीमध्ये म्हटले आहे. गौरी लंकेश यांच्या खून प्रकरणातील संशयितांकडून पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीमध्ये पंगारकर यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं या बातमीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान श्रीकांत पांगारकर यांनी अमरावतीत श्याम मानव यांची हत्या करण्याचा कट आखला होता, असा दावा एटीएसने केला आहे, अशी बातमी लोकमतने दिली आहे. त्यासाठी त्यांनी अमरावतीत रेकीही केल्याचे तपासात पुढं आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. श्याम मानव हे मूळचे विदर्भातील आहेत. ते मुंबईतही वास्तव्यास असतात. हा दावा ATSने सोमवारी न्यायालयात केला, असं या बातमीत म्हटलं आहे.

3. दडीहंडी : एक गोविंदा मृत्युमुखी तर 150 जखमी

दहीहंडी फोडण्यासाठी थर रचताना फिट येऊन खाली कोसळल्याने कुश अविनाश खंदारे (२०) या युवकाचा मृत्यू झाला. तो धारावीचा रहिवासी होता. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबईत विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना 150 गोविंदा जखमी झाले असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

4. भाजपला फॅसिस्ट म्हटल्याने विद्यार्थिनीला अटक

केंद्रातील भाजप सरकारचा उल्लेख फॅसिस्ट असा केल्याने तामिळनाडूमध्ये एका 29 वर्षीय विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्ष तामिलिसाई सौंद्राराजन यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली, असं या बातमीत म्हटलं आहे. लोइस सोफया असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. कॅनडातून येत असताना तुतिकोरीन इथं विमानतळावर तिनं भाजप सरकारच्या घोषणा विरोधात घोषणा दिल्या होत्या, असं या बातमीमध्ये म्हटलं आहे.

5. देशभरात पुरात 1400 लोकांचा बळी

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 10 राज्यातील 1400 लोकांना पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे आपला जीव गमवावा लागला असल्याची बातमी द हिंदूने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद केंद्राच्या माहितीनुसार केरळात 488 लोकांचा मृत्यू झाला. 14 जिल्ह्यांतील 54.11 लाख लोकांना पुराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला. 14.52 लाख लोकांना बेघर व्हावं लागलं आणि आता ते बचाव छावण्यांत राहत आहेत तसंच 57,024 हेक्टर भूभागावरील पिकांचं नुकसान झालं आहे, असं या बातमीमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)